मराठा समाजाची शिस्तप्रिय परंपरा
मुंबईतल्या रस्त्यावर संयमी व शांत मराठ्यांचे आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाच्या मागण्या आजच उजागर झाल्या असे नाही. अटकेपार झेंडे लावणारा मराठा समाज शतकानुशतकांपासून शांत, शिस्तप्रिय आणि मेहनती म्हणून ओळखला जातो. संकटातही संयम राखणारा हा समाज जेव्हा आपल्या हक्कासाठी आंदोलन करतो, तेव्हा सरकारकडून त्याला जाणीवपूर्वक दारुडे, उद्रेकी, अराजकवादी म्हणून दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे. ही केवळ बदनामी नसून समाजाच्या सहनशीलतेला चिथावणी देण्याचा घाणेरडा प्रकार आहे. आंदोलकांवरील अन्यायकारक वागणूक:- मुंबईत आंदोलन चालू असताना ज्या पद्धतीने मराठ्यांना त्रास देण्यात आला ते लाजिरवाणंच नाही तर महाभयंकर आहे. आंदोलक जेव्हा मुंबईत दाखल होत होते तेव्हा जागोजागी त्यांची पोलिसांकडून अडवणूक करण्यात आली.
आझाद मैदानावर सतत धार पावसामुळे चिखल व गुडघ्यात पाणी साचलेले, लाईट बंद करण्यात आले. हॉटेल बंद ठेवून दारूची दुकान उघडी ठेवण्यात आली. टेम्पोत स्वयंपाक किंवा खिचडी शिजवणाऱ्या मराठ्यांची आडवणूक करण्यात आली. अशातच रात्र गेली. “महासत्तेचं केंद्रबिंदू असलेल्या महा-मुंबईत सकाळी “हागायची” पण सोय नव्हती! संडासला कुलूप लावण्यात आले. जे उघडे होते तिथे मुद्दाम पाणी नव्हते. ” एका पाण्याच्या बॉटलची किंमत अचानक पन्नास रुपया वरून शंभर रुपयावर गेली. जरांगे पाटलाच्या उपोषणाला समर्थन देणारे मराठे भुकेने व्याकुळ झाले तेव्हा अन्नपाण्याच्या शोधार्थ इतरत्र भटकत असताना आमदार निवासातील कॅन्टीन बंद करण्यात आले. खाऊ गल्ली, हॉटेल्स बंद केले गेले
चिखल पावसात दारुडे ठरवून आंदोलन दडपलं जातंय! हॉटेल बंद पहा vdo
.

सरकारचा पानिपत करण्याचा डाव
ऐन केन प्रकारे सरकारला मराठ्यांचे पानिपत करायचं आहे. अखेर संयम सुटलेल्या मराठ्यांनी सीएसटी स्थानकाजवळ ठिय्या दिला. गृह विभागाच्या पोलिसांनी त्यांना दारुडे ठरवलं. मराठ्यांनी आम्ही दारुडे कसे? असा जाब विचारायला सुरुवात केली, तेव्हा सशस्त्र रॅपिडक्शन फोर्स व सीआरपीएफ जवानांच्या तुकड्या दुपारी बोलवण्यात आल्या. आणि बळाने रस्ता मोकळा केला गेला. महिलांनाही चिखलात उभं ठेवण्यात आलं. हे चित्र लोकशाहीत आंदोलन दडपण्याचं नव्हे तर मराठ्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं आहे. लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद – नेमकं याचवेळी सुरक्षा कारणांचा बहाणा करून लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद करण्यात आलं. लाखो भाविकांना दिलासा देणारी ही व्यवस्था अचानक थांबवली गेली. प्रश्न पडतो – सुरक्षेची एवढीच काळजी होती, तर डेकोरेशन, आकाशदीप, मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम व मुंबई कशी सुरु राहते?
अन्नछत्र बंद म्हणजे गरीब मराठ्यांना अन्नावाचून ठेवून तोंडचा घास काढून कोंडी करणे नाही का? इतिहासात पानिपतच्या युद्धात मराठ्यांना अन्न-पाणी थांबवलं आणि सैन्य पराभूत झालं. आज पुन्हा सरकारला मराठ्यांचं पानिपत करायचं आहे का? या सर्वात जमेची बाजू म्हणून मराठा क्रांती मोर्चा प्रमाणे सर्वच समाजातून मराठा समाजाच्या या आंदोलनाला व्यापक पाठींबा व समर्थन मिळत आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार या आंदोलनात मांडीला मांडी लाऊन बसले. म्हणून कि काय सरकारने मराठ्यांना डिवचण्यासाठी भाडोत्री प्रवक्त्याची नियुक्ती केली आहे. सरकारचे (अन)औरस प्रवक्ते म्हणून ते सतत टीव्हीवर झळकत असतात, मराठ्या विरोधात भुंकत असतात.
सर्वसामान्यांचा प्रश्न — मग तो देव काय कामाचा?
या सगळ्या प्रसंगात सर्वसामान्य म्हणुन माझ्या मनात एकच प्रश्न घुमतो — मग तो देव काय कामाचा?
