असं म्हणतात की “पॉलिटिक्स इज द गेम ऑफ स्काउंड्रल्स” म्हणजेच राजकारण हा बदमाशीचा खेळ असतो. बदमाशी ही राजकारणाची उपजत खूण आहे हे मान्य केलं, तरी जेव्हा ही बदमाशी कारस्थानीपणात, कपटी डावपेचात रूपांतरित होते, तेव्हा ती लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक ठरते. आज आपण पाहतोय की शिवसेनेची फोड झाली, राष्ट्रवादीची दोन शकले झाली, आणि या सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे मानवी संवेदनांना, माणुसकीला फारशी किंमत राहिलेली नाही.
पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन आठवा. पाण्याचे फवारे सोडले, रस्त्यात खिळे ठोकले, शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवले. सातशेहून अधिक शेतकरी शहीद झाले, तरी सरकारची मने द्रवली नाहीत. मध्य प्रदेशात आंदोलनकर्त्यांवर गोळीबार झाला. आता मुंबईतल्या मराठा आंदोलनातही दोन जीव गेले. पण सत्तेत असणाऱ्यांना त्याचे ओझं जाणवलं का ?
२९ ऑगस्टला मराठ्यांचा सैलाब मुंबईत येणार हे सरकारला आधीच ठाऊक होतं. “मायबाप” सरकार म्हणून उत्तरदायित्व झटकता येत नाही. पण सरकारी सूत्र ऐन वेळी गुणरत्न सद्वर्तनी व्यक्तीच्या हाता तोंडात दिली . खर तर प्रत्येक आंदोलनाचा जन्म हा वेदनेतून होत असतो . मराठा समाजाची वेदना फक्त राजकीय नाही, तर पिढ्यान्पिढ्या पेटलेलं दुःख आहे. तरी काही जणं हे आंदोलन राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं सांगत होते . सांगू देत …
इतिहास नेहमीच गंभीर प्रश्न विचारतो. १९८० च्या दशकापासून आरक्षणाचा मुद्दा समोर येतोय. २००९ मध्ये संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरली, आंदोलन पेटलं, गुन्हे दाखल झाले. २०१६ मध्ये मराठा समाजाने ५८ हून अधिक शांततेचे मोर्चे काढले – जगाला आदर्श दाखवला. तरी प्रत्येक वेळी सरकारने फक्त आश्वासन दिलं. आजही तीच कथा नव्या “कागदावर” पुन्हा लिहून दिली
हा कसला चौथा स्तंभ! चौथा धंदा झालाय पत्रकारिता 💥 खरे सत्य पहा vdo पाहण्यासाठी click करा
आता पुन्हा प्रतिआंदोलन उभं राहतंय. पिवळ्या रुमालांचे, ढवळ्या दाढीच्या बुवाचे मेळावे भरताहेत. आरोप असा की आंदोलकांना दारू वाटली गेली , आंदोलनाला बदनाम करण्याचं कंत्राट एक डोळा लाडूवर तर दुसरा जलेबीवर असलेल्या ठरावीक लोकांना आणि त्यांना साथ देणाऱ्या माध्यमांना दिलं गेलं होत . आणि गंमत म्हणजे – एक डोळा पाकिस्तानवर व दुसरा बांगलादेशावर ठेवून उपदेश करणारे हे बाबा आंदोलकांना दारुडे ठरवतात. पोलिसांनी दारू वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलकांच्या अंगावर चिखलफेक केली जाते. त्याहून गंमत म्हणजे – कोणत्याही संविधानिक किंवा अधिकृत पदावर नसताना नवरा-बायको मिळून दोघेजण सर्वच माध्यमांचा अख्खा टीव्ही मेडिया चालवतात , आणि पत्रकार, पत्रकार म्हणून नव्हे तर चॅनेलचे मालक असल्यासारखं वागतात – हे काय प्रेक्षकांनी गिळून टाकायचं का? “सदावर्तेची ” सटकली… पण कशासाठी? उपोषणाला बसला म्हणून? की जरांग्याला धुतलं म्हणून? मग २४ तासांच्या दिवसात १६ तास फक्त हेच दोन तीन चेहरे कधी काळा चष्मा लाऊन तर कधी पिवळा रुमाल गळ्यात टाकून टीव्हीवर का दाखवले जातात ? बरे हि माणसे एवढी घाबरट आहेत कि ऐन पावसाळ्यात थोडी पावसाची बुर बुर जरी झाली तरी लगेच ढग फुटीच्या बोंबा , वरतून पावसाने हल्ला केल्याचा कांगावा!
