पहिला हूं तरी म्हण…🖋️ विठ्ठल कोतेकर, कोल्हापूर

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक विद्वान माणसं वेळोवेळी भेटत असतात. कोण एका विशिष्ट टप्यावर, कोण वळणावर, तर कोण एका छोट्याशा क्षणात आपल्याला आयुष्यभर पुरेल असा धडा शिकवून जातं. हे सगळं घडतंच. पण त्या सल्ल्याला, त्या शिकवण्याला मनापासून ऐकलं गेलं, तर आयुष्य खरंच सोनं होतं.

माझ्या वडिलांचं नाव होतं मारुती सखाराम कोतेकर. त्यांचे वडील, म्हणजे माझे आजोबा – सखाराम कोतेकर, हे त्यांच्या काळातले निष्णात टेलर होते. त्यांच्या सहवासात मला यायचं भाग्य मिळालंच नाही. माझ्या जन्माआधीच ते वारले होते. पण माझ्या आजीचा, म्हणजे आऊबाई सखाराम कोतेकर हिचा सहवास मात्र मला भरपूर मिळाला.

आजीच्या संगतीत मला लहानपणापासूनच सेल्फ डेव्हलपमेंट सायकॉलॉजीची अनेक तत्त्वं अनुभवायला, शिकायला मिळाली. ह्या गोष्टींचं सांगणं म्हणजे एक वेगळाच ग्रंथ होईल. पण इथे मला एक महत्त्वाचा प्रसंग, एक ठसा उमटवणारा क्षण सांगायचा आहे.

मी साधारण सहा वर्षांचा असेन. त्या वयात आजीने मला दिलेला एक सल्ला आजही तसाच ताजा आहे. माझी स्मरणशक्ती तल्लख असल्यामुळे लहानपणीच्या अनेक गोष्टी आजही जशाच्या तशा आठवतात आणि तुम्हीही “सांगायचा मुद्दा असा” या पुस्तकात ते वाचला असालचं.

त्या दिवशी आजी मला म्हणाली, “लेका, कुणीबी कायबी सांगू दे, सल्ला देऊ दे, काम देऊ दे, पहिला ‘हूं’ म्हणायचं. ते काम नंतर जमेल ना जमेल, होईल ना होईल, पण पहिलं ‘हूं’ म्हणायचं. बघ, बहुतेक लोकं काय करत्यात, कुणी काही सांगितलं की सरळ ‘नाही’ म्हणत्यात. लगेच विरोध करत्यात. नीट ऐकूनच घेत नाहीत. त्यामुळे मग पुढचं काही घडतंच नाही. दरवाजाच बंद होतो. म्हणून तुला एक सांगतो कायमचं लक्षात ठेव, कुणी काही सांगितलं की आधी ‘हूं’ म्हणायचं. मग नंतर बघू काय करायचं ते.”

लहान होतो, त्यामुळे त्या शब्दांनी माझ्या मनावर सरळ संस्कारच झाले. कुणी काही सांगेल, आजी काही सांगेल, तर मी सरळ ‘हूं’ म्हणायला लागलो.

या ‘हूं’ म्हणण्याच्या स्वभावामुळे आजीचं माझ्यावरचं प्रेम वाढलं. ती इतरांपेक्षा मला वेगळं समजायला लागली, माझ्याकडे अधिक लक्ष द्यायला लागली.

आजीकडे एक पोतडी होती – जुन्या आठवणींची, वस्तूंची, जपलेल्या क्षणांची. ती पोतडी फार खास होती. तिच्यात काही गोष्टी अशा होत्या ज्या तिने आजवर कुणालाही दिलेल्या नव्हत्या; नव्हे दाखवल्याही नव्हत्या.

तिचे वडील, म्हणजे माझे पणजोबा यांनी तिला दिलेली एक जुनी पाटी होती. ती पाटी तिनं मला दिली. म्हणाली,

घे ही पाटी, लिव्ह हा तुला काय लिव्हायचं ते लिव्ह .”

वर्षानुवर्षं ती पाटी मी वापरली. नंतर माझ्या भावांनी वापरली.