मुंबईतल्या रस्त्यांवर आंदोलनाची धग आहे. घोषणांनी आभाळ दणाणून गेलंय. शेतकऱ्याची मुलं नोकरीसाठी, शिक्षणासाठी भटकतायत; कधी गेटसमोर बसतायत तर कधी पायाला साखळ्या घालतायत. कधी नाहीच सहन झालं तर आत्मघात करतायत .. त्यांच्या अंगावर पोलिसांचा लाठीमार होतो, पण तरीही ते हातात झेंडा धरून उभे राहतात. नेते मात्र वातानुकूलित खोलीतल्या मीटिंगमधून बाहेर येऊन “तुमच्या भावना आम्हाला कळतात” अशी घिसीपिटी वाक्यं बोलतात. मग परत गाडीत बसून एसीत निघून जातात.गावाकडच्या वडिलांनी मुलाला शहरात पाठवलं, “शिक रे, पुढं जा, घराचं नाव उज्ज्वल कर.” पण ते मूल इथे आंदोलनाच्या गर्दीत उभं आहे. पोटात अन्न नाही, खिशात पैसे नाहीत, मनात भविष्याची काळजी आहे. तरीही ते विचारतं – “मी अभ्यास केला, कष्ट केले, पण संधी कुठं आहे? माझ हक्काचं आरक्षण कुठाय?”
देव का गप्प आहे?
समोरच्या मंदिरात घंटा वाजते. आरती सुरू होते. भक्तगण देवाला मनोभावे नतमस्तक होतात. बाहेर रस्त्यावर उपाशी पोरं घोषणाबाजी करतायत, त्यांचं भविष्य हवेत लटकलेलं आहे.देव जर खरोखर आहे, तर ह्या मुलांना न्याय का मिळत नाही? देव जर सर्वशक्तिमान आहे, तर या आंदोलनात आटणारं रक्त का दिसत नाही? देव जर दयाळू आहे, तर या तरुणांच्या डोळ्यांतील पाणी आंधळं का होतं?
संकटकाळात देव माणसाच्या कामाला येत नसेल तर मग तो देव काय कामाचा?
देव आणि सरकार दोन्ही निरुपयोगी?
आणि जर देव या सगळ्या प्रश्नांवर गप्प बसतो, तर…
“मग माझ्यासाठी ते सरकार असो कि तो देव काय कामाचा?”
इथून पुढे देवाच्या नावावर वर्गणी मागणाऱ्यांनी व दान देणाऱ्यांनी विचार केला पाहिजे! माणूस म्हणून माणसासाठी “माणसातल्या देवाच्या” मदतीसाठी पुढे आलं पाहिजे.
आता मी ठाम झालोय कि ज्यांना देवाचं डेकोरेशन करायचं त्यांनी खुशाल कराव..! आमचा देव मनात आहे. माणसात आहे. भारतीय संविधान जीवनाचा हक्क हमी देतं. सनदशीर आंदोलनाचा अधिकार देते. अन्न, पाणी, स्वच्छता ही सरकारची आणि समाजाची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. धार्मिक स्वातंत्र्य हे मूलभूत आहे, पण धर्माच्या नावाने नव्हे तर सुरक्षेच्या कारणाने लोकांच्या हक्कावर पाणी फेरलं,अन्न छत्र बंद केलं तर ती देव व्यवस्था मला तकलादू वाटते . आपल्या संतांनी नेहमी सांगितलं – “देव माणसात आहे.” माणसाची सेवा म्हणजेच ईश्वराची पूजा. जर देवाच्या नावावर वर्गणी गोळा करणाऱ्यांनी हा संदेश विसरला असेल, तर लोकांनी विचार करावा. वर्गणी देणाऱ्यांनीही प्रश्न विचारायला हवा – कि देव सर्वज्ञ आहे तर देवाला दानत करणारा मी कोण!
शेवटचं सत्य
मराठा समाज दारुडा नाही, आतंकवादी नाही. तो शेतकरी आहे, सैनिक आहे, विद्यार्थी आहे. त्याला अन्यायकारक शिक्के मारले जात असतील, त्याला अन्न-पाण्यापासून वंचित ठेवलं जाईल, तर सरकारला मायबाप का म्हणायचं? देवाला आरासेत बसवून फायदा काय?
शेवटी सत्य एवढंच —
भक्त उपाशी राहतो, पण देव आरासेत झळकतो. माझे बांधव लोकशाहीसाठी अन्नपाण्यावाचून तडपत असतील तर मग ते सरकार असो कि देव माझ्यासाठी काय कामाचे?

लेखक परिचय
गजानन खंदारे रिसोड हे ग्रामीण पार्श्वभूमीतील अभ्यासक असून समाजप्रबोधन, शेती, संस्कृती व समकालीन प्रश्नांवर सातत्याने लेखन करतात. त्यांचे लेखन सत्यकथन, सामाजिक उपहास व चिंतनशील शैलीसाठी ओळखले जाते. लेखकाशी संपर्क स्पर्श करा –संपादक
✦ Disclaimer
या लेखातील मते व विचार हे लेखकाचे वैयक्तिक आहेत. या लेखाचा उद्देश केवळ सामाजिक जाणीव व चर्चेला वाव देणे हाच आहे. यात कोणत्याही देव, धर्म, संस्था किंवा व्यक्तीचा अपमान करणे अथवा श्रद्धा कमी लेखणे असा कुठलाही हेतू नाही. वाचकांनी हा लेख सामाजिक-सांस्कृतिक दृष्टिकोनातून घ्यावा.