सुरवातीचे ताजे कलम- खालील मजकूर हा उपहासात्मक आणि वैयक्तिक निरीक्षणा वर आधारित आहे. याचा कुठल्या व्यक्ती, संस्था किंवा अन्य कुठल्याच घटकाशी दुरान्वये ही संबंध नाही. योगाने केवळ लोकशाहीतील संवेदनशीलतेचा आग्रह किंवा अन्वयार्थ म्हणुन गेंड्याची कातडी ओढलेल्या “लोक व प्रशासन व्यवस्थेतील” जबाबदार सेवकांनी स्वतःच्या जबाबदारी प्रती इमान ठेवायला आमची काही हरकत नाही-
✍ पटतंय का पहा!. नाही तर सोडून द्या
काल स्टेट बँकेचा स्थापना दिवस.
तिथल्या व्यवस्थापकांनी गुलाबपुष्प देऊन ‘चार झाडांचा प्रसाद’ दिला.
त्या झाडांचं रोपण समोरच्याच मोकळ्या जागेत – अगदी रस्त्याच्या मधोमध – करावं म्हणून साहित्याची जमवाजमव सुरू झाली.
विचार आला,
“भविष्यात कधीतरी कुणाला तरी सावली मिळेल…”
पण लगेच मनात दुसरा विचार डोकावला…
सावली कुणासाठी?
त्या मायमाऊल्या आठवल्या….ज्यांच्या कपाळावर ३३ कोटींचा संचार असतो, पण पदरात मात्र निवाऱ्याची शून्यता असते.
त्या आजही आपला हक्क सांगण्यासाठी
कधी मोठया दादाच्या उंबऱ्याबाहेर रस्त्यावर तर कधी सत्तेच्या शिखरावर बसलेल्या
पंत किंवा भाऊजीच्या बाजार संकुलापर्यंत
रस्त्यावरच ठिय्या देऊन असतात.
“आपल्या माणसांना” सांगावं म्हंटलं
पण ते पंढरीच्या वाटेवर असल्याने त्यांच्या पर्यंत आमच्या “भावना” कधी पोचल्याच नाहीत.
शेवटी “प्रतीक्षा” तरी किती वेळ करायची म्हणुन?
सद-रक्षण कर्त्यालाच साकडे घालावे म्हंटले, पण कायद्याच्या “छायेत” बसणाऱ्याकडे नेमकी सावली कशी मागायची?
माझं गाऱ्हाणं ऐकून
ना नियतीला माणुसकीचा पाझर फुटतो,
ना प्रशासनाला कधी जबाबदारीचा घाम येतो.
आता आमच्या “ऋषि-तुल्य ” नगरिचेच उदाहरण घ्याना …
इथे अनाथ पशू आणि उपेक्षित नागरिक – सगळेच रस्त्यावर हातात हात घालून, स्वच्छंदी मोकळा श्वास घेतात – जणू काही हीच त्यांची नियती आहे.”
एकाला चारा नाही, दुसऱ्याला छप्पर नाही.
पावसाने कितीही मारलं आणि राजाने कितीही झापडलं तरी तक्रार म्हणुन कधी नाहीच..
कधी वाटतं – रस्त्यावर बसलेल्यांसाठी सावली नको,
पण निदान एक पाणवठा तरी हवा!
काल कुणीतरी म्हणालं होतं – “देवाच्या चरणाशी सावली लागत नाही,
पण माणसाच्या पाठीवर ती दया बनून उगवू शकते…”
म्हणून मी आज संकल्प करतोय …
आद्य पूजेचा मान लाभलेल्या गणेशासमोर…
येत्या अंगारकीपर्यंत
जर रस्त्यावर बसणाऱ्या माझ्या मायमाऊल्यांना
हक्काचं निवारा मिळाला नाही,
तर मी निराहार राहून त्या चार झाडांची लागवड करीन.
आणि ती सावली – हक्काने या सर्वाना अर्पण करीन!

गजानन खंदारे