दुसरी वस्तू, एक दोन चाकांचा गाडा . जो आजवर कुठल्याही नातवाला दिला नव्हता, तो तिने मला दिला. त्यानंतर एक सळीची, चक्रांवर चालणारी लाकडी गाडी ही मला दिली. अशा अनेक गोष्टी तिच्याकडून मला मिळाल्या.

आजीचं एक वैशिष्ट्य होतं. ती सतत माझ्या पाठीशी उभी असायची. कुणी काही बोललं, काही त्रास दिला, तर सरळ पुढे जायची. एकदा तर असं झालं, तिने मला मिठाईच्या बॉक्सपासून बनवलेली गाडी दिली होती. मी ती दोरीला लावून खेळत होतो.

तेव्हा आमच्या शेजारचा, माझ्यापेक्षा मोठा एक मुलगा आला. त्याने पायाने माझी गाडी मोडली. मी रडतच आजीकडे गेलो.

ती म्हणाली, “काय झालं?”

मी घडलेली घटना सांगितली. आजी क्षणाचाही विलंब न करता, जशी होती तशी उठली, त्या मुलाच्या घरी गेली आणि म्हणाली,

“काय रे जोग्या! माझ्या नातवाची गाडी मोडलीस काय? तुझ्या पायाला किडं पडू दे…”

असं काहीबाही बोलून ती परत आली. कालांतराने तिचं निधन झालं. पण तिचं ते ‘ हूं ‘ म्हणण्याचं वाक्य, ते मनात खोलवर रुतलं. “हूं” म्हणालो म्हणून ती पाटी मिळाली, ती गाडी मिळाली, ती वात्सल्याची सावली मिळाली.

पुढच्या आयुष्यात मी त्याला एक दीपस्तंभ मानला. नोकरी करत असताना, टायपिंग व्यवसाय करताना, ट्रेनिंगच्या व्यवसायात ‘ हूं‘ म्हणण्याचा सल्ला माझ्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडला.

म्हणूनच मला खूप काही मिळालं. अनुभवी, विद्वान, वडीलधारी माणसांनी मला भरभरून दिलं, सगळं फक्त त्या एका सवयीमुळे ‘ हूं ‘ म्हणण्यामुळं.

आजही समाजात अनेक ठिकाणी हेच ऐकायला मिळतं,

पहिला ‘हूं’ म्हण रे…”
माणसाने पहिल्यांदी ‘हूं’ म्हणावं…”
नाही नाही करत बसला की काहीच होत नाही…”

असं अनेकदा ऐकायला येतं.

माझ्याकडे सल्ला विचारायला अनेकजण येतात. नवरा-बायको येतात.
नवरा म्हणतो ” साहेब, हिला लई वर्ष झाली सांगतोय की पहिला ‘हूं’ म्हणत जा. बाकीचं आपण नंतर पाहूया. पण ही काही ऐकत नाही. हिनं हूं कधीच म्हणलं नाही पहिल्यांदा नाहीच म्हणत्या. नंतर सगळा नाट लागत राहतोय.

बायको म्हणते – “हे काही ऐकत नाहीत. आपलंच खरं करतात. ‘हूं’ म्हणत नाहीत एक एक हूं म्हणलं नाही.”

घरातला एखादा कर्ता पुरुष, आजोबा किंवा आजी अथवा आपल्या आप्तस्वकियातील जाणती माणसं, वरिष्ठ लोक, गुरुजन मंडळी त्यांच्या अनुभवाने, त्यांनी अनेक पावसाळे बघितल्यामुळे आणि त्यांच्या जीवनातील कडू गोड अनुभवाने समोरच्या पिढीचे केवळ आणि केवळ चांगलं व्हावं म्हणून काही सल्ले देत असतात. महत्त्वाच्या सूचना सांगत असतात. त्या निश्चितच आपल्या भल्याच्या असतात. पण अनेक लोक ते ऐकून घेत नाहीत. यांचा अहंकार मध्ये येतो. “ते तुमच्या काळात ठीक होतं, आता जग लई बदललंय, ते लई जुनं झालं. ” या चुकीच्या समजामुळे आपल्याकडे आलेल्या अमूल्य संधीचे दरवाजे आपणच बंद करून घेतात.

