बुद्धाच्या देशात अजूनही विचारांना गोळ्या, काळं आणि धमक्या !

धर्मांध प्याद्यांना आमचा निर्वाणीचा इशारा

अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेली काळी शाईफेक ही केवळ एका व्यक्तीवर नाही, तर वैचारिक आंदोलनावर रचलेली नियोजित आणि भ्याड कृती आहे.
या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पण आम्ही केवळ निषेधावरच थांबणार नाही.

आम्ही स्पष्ट सांगतो या घटनेमागे कोणताही वैयक्तिक वाद नाही, तर ही देशभर चालवली जाणाऱ्या विरोधी विचारांवरच्या हल्ल्यांच्या साखळीतील एक रचना आहे. विरोधी विचार गप्प करण्यासाठी देशभरात यंत्रबद्ध पद्धतीने अशी भितीदायक संस्कृती राबवली जात आहे.

या प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी आमचं मन, मनगट आणि मस्तक अजूनही सशक्त आहे.
ते कुणाचंही हस्तक बनलेलं नाही आणि होणारही नाही.

आज जो कोणी जात, धर्म, सामाजिक अन्याय, आर्थिक विषमता यावर प्रश्न उपस्थित करतो, त्याला ‘देशद्रोही’, ‘संस्कृतीद्रोही’, ‘शिवद्रोही’ ठरवण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे.
अक्कलकोटमधील ही घटना त्याच साखळीतील एक धागा आहे.

संभाजी ब्रिगेड ही केवळ घोषणा देणारी संघटना नाही, तर सळसळत्या रक्ताच्या विचारांचा धगधगता अंगार आहे!

चार्वाक, तथागत बुद्ध, संत नामदेव, संत तुकाराम, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो.
ही एक प्रबोधनशील चळवळ आहे — तर्क, विवेक आणि समतेचा आग्रह धरणारी.

संघटनेच्या स्थापनेपासून आम्ही ब्राह्मणी वर्चस्ववाद, वर्णाधिष्ठित शिक्षणपद्धती, अंधश्रद्धा आणि जातपात निर्मूलनासाठी आक्रमक लढा दिला आहे.
भांडारकर इन्स्टिट्यूटवरील ऐतिहासिक आंदोलन असो, की शालेय अभ्यासक्रमातील विषारी वाचनविरोधातील संघर्ष — आम्ही गनिमी काव्याने त्यास उत्तर दिलं आहे

या घटनेनंतर काही संघटनांनी “छत्रपती संभाजी महाराज” यांचा एकेरी उल्लेख झाल्याचा आक्षेप घेतला.
पण खरा रोष एकेरी उल्लेखावर होता का? की संभाजी ब्रिगेडच्या विवेकवादी, पुरोगामी विचारांवर होता?

कृती करणारे कोण? तर…

या हल्ल्यामागे शिवधर्म फाउंडेशनचे भाडोत्री गुंड असल्याचं स्पष्ट दिसतं — ज्यांचा संभाजी ब्रिगेडच्या विचारांशी दीर्घ वैचारिक संघर्ष आहे.
ज्यांचा इतिहास हा संभाजी ब्रिगेडविरोधी आंदोलन, विरोध, व उपोषणांनी भरलेला आहे.

म्हणून हे आक्रमण ‘धार्मिक भावना दुखावल्याने’ नव्हे, तर ‘धर्म’ आणि ‘शिवभक्ती’च्या मुखवट्याआड विचारांचा खून करण्यासाठी केलेली पद्धतशीर कारवाई आहे.

प्रवीण गायकवाड यांच्यावरचा हा भ्याड हल्ला चळवळीला दडपण्याचा प्रयत्न आहे.

पण संभाजी ब्रिगेडने नेहमीच अशा आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद दाखवली आहे.
ही ताकद आम्हाला तथागत बुद्ध आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या विचारांतून मिळते
म्हणूनच
भलेही कासेची देऊ लंगोटी | नाठाळाच्या माथी…|

म्हणून लक्षात ठेवा — प्रवीण गायकवाड किंवा संभाजी ब्रिगेड यांच्यावरचा हल्ला ही केवळ घटना नाही,
तर सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा एक भाग आहे.

या लढ्यात आमचा “गनिमी कावा” आणि वैचारिक आक्रमकता कायम राहील.

संभाजी ब्रिगेड ही विचारांची चळवळ आहे — ती निवडणुकांपुरती, भावनिक स्फोटांपुरती किंवा धर्माच्या नावावर जातीय कुरघोड्यांसाठी निर्माण झालेली नाही.

कारण ती कुणा एकट्या व्यक्तीची नाही — ती सामाजिक परिवर्तनाच्या चेतनेची आहे.
ही चळवळ आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाही. हे तथाकथित गुंड आणि त्यांना रसद पुरवणारे ठेकेदार ध्यानात ठेवोत!

जय जिजाऊ !

गजानन खंदारे
प्रवक्ता – संभाजी ब्रिगेड, वाशिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top