पटतंय का पहा! ✍️ गजानन खंदारे रिसोड
श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही भक्ती मार्गाची दोन रूपं असली तरी त्यांचा प्रवास वेगवेगळा असतो.
विचारपूर्वक श्रद्धा माणसाला आत्मबल व जागृती आत्म प्रगती देते, तर अंधश्रद्धा अज्ञानातून उद्भवते आणि गुलामगिरीकडे घेऊन जाते.”
अनेक दुःखाचे कारण हे अंधश्रद्धा आहे.
काल परवा दर्शनासाठी म्हणुन लोढाई च्या माळावर गेलो. यात कुणाला काही वेगळे वाटण्याचे कारण नसावे.
इतर अनेक ठिकाणी दिसतात तसें त्या ठिकाणी असलेले श्रद्धेचे झाड आणि नवसाचे गाठोडे माझ्यासाठी लक्षवेधी होते.
ग्रामीण सीमांवर, देवळाजवळ किंवा माळरानात अनेकदा अशी झाडं दिसतात – ज्यावर हिरव्या पिशव्या, कापड,गाठोडं, नारळ, वस्त्र, दोरं, विडा,बांगड्या यांसारख्या गोष्टी बांधलेल्या असतात.
धार्मिक गोष्टीबद्दल फार खोल चिकित्सा मांडायची नसते. हा इथला कायम प्रघात, याचे भान ठेऊनच हा लेखनाचा प्रपंच!
झाडं केवळ वनस्पतीच नसतात, तर ती “नकळतपणे” मनुष्याच्या श्रद्धेची साक्षात रूपे बनलेली असतात.
आणि ही प्रथा पुढील विश्वासावर आधारित असते
देवतेला नवस केला, गाठ बांधली, आणि तो पूर्ण झाला की पुन्हा वस्त्र आणि बाखळा बांधून तो फेडायचा.
या झाडांवर हजारो लोकांच्या आशा-आकांक्षा बांधलेल्या असतात. कोणी बाळासाठी नवस करतं, कोणी नोकरीसाठी, कोणाला आजारातून मुक्ती हवी असते.
पण मग ही श्रद्धा की अंधश्रद्धा?

आपण निसर्गाचं स्वामित्व आणि अस्तित्व मान्य केलं आणि त्यातून कृषी संस्कृतीचा विकास झाला.
भारतीय ग्रामीण जीवनशैली ही केवळ निसर्गाच्या आधारे चालणारी नाही, तर ती लोकविश्वास, परंपरा आणि सांस्कृतिक श्रद्धा यांच्यावरही आधारित आहे.
त्यामुळे प्रत्येक गावाला आपलं ग्रामदैवत असतं, आणि अनेकदा गावाच्या सीमेलगत, वेशीवर किंवा माळरानात वसलेली रक्षण करणारी सीमांत देवता ही सुद्धा असतात. या देवता केवळ धार्मिक श्रद्धेचं नव्हे, तर गावाच्या सामूहिक अस्तित्वाचं प्रतीक आहेत.
देवी देवतांच्या उत्पत्तीच्या स्थानाबद्दल बऱ्याच ठिकाणी स्थान निर्मितीच्या अनाकलीय किंवा बुद्धिला न पटणाऱ्या कथा असतात.

खरं तर
ग्रामदैवत ही त्या गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक एकतेचं प्रतीक असतं.
गावातील सण, यात्रा, उत्सव या सगळ्यांचं केंद्र हे ग्रामदैवत असतं. देवी-देवतांच्या पूजेच्या निमित्ताने गावातील सर्व लोक एकत्र येतात, भेदभाव विसरतात.
काही ठिकाणी प्रतिष्ठेच्या वादाचे कारणही असू शकतात.
खंडोबा, रेणुका, भैरुबा, बिरूबा जोगाई, जगाई आसरा, जाखाई, जोखाई अशी काही विचित्र नावे अनेक देवी-देवतांना दिली जातात.
परंपरेचा आदर, सांगत असताना विवेकासोबत
लोकसंस्कृती, ग्रामदैवत, सीमांत देवता आणि श्रद्धेची झाडं – या सर्व गोष्टी आपल्या मातीशी नातं सांगणाऱ्या, समाजाच्या जडणघडणीतली जिवंत साखळी आहेत. पण त्यांना अंधपणे न स्वीकारता, विचारपूर्वक आणि विवेकशक्तीने स्वीकारणं गरजेचं असावं असं कुणालाच वाटत नाही.
श्रद्धा ही पाण्यासारखी – जीवनदायिनी, तर अंधश्रद्धा ही पुरासारखी – विनाशकारी.
आपण या परंपरांचा अभ्यास करून, लोकसाहित्याच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत ही जिवंत श्रद्धा डोळसपणे पोहोचवणे आवश्यक असते
आपल्या पूर्वजांनी गावाच्या वेशीवर देवता का उभारली?
झाडाला नवस का बांधला गेला?
लोकसाहित्याने या परंपरांना काय स्थान दिलं?
या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजेच आपली लोकसंस्कृती समजून घेणं आणि पुढे नेणं होय
श्रद्धा की अंधश्रद्धा!
याच मुद्द्यावर समाजात दोन परस्परविरोधी विचार आहेत.
श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास आणि मानसिक आधार.
नवस करणं, देवतेच्या जागी जाऊन नतमस्तक होऊन संकल्प सोडणं आणि तो पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करणं हे सामाजिक आणि भावनिक बंधन आहे.हे माणसाला प्रयत्न वाद शिकवत असते पण हेच जर विचार न करता, अंधानुकरणाने केलं, तर ती अंधश्रद्धा ठरते.
एखाद्या झाडावर वस्त्र बांधलं की सगळी संकटं दूर होतील, असा विश्वास ठेवणं, पण प्रत्यक्षात प्रयत्न काहीच न करणं – हे धोकादायक आहे.
अनेकदा या श्रद्धेचा अतिरेक समाजाला गैरसमज, भय आणि गैरवर्तनाकडे नेतो.

अस्वीकृती
या लेखात व्यक्त केलेले दृष्टिकोन, समज आणि माहिती ही केवळ लोकसंस्कृती, लोकमानस आणि सामाजिक निरीक्षणांवर आधारित आहे. लेखक हे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत.
“डॉ. द. ता. भोसले यांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा” या पुस्तकात लोकसंस्कृतीच्या काही भागावर विस्तृत चर्चा आहे.लेखाचा उद्देश कोणत्याही धार्मिक भावनाला हात घालणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा नव्हे वाचकांनी यातील संदर्भ डोळसपणे विचाराने समजून घ्यावेत.

गजानन खंदारे रिसोड