प्रवासातील अनुभव…
( भाग : 24 )
रविवार दि. 03 ऑगस्ट 2025 रोजीचा अनुभव…
आठवडी बाजारातलं भातकं
👉 रविवार म्हणजे हक्काचा सुट्टीचा दिवस.
हा सुट्टीचा दिवस असला तरी आपल्या सर्वांनाच घरची अनेक कामे करावी लागतात. त्यालाच तर संसार म्हणतात.
रविवारचं घरातील अनेक कामांमधील एक काम म्हणजे आठवडी बाजारात जाऊन भाजीपाला आणणे हे होय.मी आज सकाळपासूनच नियोजित कामात व्यस्त होतो. कितीही कामात व्यस्त असलो तरी रविवारची काही ठराविक कामे करावीच लागतात. आठवडी बाजारात जाऊन भाजीपाला आणणे हे त्यातील महत्त्वाचे काम.
आज मी इतर कामे आटोपून चार वाजता घरी आलो.
घरी आल्यानंतर ऑर्डर सुटली…!
“ती थैली घेऊन जा आणि भाजीपाला घेऊन या!”
मी म्हटलं, सोबत जाऊयात. भाजीपाला घेण्यासह इतर एका ठिकाणी जायचे होते.
त्यामुळे मी आमच्या सौ ला म्हणालो की आपण दोघेही जाऊयात.
दोघे चालले हे कळाल्यानंतर आमचे बाळ शंभुराजेनी सोबत येण्याचा आग्रह केला. त्यालाही सोबत घेतले आणि आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आठवडी बाजारात गेलो.आमच्या सौ, पिशवी घेऊन माळव्याच्या दुकानाकडे गेल्या. मी आणि बाळ मात्र, कॉर्नरलाच थांबलो. तुम्ही भाजीपाला घेऊन या! तोपर्यंत आम्ही या ठिकाणीच थांबतो.
असे सांगून आम्ही साईडला गाडी लावली.तेथे बाजूलाच एक गुपचूप ची गाडी होती. टाईमपास म्हणून गुपचूप खाल्ले. बाळानेही सुके गुपचूप खाल्ले.
त्या गुपचूपच्या गाडी शेजारीच एक “भातक्याचे दुकान” होते.”आठवडी बाजार आणि भातकं” हे शब्दच मुळात बालपणापासूनच जिभेला चव आणणारे.या मागचं गुपित जाणून घ्यायचं असेल तर, थोडसं बालपणात जावे लागेल.
1990 -1095 चा काळ असेल, आताच्या काळात आणि त्या काळात प्रचंड फरक म्हणावा लागेल.त्यावेळी माणसाच्या गरजा फार कमी होत्या. उत्पन्नही कमी होते आणि वायफळ खर्चही नव्हते.आम्हाला लहान मुलांना वर्षभरातील काही ठराविक यात्रेत नेले जायचे. खेळणे, बिळणे, खाऊ वगैरे त्या ठिकाणी मिळायचा. त्यामुळे अशा जत्रा कायम स्मरणात असायच्या, आणि पुढील जत्रा केव्हा येते याची वाट पाहायचो.
त्यावेळी गव्हाची रोटी सुद्धा मिळायची नाही. घरोघरी भाजी आणि ज्वारी च्या भाकरीचेच मात्र स्वादिष्ट जेवण मिळायचे.
सनावारालाच पुरणपोळी किंवा रोटी मिळायची. असे ते दिवस होते.यामध्ये विशिष्ट पदार्थ खायला मिळण्याचा ठराविक बेत म्हणजे, आठवडी बाजारातून आणले जाणारं “भातकं” होय.आमचे वडील त्याकाळी वाशिमवरून दर रविवारी आठवडी बाजारातून भाजीपाला आणताना सोबतच गोडधोड, भातकं आणायचे.
यामध्ये मिक्स असणारा चिवडा हा प्रमुख पदार्थ होय. सोबतच कधी जलेबी, बालुशाही, बर्फी, पेढा, व काही इतर पदार्थांपैकी काही पदार्थ अलटून-पालटून आणले जायचे.आम्ही, वडील घरात पोहोचताच त्यांच्या हातातील भाजीपाल्याची पिशवी घ्यायचो आणि त्यातील भातक्याचं पुंडक घेऊन ते खोलून लवकरच फस्त करायचो. त्या वेळचा
हे भातक खाण्याचा आनंद हा शब्दात वर्णन करण्यापलीकडचाच म्हणावा लागेल.खरं पाहिलं तर ही भातक्याची दुकान आठवडी बाजाराच्या प्रारंभीच असायची, या दुकानावरील सर्वच पदार्थ उघडेच असायचे, कधी हवेची झूळूक आली तर रस्त्याची धूळ आणि भातकं, याची मिसळ व्हायची. मात्र, खरेदी करताना कोणीही या बाबीचा विचार करायचे नाही. खरं पाहिलं तर अशाप्रकारे उघड्यावरील भातक खाल्लं आणि कुणी बिमार पडलं, असही कधी घडलं नाही. म्हणजेच त्याकाळी माणसांची पाचनक्षमता आणि आरोग्य किती सुदृढ असायचं याची प्रचिती येते.
