✍ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
👉 आज मला कामानिमित्त चिखली व तेथून पुढे वरुड बु. येथे जायचे होते. दूरच्या प्रवासात जायचे म्हटले की, सकाळी लवकरच निघावे लागते. आजही सकाळी साडेआठलाच मी घराबाहेर पडलो. 8.45 वाजता वाशिम – यावल गाडी मिळाली. त्यामुळे थेट चिखली पर्यंत एकाच बसने पोहोचणार होतो. सकाळचीच वेळ असल्यामुळे गाडीत जागाही मिळाली. गाडी मालेगाव च्या नवीन बस स्थानकावर पोहोचली. तेथील बस स्थानकाची नवीन इमारत आकार घेत असल्यामुळे तात्पुरते बनविलेल्या बस स्थानकासमोर बस थांबली.

बस थांबताच एक सडपातळ तरुण आपल्या हातावर मोठ्या गंजाचे झाकण असलेल्या ट्रे मध्ये कचोरी, समोसे, वडे घेऊन एसटीमध्ये चढला.
एव्हाना कंडक्टरने सूचना केली होती की, ही गाडी चहा नाश्त्यासाठी येथे 15 मिनिटे थांबेल.
गाडी थांबल्यानंतर तो युवक कचोरी, समोसे वड्याचा ट्रे घेऊन बस मध्ये चढला आणि मोठ्या आवाजात म्हणाला की, प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, ही गाडी 15 मिनिटे येथे चहा पाण्यासाठी थांबणार आहे. माझ्याकडे गरमागरम समोसे, कचोरी, वडे भजे आहेत. कुणाला पाहिजे असतील तर पटापट घ्या. येथून गाडी सुटल्यानंतर दुपारपर्यंत कुठेही थांबत नाही.
एवढी सूचना केली आणि बस मध्ये शेवटच्या सीट पर्यंत तो कचोरी घ्या, समोसे घ्या, वडे घ्या असे म्हणत होता. गरमागरम असल्यामुळे नाश्ता करून घ्या, असे तो बोलतही होता आणि मागणाऱ्याला पटापट देतही होता. अवघ्या पाच मिनिटात त्याने ऑर्डर केलेल्यांना कचोरी वडे दिलेत.तो मुलगा काही वर्षांपूर्वी पातुर येथील बस स्थानकासमोर खरमुरे फुटाणे वगैरे साहित्य विकायचा. माझे सततचे येणे जाणे असल्यामुळे तेव्हापासूनच तो मला ओळखायचा. आता तो मालेगाव येथील बस स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रीचे काम करतो. मी जेव्हा जेव्हा येथून जातो त्यावेळेस त्याची भेट होतेच. मी कधीही खाद्यपदार्थ घेत नाही. परंतु तो मला नेहमी विचारतो, साहेब काही घेणार का?
हे कुणीतरी विशेष व्यक्ती आहेत असे त्याला माझ्याबद्दल वाटत असावे. त्यामुळेच तो नेहमी मला आदराने बोलतो.त्याच्याशी चर्चा करून त्याचा एक फोटो घ्यावा आणि त्याच्याबद्दल बरच काही लिहावं असं अनेक दिवसांपासून माझ्या डोक्यात होतं, मात्र, फोटो घेण्याचा काही योग येत नव्हता. आज मात्र, बस मध्ये गर्दी कमी असल्यामुळे मी त्याला फोटो घेण्याबद्दल बोललो, त्यानेही निसंकोचपणे घ्या साहेब म्हणत फोटो काढू दिला.
हा फोटो शेअर करणे मला उचित वाटत नाही, मात्र, माझ्या मोबाईल मध्ये सेव असणार आहे.हा मुलगा रोजी – रोटी साठी खाद्यपदार्थ विक्री करत असेल? यात विशेष काय? याबद्दल आपल्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील?मात्र, या मुलाविषयी माझ्या मनात जे प्रश्न निर्माण झालेत, त्याची उकल मी या प्रवास वर्णनातून करणार आहे.
मुळात तो मुलगा तेथील बस स्थानकाजवळ असलेल्या एखाद्या हॉटेलमधील खाद्यपदार्थ बसमधील प्रवाशांना विकत असेल, त्याला नगा प्रमाणे दर ठरविलेले असतील किंवा त्याला ठराविक रोज मजुरी मिळत असेल, यामध्ये अधिक खोलात न जाता, खरंच त्याला पुरेशी मजुरी मिळत असेल का? या मिळणाऱ्या मजुरीतून त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असेल का? हा प्रश्न माझ्या मनात ज्यावेळेस निर्माण होतो, त्यावेळेस नाही असेच उत्तर मला मिळते.
