मुलांवर इच्छा लादताय व्हय.. प्रत्येक पालकाने वाचलेच पाहिजे !

🖋विठ्ठल कोतेकर, कोल्हापूर

            कोल्हापुरातील वि. स. खांडेकर शाळेमध्ये मला झेंडावंदनासाठी बोलवले होते. तो 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा दिवस होता. सर्वत्र देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. मी ठीक सव्वासात वाजता शाळेमध्ये पोहोचलो. मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्गाने माझे स्वागत केले. ठीक साडेसात वाजता मुख्य झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू झाला. मी झेंडा फडकवला. त्यानंतर राष्ट्रगीत, झेंडा गीत आणि वंदे मातरम सुरू झाले. हे गीत गाणारी मुले अतिशय सुरेल आवाजामध्ये गात होती. या सगळ्यांमध्ये माझं लक्ष गेलं ते हार्मोनियम वाजवणाऱ्या विद्यार्थ्याकडे. हार्मोनियम वाजवणारा विद्यार्थी अतिशय मधुर आवाजामध्ये तालबद्धरित्या हार्मोनियम वाजवत होता. संपूर्ण गायनामध्ये हार्मोनियमचा आवाज चाल आणि लय मला वेगळीच वाटून गेली. त्यावेळी माझी पुतणी म्हणजे ऍड. भीमराव कोतेकर यांची मुलगी संजीवनी कोतेकर त्या ठिकाणी इयत्ता पाचवी मध्ये शिकत होती. तक्षणी माझ्या मनामध्ये विचार आला की, पुढच्या वर्षी संजीवनीनं राष्ट्रगीत वाजवलं पाहिजे. पुढच्या वर्षी संजीवनीला इथे राष्ट्रगीत वाजवताना मला बघायचं आहे. मी नेहमी तात्काळ कृती करणारा माणूस. त्यामुळे झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्या संपल्या लगेच शाहूपुरी दुसऱ्या गल्लीमध्ये स्वरगंधार संगीत क्लासेसचे पंडित शामराव सुतार सर यांना मी भेटलो. त्यांच्याबरोबर चर्चा केली. संजीवनीचे ऍडमिशन पक्क केलं. टाइमिंग ठरली मंगळवार बुधवार सकाळी नऊ ते दहा. 

                      
ठरल्या दिवशी संजीवनी मंगळवारी नऊ वाजता पंडित शामराव सुतार सरांच्या क्लासमध्ये हजर झाली. सरांनी बेसिक माहिती सांगून क्लास संपवला. सर्वसाधारण कसं असतं, हार्मोनियममध्ये इंटरेस्ट आहे का बरा बघूया, अजून जरा वाजवू दे, असा विचार केला जातो. पण मी असं काही न करता त्याच दिवशी संध्याकाळी मिरजेला गाडी चालवत गेलो. तिथे सुतार सरांच्या सल्ल्याने आणि ओळखीने नवीन गीतांजली कंपनीची हार्मोनियम खरेदी केली आणि घरी आणली. याच्यामुळे काय झालं, बघूया इंटरेस्ट वाढेल तर घेऊया असं न करता आता डायरेक्ट हार्मोनियमच समोर असल्यामुळे वाजवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं.

         संजीवनी मात्र रोज नित्यनेमाने सराव करू लागली. सांगितिक भाषेमध्ये ज्याला रियाज म्हणतात तो रियाज सुरु झाला. मी ऍडमिशन घेत असताना सरांना म्हणलं होतं सर पुढच्या वर्षी संजीवनीला राष्ट्रगीत वाजवत असताना मला बघायचा आहे. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तयारी करून घ्या. पण मी माझ्यातली तळमळ आणि ओढ ओळखून संजीवनी कडून सराव करून घ्यायला सुरुवात केली. सरांचं कुशल मार्गदर्शन, संजीवनीची तळमळ, घरातल्या लोकांचा पाठिंबा या जोरावर संजीवनीने हार्मोनियम वादनातल्या गोष्टी आत्मसात केल्या. ज्यावर्षी माझ्या मनामध्ये आलं होतं की, अरे पुढच्या वर्षी संजीवनीने राष्ट्रगीत शाळेमध्ये वाजवलं पाहिजे त्याच वर्षी संजीवनीने राष्ट्रगीत शाळेमध्ये वाजवलं आणि मी ते या डोळ्यांनी पाहिलं. 