असो,एकंदरीतच काय तर, आठवडी बाजार, भाजीपाला आणि भातकं हे समीकरण मात्र, फार घट्ट होतं.पुढे काही वर्षानंतर आपण मोठे होत गेलो, तस तशी आठवडी बाजारात जाऊन भाजीपाला आणण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली.
जबाबदारी माझ्यावर आली तरीसुद्धा भाजीपाला आणि भातकं हे समीकरण काही तुटलं नाही.वयाच्या विसाव्या वर्षापासून नियमितपणे मी भाजीपाला आणण्यासाठी आठवडी बाजारात जात असतो. आज घडीला प्रत्येक रविवारी आठवडी बाजारात जाण्याचा योग येत नाही. मात्र, जेव्हा केव्हा आठवडी बाजारात भाजीपाला घेण्यासाठी जातो तेव्हा , भातकं घेतल्याशिवाय मी परत येत नाही.काळाच्या ओघात बऱ्याच जुन्या बाबी माणूस विसरून जात असतो.
मी मात्र, सतत चिकित्सा करत असतो. कोणत्या ठिकाणी गेलो की त्यातील कोणती बाब हेरायची, याची चुणूक मला लगेच लागते.आज कुठेही ध्यानीमनी नसताना, सौ भाजीपाला खरेदी करताना माझी नजर तेथील भातकं विक्रेत्याकडे गेली.
आमचे बाळ सुद्धा सोबत होते, त्याला म्हटलं अरे येथून काही घ्यायचे का? तर तो लगेच मनाला पप्पा चिवडा घ्या? मला पापडी आणि सेव खूप आवडते.
मी क्षणाचाही विलंब न करता त्या दुकानदाराकडे मिक्स चिवडा देण्याची मागणी केली.
त्यांनीही भराभर चार-पाच ॲटम एकत्र करून चिवड्याचे पुंडके बांधले. आणि हे घ्या साहेब, म्हणाले. यावेळी मी त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या दुकानचा एक छानसा फोटो घेतला. फोटो कशासाठी घेत आहात हे मात्र, त्यांनी विचारले नाही.
मी त्यांच्याशी अजून चर्चा केली. 50 रु. पाव याप्रमाणे मी चिवडा खरेदी केला, चिवड्याचे एवढे भाव कसे काय वाढवलेत? पूर्वी फार कमी भावात मिळायचे? वगैरे वगैरे. असा प्रश्न मी त्यांना केला.
यावर ते म्हणाले की, साहेब तेलाचे भाव किती वाढलेत बघा ना? उत्पादन खर्चही भरपूर वाढला आहे, त्यामुळे मालाचे भाव सुद्धा वाढवावे लागतात. त्यांचे स्पष्टीकरण देऊन ते मोकळे झाले.आठवडी बाजारातल्या भातक्याचं दुकान म्हणजे, प्रचंड गर्दी असणारे ठिकाण होय. मी थोडं सायंकाळी उशिरा गेल्यामुळे त्यांच्या दुकानावर जास्त गर्दी नव्हती.
यावेळी आमचं भातकं घेतलं, आणि सौ ची वाट पाहत, बाजूला थांबलो.याचवेळी विचार आला की, “भातकं” ही कन्सेप्ट आज नामशेष होत आहे. आज सर्व पदार्थ कुठेही सहज मिळतात. त्यामुळे बाजारातूनच अमुक पदार्थ खरेदी केले पाहिजेत. असं सहसा कोणाला वाटत नाही. म्हणूनच मी आवर्जून भातक्यावर हे प्रवास वर्णन लिहीत आहे.आजही विशेषतः ग्रामीण भागात आठवडी बाजारातून भातकं खरेदी करण्याची पद्धत कमी अधिक प्रमाणात रूढ आहे.
काही ठिकाणी भातकं व सोबतच “नॉनव्हेज” ( मटण ) खरेदी केल जाते, तो भाग वेगळा.थोड्याच वेळात आमच्या सौ आल्या. आणि आम्ही घराकडे निघालो.

( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी प्रवासातील अनुभव हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा चोवीस वा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. )
✍ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
9881204538