कचोरी समोसे विकल्यानंतर नगा प्रमाणे जरी त्याला मजुरी मिळाली मिळत असेल तरी दीडशे दोनशे रुपयांच्या वरती जात नसेल, किंवा महिन्यावरी असेल तरीही चार-पाच हजाराच्या वर त्याला काही मिळत नसेल, मग एवढ्यावर तो कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करू शकेल? जर लग्न झाले असेल तर एवढ्या पैशात त्याला सगळं अशक्यच आहे,
तरीसुद्धा अत्यंत मेहनतीने तो हे सर्व करत आहे, उदरनिर्वाहासाठी,
या मुलासारखे कितीतरी लोक वेगवेगळ्या बस स्थानकांवर खरमुरे, फुटाणे, फळे विक्रीचे काम करतात. या मुलाबद्दल मला जे वाटते , तेच त्या इतर सर्वांबद्दलही आहे. यात वेगळेपण काही नाही.आज महागाई गगनाला भीडली आहे. चांगला चहा प्यायचा म्हटलं तर दहा रुपये कट प्रमाणे पैसे मोजावे लागतात.
यावरून महागाईची तुलना आपण करू शकतो. मग अशा परिस्थितीत तुटपुंज्या मजुरीवर काम करणाऱ्या या मुलासारख्या अशा असंख्य बेरोजगारांचे काय हाल असतील? हा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा आहे.मुळातच मी संवेदनशील विचाराचा असल्यामुळे अशा बाबींकडे बारकाईने लक्ष देत असतो. त्यांच्या ठिकाणी मी स्वतःला उभे करून निरीक्षण करत असतो. त्यामुळेच त्या मागील भीषणता माझ्या लक्षात येते.
असो,पंधराते वीस मिनिटानंतर मालेगाव वरून गाडी पुढे मार्गस्थ झाली, मालेगावच्या जुन्या बस स्टँड वरून बरेच प्रवासी बस मध्ये चढले.
बसमधील सर्व आसणे
फुल्ल असल्यामुळे चढलेल्या प्रवाशांना उभे राहावे लागले. पुढे गेल्यानंतर डोणगाव मध्ये आणखी काही प्रवासी चढले. आता उभे राहणारांमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी झाली होती.डोणगाव बस स्थानकावरून गाडी पुढे निघाल्यानंतर जागेवरून काही महिलांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाले. त्या जोरात एकमेकांना बोलत होत्या.
गर्दीत प्रवास करताना एकमेकांना धक्का लागतोच, मात्र, काही लोकांना सहन होत नाही.
त्यामुळे मेहकर मध्ये उतरताना एका म्हातारीने कुणाकडे तरी इशारा करत गर्दी सहन होत नसेल तर बसमधून प्रवास करायचाच नाही, आपलं आलिशान खाजगी गाडीने प्रवास करावा. असा टोमणा मारून म्हातारी जानेफळ फाट्यावर बस मधून उतरली. प्रवासादरम्यान जी बाचाबाची झाली होती त्यामुळेच ही आजी बोलली असावी.
मेहकर स्टैंड वर बरेच प्रवासी उतरले, आणि बरेच प्रवासी बस मध्ये चढले. चिखली स्थानकावर मी बस मधून उतरलो.तेथून मला वरुड बुद्रुक येथे जायचे असल्यामुळे चिखली येथून जाफ्राबाद कडे जाणारी बस पकडायची होती. ही बस येण्यासाठी मला अर्धा तास वाट पाहावी लागली.
ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बसेस मधील गर्दी मोठ्या प्रमाणात असते. ही बस सुद्धा प्रवाशांनी फुल भरली. या बस मध्ये पायऱ्या जवळ एक 75 च्या वर वय असणारे आजोबा बसलेले होते. त्यांना आनंदवाडी येथे उतरायचे होते. मात्र वयोमानानुसार त्यांना आनंदवाडी आल्याचे लक्षात आले नसावे. गाडी थोडी पुढे गेल्यानंतर मला आनंदवाडीला उतरायचे, असे ते कंडक्टरला म्हणाले. यावेळी कंडक्टर सुद्धा त्यांच्यावर चिडले, आपल्याला उतरायचे होते तर आवाज का नाही दिला. आनंदवाडी तर मागे गेली,
शेवटी मधातच बस थांबवून त्यांना उतरून दिले.यावेळी बसमधील प्रवासी त्या आजोबांबद्दल बोलत होते, या वयात घरी बसावं, आराम करावा, तर नाही! फुकटचा प्रवास आहे म्हणून हे म्हातारे , रिकामटेकडे बसने फिरत असतात, आणि एसटीत गर्दी करत असतात. तीन-चार जणांच्या तोंडून हे शब्द ऐकायला मिळाले.