     आज संजीवनी एक उत्तम हार्मोनियम वादक म्हणून रियाज करत आहे. संगीत क्षेत्रातल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे होत असलेल्या प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण, मध्यमा प्रथम या परीक्षा संजीवनी पास झालेली आहे. विविध राग ती अतिशय सुंदर वाजवते. रागांची माहिती, तालांची माहिती सुतार सरांनी अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि काळजीपूर्वक करून घेतल्यामुळे संजीवनीला झोपेतून जरी उठवून विचारल, संजीवनी या रागाची माहिती सांग, तर संजीवनी सांगते. टाइमिंगला तर ती इतकी परफेक्ट आहे की नऊच्या ठोक्याला संजीवनी क्लासमध्ये हजर झालीच. सुतार सर नेहमी गमतीने म्हणतात की, एक वेळ घड्याळ चुकेल पण संजीवनी चुकणार नाही. ज्या ज्या वेळेला सर बोलवतील त्या त्या वेळेला पाच मिनिटे आधी तेथे तेथे ती हजर असते. 

       हार्मोनियम वादनाच्या सरावामुळे तिची स्मरणशक्ती चांगली झाली. अभ्यासामध्ये रस आला. 'संजीवनी अभ्यासला बस' असं आम्हाला कधी सांगावं लागलं नाही. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला तर रात्री कधी दोन, कधी तीन, चारला उठून संजीवनीने अभ्यास केला. घरातली अशी कुठली जागा तिने सोडली नाही जिथे तिने अभ्यास केला नाही. दरवर्षी प्रत्येक सुट्टीमध्ये शंभर ते सव्वाशे पुस्तके वाचण्याचा संकल्प तिने सोडलेला आहे आणि आजपर्यंत जवळपास चारशे साडेचारशे पुस्तकांचं वाचन तिने केलेलं आहे. शाळेमध्ये आदर्श विद्यार्थिनी या पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. 

        सांगायचा मुद्दा असा की, माझ्या मनात विचार आला, संजीवनी पुढच्या 15 ऑगस्टला शाळेत हार्मोनियम वाजवायला उभी असेल आणि त्या माझ्या विचारावर मी तत्काळ कृती केली. सुतार सरांना भेटणे, पेटी विकत आणणे या सर्व गोष्टी घडून गेल्या. केवळ त्याच वर्षी नाही तर तिथून पुढे दहावी होईस्तोपर्यंत सलग पाच वर्षे संजीवनी शाळेत परिपाठाला प्रार्थना आणि राष्ट्रगीत वाजवायची. इतकंच नव्हे तर शालाअंतर्गत आणि शालाबाह्य समूहगीत वादन स्पर्धांमध्ये संजीवनीच हार्मोनियम वादक असायची. ज्यामध्ये अनेक ठिकाणी विजेतेपद सुद्धा मिळाले. 

       जरा कल बघूया, आवड बघूया, आयक्यू टेस्ट करून घेऊया, तिला जरा विचारून बघूया, संजीवनी तू हार्मोनियम वाजवशील का, तुला हार्मोनियम वाजविण्यात इंटरेस्ट आहे का, जमेल का तुला हे,  झेपेल का तुला हे, करशील ना तू असे अतिउत्साही पालकांसारखे नखरे मी केले नाहीत. मी सेल्फ डेव्हलपमेंट आणि मानसशास्त्राच्या क्षेत्रात काम करतो. इथे दोन गोष्टी चालतात. एक म्हणजे आवडीचं काम करणे किंवा कामात आवड निर्माण करणे. संजीवनीच्या बाबतीमध्ये आम्ही कामात आवड निर्माण केली आणि ही आवड निर्माण केल्यामुळे संजीवनीची स्वतःची सुद्धा आवड निर्माण झाली. जेणेकरून शैक्षणिक कारकिर्दीमध्ये तिला तिचा प्रचंड फायदा होत आहे. स्टेज डेरिंग वाढलं. एकाग्रता विकसित झाली. कोणीही न सांगता कामं संजीवनी करू लागली. वेळेची शिस्त लागली. रियाजामध्ये रस घेतला. 