मग प्रश्न आहे – हा संघर्ष समाजासाठी आहे की राजकारणासाठी ? आंदोलनाच्या खऱ्या वेदनेला झाकण्यासाठी माध्यमं काही निवडक चेहऱ्यांच्या गप्पा का रंगवतात ?
आणखी गंभीर बाब म्हणजे, आंदोलन पेटलं असताना आरएसएस, बजरंग दल किंवा गुरूजींचे अनुयायी कुठेच दिसले नाहीत. मराठ्यांना पाणी, अन्न देण्यासाठी कोणी पुढे आलेलं नाही. सुप्रिया सुळे यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या गेल्या का? जर गेल्या असतील तर डोळे सांगतील, पण बातम्यांचा रोख अचानक का बदलला हे कुणालाच का दिसले नाही .सरकारच्या प्रमुखांनी काही चॅनेल्सशी सूचक भेटी दिल्या अन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले म्हणून तर हे झाले नसावे ?
याचवेळी महिला पत्रकाराच्या विनयभंगाचा मुद्दा १०० मीटर धावण्याच्या शर्यती सारखा पुढे आला. सार्वजनिक जीवनात बऱ्याचदा शब्दांनी, अर्वाच्य भाषेत, अपमानास्पद बोलण्यातूनही विनयभंग होतो. कायद्याने तो गुन्हा ठरेलच असं नाही, पण समाजशास्त्रीय दृष्टीने, नैतिकतेच्या कसोटीवर तो नक्की गुन्हा आहे. महिला पत्रकाराला लक्ष्य करणं, तिचा सन्मान दुखावणं हे महाराष्ट्राच्या सभ्यतेला शोभणारं नाही.
लोकशाहीचे चार आधारस्तंभ – विधानमंडळ, कार्यकारी, न्यायव्यवस्था आणि माध्यमे – यांपैकी माध्यमे हा स्तंभ सर्वात गढूळलेला दिसतोय हल्ली . सत्य उलगडण्याऐवजी माध्यमं एखाद्या अजेंड्याचं, एखाद्या गटाचं भजन करताहेत. लोकशाहीला बळकट करणारा चौथा स्तंभ म्हणून नव्हे तर नफा कमावणारा चौथा धंदा म्हणून माध्यमांकडे आज लोक पाहू लागलेत.
मग या सगळ्या प्रश्नांच्या गर्तेत खरी कसोटी आहे – आंदोलन समाजाच्या वेदनेतून जन्मलंय की सत्तेच्या कपटकारस्थानातून? आणि माध्यमांनी आंदोलनाचं सत्य दाखवलंय का, की पुन्हा एकदा लोकशाहीला बाजारात मांडून टाकलंय?
गजानन खंदारे रिसोड
सूचना
लेखातील मजकूर लेखकाच्या वैयक्तिक निरीक्षणांवर आधारित आहे. यामध्ये दिलेले मुद्दे कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समूहाची बदनामी करण्याच्या उद्देशाने लिहिलेले नाहीत. सकारात्मक चितन व चर्चेसाठी आम्ही सदैव तयार आहोत वादासाठी नव्हे !
लोकशाहीला बळकट करणारा चौथा स्तंभ म्हणून नव्हे तर नफा कमावणारा चौथा धंदा म्हणून माध्यमांकडे आज लोक पाहू लागलेत. Yes
वरील मताशी मी सहमत आहे. ✅👆
मुंबईला आंदोलन सुरु असतांना लाखोंच्या संखेने मराठा बांधव मुंबई मद्धे पोचले असतांना त्यांची तिथे राहण्याची, खाण्या पिण्याची काय व्यवस्था आहे हे सोडून टीव्ही वर जास्तीत जास्त तो गुणरत्न सदावर्ते व त्याची पत्नीच जास्त दाखवत होते.
ह्यातून टीव्ही चैनल, मीडिया, कुठेतरी विकल्या गेले की काय असे लक्षात येते 👆