गजानन खंदारे ✍ पटतंय का पहा !
आपल्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही रक्ताची, काही ओळखीची, काही विचाराची, काही सहवासाची… भावनिक किंवा कर्तव्य भावनेतून जबाबदारीने निर्माण होणारी खरी मौल्यवान नाती तीच असतात जी मायेने आणि कर्तव्यभावनेने घट्ट विणली जातात. आई-वडील, भाऊ-बहीण ही अशीच नाती. यात स्वार्थ नसतो, पैशाचा हिशोब नसतो, यात असतो तो एकमेकांच्या अस्तित्वाचा सन्मान आणि जबाबदारी. मानवी नात्याचे महत्व ठरलेले असतांना “मग सरकारच्या यंत्रणेच्या नजरेत ती बहीण अचानक बोगस कशी झाली?” हा प्रश्न अनेकांना पडलाय! राजकारणातल्या भावानी या नात्याला नवी व्याख्या दिली आहे. निवडणुकांवर डोळा ठेवून, सत्तेचा लाडू खाण्यासाठी मुख्यमंत्री नावाच्या भावाला अडीच कोटी पेक्षा जास्त “गरीब” बहिणीची कीव आली. आणि त्यांच्यासोबत लाडाची बहीण म्हणून नवं नातं निर्माण केलं. या नात्याला नाव दिलं – “लाडकी बहीण – अर्थात आता बोगस लाभार्थी”.
कारण बोगसपण भावाच्या अंगात भिनलाय. भावाने आधी घरात घरफोडी करून, चिन्ह घेतलं एकाच , सत्ता दुसऱ्याची, विचारसरणी तिसऱ्याची घेतली. घर सोडलं म्हणा की फोडलं, हे तुम्हीच ठरवा. आता आपल्याच माहेरचं असं ऐकू आले म्हणल्यावर बहिणीचा दरवाजा बंद होणार, दाजी रागावणार म्हणल्यावर गारुडी भावाने “लाडकी बहीण” नावाने खिरापतीची “कंडी पिकवली”. मग स्वातंत्र्य दिन आणि राखीच्या मुहूर्तावर बहिणीला साडी-चोळीसाठी बिदागी पाठवली.
वरतून सांगितलं की, “दाजी ” पुढं अजिबात हात पसरायचं नाही, जोवर तुझा हा भाऊ “सत्तेच्या लाडूच्या ढिगावर ” बसलेला आहे , तोवर तुला काहीच कमी पडू देणार नाही. आमच्या बहिणी मुळात भोळ्या पार्वती, नवरा महादेव असतो, पण त्याचं न ऐकता भावाच्या ताटात मताचा प्रसाद भरभरून टाकला. मग सुरू झाला खराखुरा हिशोब! . तो राखीचा धागा नव्हता ; तो होता फक्त मतांचा हिशोब. खरी नाती पैशावर मोजता येत नाहीत; ती हृदयाने जपावी लागतात. हे भावाला कसं सांगायचं! मग महिन्याला दीड हजार रुपयांच्या खिरापतीची वाटणी सुरू झाली. भावाला सत्ता हवी होती म्हणून बहिणींना लाडक्या केलं; आता सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर दीड वर्षानंतर अचानक भावाला “आत्मसाक्षात्कार” झाला की २६ लाख ३४ हजार बहिणी या लाडक्या नाहीच तर त्या आहेत बोगस लाभार्थी !
प्रतिष्ठेचा दिखावा की,परंपरेची गमावलेली ओळख? :पटतंय का पहा! click here

आता खर विडंबन इथेच आहे –
आता खरे बोगस कोण? गरीब बहीण की स्वार्थासाठी नात्याचं राजकारण करणारा सत्ताधारी भाऊ ?
आता खरा प्रश्न हा आहे की जनतेच्या पैशातूनच योजना चालते, त्यामुळे जबाबदारी जनते कडेही आहे. पण जबाबदारी फक्त गरीबावर का? जेव्हा आमच्या आया-बहिणी तुमच्या ढिसाळ निकषांमुळे “बोगस” ठरतात, तेव्हा हे विचारायला भाग पडतं – पोटासाठी परराज्यात गेलेली बहीण, नवऱ्याने कुटुंबाच्या निर्वाहासाठी कर्ज काढून घेतलेली चारचाकी असलेली बहीण, मायक्रो फायनान्सच्या कर्जात अडकलेली बहीण, क्रेडिट हिस्टरीमुळे सिबिल स्कोर डॅमेज झालेली बहीण — या सगळ्या फक्त कागदावरच्या उत्पन्नाच्या निकषात बसल्या नाहीत म्हणून बोगस का?