पालक म्हणतात, ” सर, पोराला किती वेळा सांगितलं ‘हूं’ म्हण रे आधी, मग पुढचं बघू. पण ह्यो ऐकत नाही .”

अधिकारी लोक म्हणतात – ” कनिष्ठांना सांगतो, काम द्यायला जातो. ते आधीच ‘नाही’ म्हणतात. ‘हूं’ म्हणतचं नाहीत आणि गंमत बघा, गाव ऐकतं आमचं, ऑफिस ऐकतं पण घरातलेच लोक ऐकत नाहीत. ते म्हणतात, तुम्हाला काय सांगायचे ते गावाला सांगा. आम्हाला सांगू नका. असं मला घरात ऐकायला मिळतंय .”

मध्यंतरी एक शिक्षक भेटले. म्हणाले, ” सर, घरात काही सांगायला गेलं की घरचे म्हणतात, ‘हे सगळं शाळेत पोरास्नी शिकवायचं, आम्हाला नाय शिकवायचं.’ मग यावर काय बोलावं सर ?”

असे कितीतरी व्यवसायिक, उद्योगपती, शिक्षक, पालक , नवरे, बायका, अधिकारी सगळ्यांकडून मी हेच ऐकतोय.

मित्रहो… विचार करा,
एवढं ऐकायला काय जातंय? समोरच्याचं बोलणं ऐकायचं, मग नंतर बघायचं काय करायचं ते. पण आधी तरी ‘हूं’ म्हणू या!

हूं ” म्हटलं की काय होतंय?

आपल्याला समोरच्याशी जोडणारं एक नातं तयार होतं. संवादाला सुरुवात होते. मन खुलं होतं. आपल्याला मिळणाऱ्या संधींचे दरवाजे उघडले जातात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सगळं काही भरभरून मिळत जातं.

अनेकांचं मी नंतर पाहिलेलं आहे, आपणही आपल्या अवतीभोवती पाहिला असालच, लोक म्हणताना दिसतात,
“मी जर त्यांचं त्या वेळेला ऐकलं असतं तर किती चांगलं झालं असतं”,
“त्यांनी मला त्या काळामध्ये दिलेला सल्ला जर मी हूं म्हणून ऐकला असता तर आज मी कुठल्या कुठे असतो”
*”माझे वडील मला त्यावेळेला सारखं सांगत होते पण मी *हूं* म्हणलो नाही आज मला त्याचा पश्चाताप होतोय”
“माझ्या गुरुजनांनी मला बोलवून वारंवार एक गोष्ट सांगितली होती पण मी त्यांचं ऐकले नाही, आज मला वाटते त्यावेळेला हूं म्हणलो असतो तर आज मी कुठल्या कुठे गेलो असतो.”
अशा पद्धतीने अनेक लोक आज पश्चाताप करत असताना दिसतात. केवळ वेळीच हूं न म्हणल्यामुळे अनेकांची उमेद गेलेली आहे उभी हयात व्यर्थ गेलेली आहे.

त्यामुळे निसर्ग वेगवेगळ्या माध्यमातून, विविध लोकांच्या माध्यमातून आपल्यासाठी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याला जर वेळीच हूं म्हणून आपण प्रतिसाद दिला तर सगळं काही आपलं भारी होणार आहे. जीवनाच्या वाट्या मोकळ्या होणार आहेत. नुकताच मे महिन्यामध्ये आमचा राधानगरीचा वर्कशॉप पार पडला. त्यावेळेला एवढ्या वर्षांनी जाहीरपणे ही हूं म्हणण्याची सायकॉलॉजी पहिल्यांदाच लोकांसमोर मी मांडली. त्यावेळेला ती लोकांच्या मनाला इतकी भावून गेली की अनेकांनी हूं म्हणायला सुरुवात केली आणि तात्काळ त्याचे फायदे बघितले. तेव्हा मंडळी हूं म्हणून तर बघा.

लेखक : विठ्ठल कोतेकर कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top