अश्विन शुद्ध नवमीला मी लोढाईच्या माळावर दर्शनासाठी गेलो होतो. त्या दिवशी इथे दरवर्षी एकदिवसीय मोठी यात्रा भरते. “लोढा-आई”चा माळ म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत ठिकाण – हिरवीगार टेकडी, जंगलाचं कवच आणि सभोवताल पसरलेलं गायरान व जंगल क्षेत्र . इथलं मंदिर हे केवळ दगड-विटांचं बांधकाम नाही, तर ग्रामीण लोक आणि कृषी संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे. गावाच्या सीमेवर उभी असलेली सीमांत देवता गावाचं रक्षण करण्यासाठी कधी काळी उभारली गेली असावी. पण आज इथली स्थिती पाहून मन उदास होतं. श्रद्धा आणि विश्वासाच्या नावाखाली इथे व्यावसायिकतेचा बाजार मांडला जातोय का ?. देवापेक्षा “व्यवस्था” मोठी होत आहे का ? त्याच्या मुळाशी मानवी लोभ आणि अतिक्रमणाची भुकेली नजर स्थिरावली आहे का ? इत्यादी गोष्टीचा शोध घेणे गरजेचे वाटते .म्हणून हे लिहण्याचे धाडस करतोय .
आपली कृषी संस्कृती निसर्गाच्या स्वामित्वावर आधारलेली आहे, आणि त्यातूनच ग्रामदैवतांची संकल्पना उदयास आली असावी.प्रत्येक गावाला आपलं ग्रामदैवत असतं – खंडोबा, रेणुका, भैरुबा, जोगाई, जाखाई अशा विचित्र नावांच्या देवता गावाच्या सामूहिक अस्तित्वाचं प्रतीक आहेत. सण, यात्रा, उत्सव यांच्या निमित्ताने गावकरी एकत्र येतात, भेदभाव विसरतात.
पण हे सगळं श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? श्रद्धा ही पाण्यासारखी जीवनदायिनी असते – माणसाला प्रयत्नांची प्रेरणा देणारी. पण जेव्हा ती अंधानुकरणात बदलते, तेव्हा ती पुरासारखी विनाशकारी ठरते.
म्हणूनच “नाटाच्या” अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात:
“शेंदरी हेंदरी दैवते, कोण ती पुजी भुते केते |
आपुल्या पोटा जी रडते, मागती शिते अवदान ||”

या मंदिराची कहाणीही काहीशी अशीच असावी. मोहजा बंदीच्या जंगल क्षेत्रात वसलेलं हे मंदिर. गेल्या अनेक वर्षांपासून अश्विन शुद्ध नवमीला पंचक्रोशीतील यात्रेचं केंद्र आहे. हावशे-गवशे-नवसे इथे येतात. इथे राजकीय नेत्यांना यायला दम लागतो.तरी पण ते बगैर चुलीची पोळी भाजण्यासाठी गर्दी करतात.आजूबाजूला आता अतिक्रमण झालंय. वाहनं उभी करण्याची जागा नाही, ट्रॅफिक जाम होतो.
काही वर्षांपूर्वी पायऱ्या व्हाव्या म्हणून एक पत्रकार म्हणून आम्ही पण यासाठी आमची शक्ती पणाला लावली होती .आता पायऱ्या व सभामंडप उभारलं गेलं. ते स्वागतार्हच . पण त्यानंतर मंदिरावर काहींची नजर गेली आणि ट्रस्ट निर्माण झालं. आता हा ट्रस्ट पुरीचा प्रसाद ठेवतो. यावर्षी तर कहर झाला – पाच वाजता गर्दी कमी झाल्यावर दर्शना साठी म्हणून गेलो .नुसतेच नावाला उभ्या असलेल्या पोलिसासमोर ट्रॅफिक जाम होतांना दिसली. वास्तविक वाहतुकीचे नियोजन करणे किंवा वाहतुकीची कोंडी सोडवणे ही पोलिसांची किंवा संस्थांचीच जबाबदारी नसते. तर ती सर्वांची सामूहिक जबाबदारी असते. मग त्यात भक्त ही आले. वाहतुकीची कोंडी होणारच नाही आणि कुणाला असुविधा होणार नाही याकडे सर्वांनी बरोबरीने लक्ष देणे गरजेचे असते.
मात्र असे होताना दिसत नाही.भक्त स्वतःची जबाबदारी विसरतात.
हल्ली धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली दिखाव्याचं स्तोम वाढलं आहे. कीर्तनाने समाज किती सुधारला? सप्ताहाने किती प्रश्न सुटले? या प्रश्नांची उत्तरं शोधणं महत्त्वाचं वाटते .
मी स्वतःच्या घराण्यातून पाहिलं आहे – आमच्या रक्ताच्या नात्याने ४० वर्षांपूर्वी देवीचं मंदिर उभारलं, सव्वाशे एकरात वनराई फुलवली. त्यातून अखंड विरक्ती साधत आत्म ज्ञान साधना केली . “सत्य असत्याशी केले मन ग्वाही मानियेले नाही बहुमता ..” आजही ती दुर्गा टेकडी लोणारला दिमाखात उभी आहे. पण आयुष्यभर कधीच श्रद्धेचा बाजार मांडला गेला नाही, दिखाऊपणाला स्थान दिलं नाही. किंवा देवासमोर दान पेटीही ठेऊ दिली नाही
आपले पूर्वज देवता गावाच्या वेशीवर उभारत, कारण ती गावाच्या रक्षणासाठी होती. झाडाला नवस बांधायचे, कारण ते विश्वासाचं प्रतीक होतं. पण आज हे सगळं पैशाच्या खेळात बदललं आहे.दिखाऊ पणात परवर्तीत झालं आहे.हि मंदिर आमच्या कृषी संस्कृतीची प्रतीक आहेत.