आणखी उपहास बघा –
कधी म्हणतात ई-KYC नाही म्हणून बोगस,
कधी म्हणतात उत्पन्न जास्त म्हणून बोगस,
कधी म्हणतात गाडी आहे म्हणून बोगस,
कधी म्हणतात परराज्यात राहते म्हणून बोगस!
२.५ लाख उत्पन्नावर बहीण बोगस, पण स्वतः खोटी डिग्री सांगून मंत्री झालात तरी बोगस नाही! चारचाकीवर बहीण अपात्र, पण स्वतःचं घर करून !०,००० कोटींचा घोटाळा दाबून दुसऱ्या पक्षात गेलात तरी बोगस नाही! घर ,पक्ष फोडून, सत्तेसाठी खुद्दारी गिळून, मतदानात घोटाळा करून खुर्ची टिकवली तर बोगस नाही! समाजात इस्टेटमधला हिस्सा मागणाऱ्या बहिणीला सुद्धा भाऊ कधी दूर लोटत नाही. लग्न करून बाहेर राज्यात गेली तरी भावाची माया कमी होत नसते .
हे दुहेरी निकष कोणत्या नैतिकतेत बसतात?
बोगस लाभार्थी हा “अंतिम निष्कर्ष नाही” पण खरंच सरकारने निकष ठेवताना समाजाच्या वास्तवाचा अभ्यास केला का? धंद्यासाठी जुन्या मॉडेलची गाडी ही चैनीची खूण आहे का? उत्पन्न निकष ठेवताना मायक्रो फायनान्स, महिला बचतगट, स्वयंरोजगार महामंडळ या सगळ्या यंत्रणांकडे असलेली महिलांची आर्थिक स्थिती तपासली का? राज्यात जवळपास प्रत्येक महिला एखाद्या ना एखाद्या गटाच्या कर्जाच्या विळख्यात आहे. कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज घेणं ही त्यांची शोकांतिका आहे. मग या कर्जाच्या ओझ्यात दबलेल्या बहिणी तुम्हाला श्रीमंत वाटतात? मतदान घेते वेळी त्यांचे अधिवास प्रमाण का बघितले गेले नाही !
सरकार स्वतःच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह लावत नाही; करोडोचा पिक विमा घोटाळा होतो मग संबधित सिस्टम ऐवजी ४ हजार शेतकरी काळ्या यादीत जातात ,लाभार्थ्यांनाच बोगस ठरवतं. जर २६ लाख बोगस असतील तर हा दोष त्या बहिणींचा की तुमच्या व्यवस्थेचा ?
नातं जेव्हा पवित्र असतं तेव्हा त्यात पैशाचा किंवा निकषांचा हिशोब नसतो. पण हे राजकारणातलं नातं भावनिक नव्हतंच. हे नातं सत्तेसाठी निर्माण केलं होतं, म्हणूनच आज ते बोगस झालं. खरी बहीण बोगस होत नाही, पण राजकारणातील भावाची नाती मात्र हंगामी असतात.
सरकारने आता स्वतः मान्य करावं की हा त्यांचा नियोजनातील व व्यवस्थेतील मोठे अपयश आहे .व्यवस्थेतील त्रुटी मान्य कराव्या. बहिणींना बोगस ठरवण्यापूर्वी स्वतःच्या ढिसाळ कारभाराला बोगस ठरवणं गरजेचं आहे..तेव्हा जर खरंच नैतिकतेची उंची दाखवायची असेल तर राजीनामा द्यावा, सत्तेची खुर्ची सोडावी.
“गजानन खंदारे, रिसोड – पत्रकार, लेखक व सामाजिक-राजकीय अभ्यासक.”
Disclaimer: हा मजकूर विडंबनात्मक व उपरोधिक निवेदन आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर थेट आरोप करण्याचा हेतू नाही. उद्देश सामाजिक-राजकीय प्रश्नांवर चर्चेला वाव देणे हाच आहे.
✍️ लेखकांना विशेष आवाहन –
सामाजिक, राजकीय आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लिहिणारे, आपल्या विचारांना धार देणारे लेखक, पत्रकार, अभ्यासक व जनतेचा आवाज बनू इच्छिणारे आपण सर्वांनी पुढे या.
आपले लेख, मतं आणि अभ्यास आमच्यासोबत शेअर करा, जेणेकरून खरी जनमत जागृती होईल.
संपर्कासाठी:
👉 WhatsApp वर लिहा 👈🏻 click