      जसं पूर्वीच्या कालखंडामध्ये राजे राजवाडे त्यांच्या मुलांना म्हणजेच राजकुमार राजकुमारीना सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय करत. युद्धकला, राजकारण, नीतीशास्त्र अशा विविध गोष्टी शिकवण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक असायचे. त्या राजांनी कधीही आपल्या मुलांना असं विचारलं आहे का, तुला राजा व्हायचं आहे का, तू राजा होशील का, तुला हे जमेल का  याप्रकारचे प्रश्न त्यांनी कधीच विचारले नाहीत. त्यांनी थेट प्रशिक्षण देऊन त्यांना राजा केलं, हे आपण इतिहासामध्ये पाहत आलेलो आहोत. 

    ज्या पहिल्या पिढीने उद्योग धंदा उभा केला, व्यापारी पेढ्या निर्माण केल्या, कारखाने उभे केले, राजकारणाची सुरुवात केली अशा पिढीने आपल्या दुसऱ्या पिढीला अगदी नकळतपणे आपल्या क्षेत्रामध्ये आणून, त्यांना प्रशिक्षण देऊन, सोबत घेऊन, अनुभव देऊन, छोटी मोठी जबाबदारी देऊन त्यांना त्या त्या क्षेत्रात पारंगत केलं. पण तिसरी चौथी पिढी मात्र आज समाजामध्ये आपण बघत आलेलो आहोत, त्याच पद्धतीने पुढे सरकताना दिसत नाही. याचं कारण पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीवर ज्या पद्धतीचा संस्कार केला, फॉर्मुला वापरला तसा संस्कार आणि फॉर्मुला आज वापरलेला दिसत नाही. मग हे लोक काय करत आहेत? हे म्हणत आहेत, 'आम्ही आमच्या मुलांना भविष्यात काय करायचं आहे ते त्यांनाच ठरवायचा अधिकार दिलेला आहे', ' आता मुलंच ठरतील त्यांना काय करायचं आहे ते', ' त्यांचं तेच ठरवू देत.' या कारणांमुळेच मोठमोठे उद्योग, व्यापारी पेढ्या, कारखाने तिसऱ्या पिढीला चालवता न आल्याची संख्या समाजामध्ये मोठी आहे. 

       त्यामुळे जुनी लोकं ही विद्वान होती. धोरणी होती. विलक्षण दूरदृष्टी असलेली होती. त्यांच्या सल्ल्यांना आणि त्यांच्या फॉर्मुल्यांना समाजामध्ये मोठी किंमत होती. त्यांना लोक जाणत आणि मानतही होती. आता कलचाचण्या, आयक्यू टेस्ट यासारख्या विविध प्रकारच्या गोष्टीमुळे समाजाचं एक मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे आई-वडिलांचे हे परम कर्तव्य आहे की मुलांमध्ये आपण कल निर्माण केला पाहिजे. आपण त्यांच्यामध्ये समज उमज वाढवली पाहिजे. उमेदवारीची कामे दिली पाहिजे. छोटी मोठी जबाबदारी दिली पाहिजे. असं केल्यानेच आपलं पाल्य आपल्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसापुढे;नेणार आहे

🖋विठ्ठल कोतेकर, कोल्हापूर
लेखक:प्रेरणादायी वक्ते,ट्रेनर व मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत 
9921111665
वरील लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक अनुभव व निरीक्षणांवर आधारित आहेत. याचा उद्देश केवळ प्रेरणा व मार्गदर्शन देणे आहे. 

                       

One thought on “मुलांवर इच्छा लादताय व्हय.. प्रत्येक पालकाने वाचलेच पाहिजे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top