लोकसाहित्यात या परंपरांना मानाचं स्थान आहे – त्या समाजाच्या जडणघडणीतली जिवंत साखळी आहेत. पण त्यांना अंधपणे स्वीकारणं नव्हे, विवेकाने समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा श्रद्धा अंधश्रद्धेत बदलते, आणि समाज गैरसमज, भय आणि गैरवर्तनाकडे ढकलला जातो.
मी ठरवलं होतं – देवाचं दर्शन घेऊन परत यायचं. पण या व्यावसायिक गोंगाटात मन मात्र उदास झालं. श्रद्धा ही आत्मविश्वास आणि मानसिक आधार आहे, पण तिचा अतिरेक समाजाला विनाशाकडे नेतो.
आपण या परंपरांचा अभ्यास करूया, लोकसाहित्याच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत डोळस श्रद्धा पोहोचवूया. अन्यथा देवळं पैशाचे बाजार बनतील, परंपरा दिखाऊ उत्सवाचे स्वरूप धारण करतील आणि खरी श्रद्धा हरवेल.
तेव्हा पुढील यात्रा उत्सव हा खरखुरा लोकोत्सवाचा जागर कसा होईल यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया!


मोप (ता. रिसोड, जि. वाशीम) येथील चिंतनशील लेखक व अभ्यासक आहेत. शेती माती या माध्यमातून ते ग्रामीण वास्तव, शेती आणि समाजप्रबोधनावर लेखांसाठी ते प्रसिद्ध आहेत @kamachya-goshti.com
✒ डिस्क्लेमर
या लेखातील सर्व विचार, निरीक्षणे व विश्लेषण हे केवळ माहितीपर व जनजागृतीसाठी मांडलेले आहेत. येथे नमूद केलेल्या संस्था, व्यक्ती किंवा घटकांविषयी कोणताही वैयक्तिक पूर्वग्रह, वैमनस्य किंवा द्वेषभावना व्यक्त करण्याचा उद्देश नाही. लेखातील माहिती ही उपलब्ध साधनसामग्री, अनुभव व लेखकाचे वैयक्तिक चिंतन यावर आधारित असून वाचकांनी ती स्वतंत्र विचाराने ग्रहण करावी. यातील आशय हा कोणत्याही व्यक्ती, समाज, राजकीय पक्ष वा धार्मिक समूहाच्या विरोधात नाही. आमचा उद्देश हा फक्त सकारात्मक चर्चेला वाव देण्याचा आहे; वाद, कलह किंवा वैमनस्य निर्माण करण्याचा नाही.
–गजानन धामणे वाशिम मुख्य संपादक
हे पण वाचा 👉🏼👉🏼

सदर बातमी ही चुकीची असून यामध्ये लोढाई माता संस्थान यांचा कुठलाही संबंध नाही किंवा याबाबतीत या संस्थान अध्यक्षांची भेट न घेता व त्यावर चर्चा न करता ही बातमी दाखवली आहे