बा… विठ्ठला, तू असा गप्प का?

तुझ्या चराचरात तुलाच शोधतो,
तुझ्या नावानं लुटणाऱ्या ढोंग्यांनी!
गाथा बुडवली तुझ्याच नजरेसमोर,
तुकोबाला आत्मक्लेशात तडफडत ठेवलं,
तेरा दिवस उपोषण, कण्हत तुझ्यासाठी,
तरी तू निशब्द, तेव्हाही, आत्ताही!
विचारांची हत्या करून,
सदेह वैकुंठाला पाठवलं तुकोबाला,
तुझ्या नावाची दुकानदारी मांडली,
तरी तू गप्प, तेव्हाही, आत्ताही!
जातीय भांडणं पेरणारे,
अमृतकुंडात अपवित्रता करणारे,
तुझ्याच नावावर माणसाचं रक्त सांडतात,
तरी तू कमरेवर हात ठेवून उभा,
तेव्हाही, आत्ताही!
आता हात काढ, विठ्ठला, कमरेवरून,
नव्या अस्त्रांनी, सत्याच्या वस्त्रांनी सज!
या ढोंगी व्यवस्थेला, जातीच्या भांडणांना,
आणि अन्यायाच्या सडलेल्या जाळ्याला,
संपवण्यासाठी, आम्हाला सामर्थ्य दे!
गजानन खंदारे मोप