वाशिम पासून जवळच असलेल्या तामसी येथील शिवाजी कव्हर व सौं किरण कव्हर हे दमपत्ती गेली अनेक वर्ष अनावश्यक धार्मिक प्रथेला फाटा देऊन घरात गौरी ऐवजी जिजाऊ सावित्री पूजन करून ग्रंथ पूजन करतात. हे बदलते स्वरूप नेमके आपल्या संस्कृती परंपरेला धरून आहे कि विरोधात याबाबत या लेखातून केलेला हा थोडक्यात उहापोह हे करत असताना आपल्या मूळ पारंपारिक प्रथांचा आदर ठेवून ग्रंथ व महामानवाचे प्रतिमा पूजन यातून ते समाजासमोर अनुकरणाचा एक नवा आदर्श मांडत आहेत. “मग ते चूक की बरोबर ही नेमकी श्रद्धा की अंधश्रद्धा” याबाबत चर्चा होत असताना या परंपरे मागची मूळ प्रथा अपरिहार्य पणे समजून घेणे गरजेचे आहे.-गजानन खंदारे लेखक
आज घराघरांत गौरी आवाहन झाले असून उद्या पूजन व विसर्जनाची तयारी सुरू आहे. हा सण महाराष्ट्रात शतकानुशतके पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. धार्मिकतेच्या दृष्टीने या सणाकडे पाहिले जात असले तरी हा सण केवळ धार्मिक नसून कृषी संस्कृतीशी निगडीत असलेलाच एक सोहळा आहे.घराघरात गौरीचे आगमन म्हणचे आनंदाचे, समृद्धीचे व कौटुंबिक एकतेचे प्रतीक मानले जातो.पूर्वीच्या काळी शेतकरी पावसाळ्यानंतर भरघोस पीक घेण्याच्या आशेने ग्रामदेवता व निसर्गदेवतांचे पूजन करत असत. धान्य, फुले, झाडे, पाणी यांचे महत्व जाणून स्त्रिया “गौरी” आणत आणि तिची पूजा करून घरात समृद्धीचे आगमन व्हावे अशी प्रार्थना करत. प्रत्यक्षात गौरी ही निसर्गमातेचे, उर्जेचे व धन धान्याचे प्रतीक होती.धार्मिक दृष्टिकोनातून पाहता गौरी म्हणजे पार्वतीचे स्वरूप मानली जाते. शिवपत्नी पार्वती ही अन्नपूर्णा व लक्ष्मी या रूपात घराघरांत स्थिरावते. म्हणूनच गौरी पूजनामध्ये स्त्रिया साडी, फुले, बांगड्या, कुंकू धन व धान्याच्या राशी घालून सजवतात. जे स्त्रीशक्तीचे सन्मानचिन्ह व धान्य समृद्धीचे प्रतीक मानले जाते.अनेक ठिकाणी मूळ परंपरेच्या प्रथामध्ये बदल होताना दिसतो मग हा मूळ परंपरेचा ऱ्हास होतो असे म्हणता येणार नाही. तर कालानुरूप यामध्ये सकारात्मक बदल स्वीकारणे आवश्यक आहेयामागचा नेमका प्रतीकात्मक अर्थ काय?तर
“गौरी आगमन म्हणजे धान्य घरात येणे म्हणजे समृद्धीचे आगमनपूजन म्हणजे स्त्रीशक्तीचा गौरव व कौटुंबिक एकता
विसर्जन नश्वरतेची जाणीव आणि सतत चालणाऱ्या सृष्टी व जीवनचक्राचा स्वीकार हे खऱ्या अर्थाने कृषी संस्कृतीचे अभिन्न अंग आहे.” बदलते स्वरूप नेमके कायगेल्या काही वर्षांत पारंपारिक गौरी-लक्ष्मी पूजनासोबतच जिजाऊ, सावित्री, अहिल्या अशा स्त्रीपुरुषार्थाच्या प्रतीकांच्या मूर्ती व प्रतिकांचे पूजन होताना दिसते. काही ठिकाणी घरातील महिलांचे पूजन होताना पण दिसते. समाजात महिला आदर्शांची ओळख निर्माण व्हावी, त्यांचा सन्मान व्हावा म्हणून ही चळवळ काही घरांत रूढ झाली आहे.
मग ही नेमकी
श्रद्धा की अंधश्रद्धा? श्रद्धा तिथे आहे जेथे स्त्रीशक्ती, निसर्ग, अन्नधान्य व संस्कृतीचा गौरव केला जातो.पण अंधश्रद्धा तिथे होते जेव्हा केवळ गौरी आल्या तरच सुख-समृद्धी येईल, विसरल्या तर अपशकून होईल अशा “भीतीच्या कथांना” खतपाणी घातले जाते.धार्मिक सणाचा खरा हेतू आनंद, सामाजिक एकोप्याची जाणीव व निसर्गपूजनाची परंपरा यात आहे, भीती व दडपशाही यात नाही.महाराष्ट्रातील अनेक भागांत आज गौरी आगमनाच्या पारंपारिक पूजा सुरू झाल्या आहेत. उद्या विविध घरांत व समाजिक मंडळांत पूजा-अर्चा होऊन गौरीचे विसर्जन केले जाईल. बदलत्या काळात गौरी-लक्ष्मीच्या पूजनाबरोबरच जिजाऊ व सावित्रीसारख्या ऐतिहासिक स्त्रीआदर्शांचे पूजन करून स्त्रीशक्तीला आधुनिक अभिव्यक्ती दिली जात आहे.
त्यामुळे जिजाऊ सावित्री अहिल्या इत्यादींच्या प्रतिमांचे व प्रतीकांचे पूजन करून स्त्री सन्मान करणे हेच खरे गौरी पूजन आहे व
“समाजातील श्रद्धा जपताना अंधश्रद्धेला दूर ठेवणे हीच खरी काळाची गरज आहे.“

लेखन : गजानन खंदारे रिसोड
संदर्भ पुस्तके :– भारतीय लोकपरंपरा व लोकधर्म
Disclaimer
वरील लेख हा लोकपरंपरा, सामाजिक श्रद्धा व उपलब्ध संदर्भांवर आधारित माहितीपर लेख आहे. कोणत्याही देव-देवता, धार्मिक प्रथा किंवा व्यक्तीच्या भावनांना धक्का पोहोचवण्याचा उद्देश नाही. हा लेख केवळ माहिती, सामाजिक जाणीव आणि परंपरेच्या अभ्यासाच्या दृष्टीने सादर केला आहे.