शेतातली नविन जिन्नसाची नव्हाळी घेऊन आई एखाद्या घरी पाठवायची.
तेव्हा त्या घरातील स्त्री नम्रपणे म्हणायची—
” बाळ, आमच्याकडे आधीच माहेरकडून वानूळा आलाय.”
मग प्रश्न पडायचा हा वानूळा म्हणजे नेमकं काय?
आणि संक्रांतीला स्त्रिया “वाण” का देतात?
तर या प्रश्नाचे सोपे उत्तर म्हणजे
“वाण” हा बोलीभाषेतील अतिशय प्रभावी शब्द आहे.
ज्याला कशाचीच वाण नाही—म्हणजे कमतरता नाही—अशी संपन्नता आणि पुरेपणाची जाणीव हा शब्द व्यक्त करतो.
याच शब्दातून पुढे वाण देणे ही संकल्पना रूढ झाली असावी.
“वानूळा” हा शब्द कदाचित “वाणवळा” या शब्दातूनच आलेला असावा.
गावखेड्याची लोकसंस्कृती ही मुळात कृषीसंस्कृती आहे.
ती ब्रह्मा किंवा विष्णूला केंद्रस्थानी मानणारी नसून,
शेती आणि मातीशी घट्ट नातं बांधणारी आहे.
जर ही संस्कृती केवळ देवकेंद्रित असती,
तर आज गावोगावी मारुतीऐवजी ब्रह्मा आणि विष्णूची मंदिरे दिसली असती.
पण वास्तव वेगळं आहे.
शेतीच्या संस्कृतीत ब्रम्हा आणि विष्णुला देव म्हणुन कधीच मान्यता मिळाली नाही.
उलट संत विचाराने प्रभावित
ही संस्कृती निसर्गाचे स्वामित्व आणि अस्तित्व—दोन्ही मान्य करते.

मोफत स्थळे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चारशे वर्षांपूर्वी घनदाट जंगल असताना तुकाराम महाराज म्हणतात—
“वृक्षवल्ली आम्हां सोयरे…”
म्हणजे निसर्गाशी आपुलकीचं, सोयरेपणाचं नातं ते जाहीर करतात.
म्हणूनच आपल्या लोकसंस्कृतीत प्रत्येक सण हा कृतज्ञतेच्या भावनेने साजरा होतो.
पोळ्याला बैलाची, नागपंचमीला सापाची पूजा केली जाते— कुठल्या देवाची नव्हे!
कारण हे सगळे शेतीचक्राचे अविभाज्य घटक आहेत.
शेतीसंस्कृतीचं एक महत्त्वाचं आणि मूलभूत अंग म्हणजे “दानत वृत्ती.”
म्हणजे दान देणे —
स्वतःच्या गरजेपुरतं ठेवून उरलेलं इतरांना वाटून देणं.
या जगात सर्वात मोठा दाता जर कोणी असेल,
तर तो म्हणजे निसर्ग.
भरभरून देणं हे निसर्गाला माहीत आहे.
निसर्गानंतर दुसरा मोठा दाता जर कोणी असेल,
तर तो म्हणजे शेतकरी.
विंदा करंदीकरांची कविता हीच भावना सांगते—
“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे…
….एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.”
आता—
संक्रांत हा ऋतुबदलाचा सण आहे.
शेतीचा एक हंगाम संपलेला असतो.
सूर्याचं भ्रमण उत्तर व दक्षिण दिशेकडे होतं—
त्यालाच आपण उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतो.
आपली संस्कृती ही मुळात स्त्रीप्रधान, मातृसत्ताक आहे.
घर चालवणारी स्त्री हीच घराची खरी कारभारीण असते.
यातूनच कदाचित
“वाणवळा”—म्हणजे शेतातील बोरं, बिब्बा, भाजीपाला इतर नव्हाळी
गरजेपुरती ठेवून, मातीचं भांडं भरून
एकमेकींना वाटण्याची प्रथा रूढ झाली असावी.
हाच पुढे “वाण” झाला.
नवीन सून नेमकी कुठल्या घरची आहे, हे अनेकांना माहिती नसायचं.

स्थळाला थेट संपर्क फक्त सभासदांसाठी
म्हणूनच—
“घेता कोणाची? देता कोणाची?”
ही उखाण्याची पद्धत पुढे आली.
कालांतराने मात्र
या साध्या, नैसर्गिक, कृतज्ञतेच्या संस्कृतीत
अनेक थोतांड, दिखावा आणि विकृती घुसवली गेली.
वीरक्त तत्त्व असलेल्या शिवाची— म्हणजे महादेवाची—
निर्विकार मनाने आराधना करणं ही आध्यात्मिक संस्कृती आहे.
पण “भोले का प्रसाद” म्हणून चिलमीचा धूर काढणं,
रस्त्यावर डीजेचा उन्माद दाखवणं—
ही आध्यात्मिकता नसून सामाजिक विकृती आहे.
आणि जर विकृतीला विकृती म्हणताना
आम्हाला कोणी देवविरोधी किंवा धर्मविरोधी ठरवत असेल,
तर तुकाराम महाराजांच्या शब्दांत सांगायचं तर—
“बरे झालो देवा,आम्ही कुणबीच जाहलो…
नाही तरी दंभेची….”
© गजानन खंदारे
जिल्हाध्यक्ष – संभाजी ब्रिगेड, वाशिम
app.lagnaakshada.com
कॉपीराइट व डिस्क्लेमर
© गजानन खंदारे.
हा लेख लेखकाच्या वैयक्तिक विचार, अनुभव व लोकसंस्कृतीच्या अभ्यासावर आधारित आहे.लेखातील मजकूर लेखकाची पूर्वपरवानगी शिवाय कॉपी, पुनर्प्रकाशित किंवा व्यावसायिक वापरासाठी वापरू नये.
हा लेख कोणत्याही धर्म, देव किंवा श्रद्धेचा अपमान करण्याच्या उद्देशाने लिहिलेला नसून,धर्माच्या नावाखाली झालेल्या सामाजिक विकृतींवर वैचारिक भूमिका मांडतो.
लेखक ✍🏼