एखाद्या वेळेस काही महत्त्वाचे दवाखान्याचे वगैरे काम असू शकते, मात्र, आपल्या नातवाला किंवा मुलाला घेऊनच अशा आजोबांनी प्रवास करावा जेणेकरून कंडक्टर अथवा इतरांना त्रास होणार नाही.
अशा प्रतिक्रिया उमटल्या.पुढे थोड्याच वेळात वरुड आले, तेथे उतरलो ठराविक काम आटोपले.
येथे एका शॉप वर एक प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला.तो असा की , एक 75 वर्षे वय असणारी आजी आपल्या साधारणतः 50 ते 52 वय असणाऱ्या मुलाला घेऊन एका बँकिंग सेंटरवर आली होती. तिला कदाचित दरमहा मिळणारे पैसे काढायचे होते किंवा पी एम किसान योजनेचे पैसे काढायचे होते.
तिचा जो काही व्यवहार करायचा होता तो थेट ती ग्राहक सेवा केंद्र वाल्यांची बोलत होती. तिला हव्या असलेल्या माहिती बाबतचे प्रश्न ती त्या ग्राहक सेवा केंद्र वाल्यांना विचारत होती.
या दोघांचा हा संवाद सुरू असताना त्या आजीबाईच्या मुलाने मदतच प्रश्न केला आणि आजीबाईंना म्हणजेच त्यांच्या आईला काहीतरी सुचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या आजीबाईंनी तू चूप बस, माझं काम मला करू दे! अशा अविर्भावात आपल्या त्या मुलाला बोलले आणि शांत केले.
थोड्यावेळाने त्यांचे काम आटोपल्यानंतर ते दोघेही मायलेक तेथून निघून गेले.या घटनेचा आवर्जून उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, आई-वडिलांचा आदेश शिरसावंद्य मानणारी ती जुनी पिढी आहे. तो मुलगा पन्नास वर्षाच्या वर असतानाही आपल्या आईला उलटून बोलला नाही. म्हणजेच आई-वडिलांप्रती जुन्या लोकांमध्ये किती आदरभाव आहे हे दिसून येते. त्यातल्या त्यात ते शेतकरी कुटुंब असल्यामुळे हा आदरभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.
यांच्याच ठिकाणी अलीकडील काळातील आई आणि मुलगा असते तर कदाचित सर्वांच्या समोर बोलल्यामुळे त्या मुलाला आपल्या आईचा राग आला असता. पण येथे असे घडले नाही.मुलगा कितीही मोठा असला तरी, तो आपल्यासाठी मुलगाच असतो, त्यामुळेच प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना बोलत असतात, रागावत असतात. हल्ली मात्र काही वेगळे चित्र दिसून येत आहेत.
असो,माझे काम आटवून मला परतीच्या प्रवासाला निघायचे होते, बस स्टैंड वर आलो तर बसचा पत्ता नाही, वरतून पाऊस सुरू आणि तासभर उलटला तरी बस आली नाही. शेवटी सव्वा तासानंतर एक बस आली, तोपर्यंत ती 40 प्रवासी येथे जमले होते.पुन्हा बस मध्ये प्रवेश आणि पुन्हा तसीच गर्दी,
गर्दीच्या प्रवासातच चिखली गाठले. तेथून मेहकर आणि मेहकर वरून रात्री नऊ वाजता वाशिम पोचलो.एसटी बसचा प्रवास म्हणजे जीकिरीचे काम झाले आहे.
प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि बसेसची संख्या त्या तुलनेत प्रचंड कमी, त्यामुळे बसेस आणि प्रवाशांचे समीकरण जुळता जुळेना, आणि प्रवाशांचे हाल काही थांबता थांबेना, असो हे असेच चालत राहणार…
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी प्रवासातील अनुभव हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा तेवीस वा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. )
प्रवासातील अनुभव…
( भाग : 23 )
सोमवार दि. 23 जुलै 2025 रोजीचा अनुभव…
एसटी बसेस मध्ये खाद्यपदार्थ विकून तो आपला उदरनिर्वाह करू शकत असेल का?
✍ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
9881204538
सन्माननीय गजानन खंदारे सर आपण माझ्या प्रवासातील अनुभवास प्रसिद्धी दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.