श्रावण नव्हे भक्ती मास — शिवभक्तीची खरी वाट कोणती?

“श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण असते.”
मंदिरात रांगा, उपवासाचे फराळ, आरत्या, अभिषेक, रुद्रपठण— हे सगळं आपल्याला दरवर्षीच दिसतं. पण या सगळ्या धावपळीच्या भक्तीत “शिवतत्त्व” नेमके कुठे आहे, हे आपण विसरतो का ? श्रावण महिना म्हणजे केवळ आषाढानंतर आलेला पावसाळ्याचा महिना नव्हे, तर आत्मिक तपश्चर्येचा, संयमाचा, साधनेचा काळ असतो.म्हणूनच याला “भक्ती मास” असं मानलं जातं. — भक्तीची ही खरी वाट नेमकी कोणती ? तर एका मोठ्या धार्मिक उत्सवाची सुरुवात भक्तीने करायची असते, पण ती आधी समजून, शुद्ध भावनेने, संतांनी सांगितलेल्या मार्गाने करायची असते. हे आपण विसरता कामा नये . .श्रावण महिना हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र असा महिना.. याला “भक्ती मास” का म्हटलं जातं,तर याची ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक काही महत्त्वाची कारणं आहेत.त्या कारणाची चर्चा न करता बऱ्याचदा आपल्याला चूकीचे भक्ती मार्ग सांगितले जातात किंवा अनुकरण करताना भक्त चुकीची पूजा पद्धती अवलंबतात. मग यातून इच्छित फळ किंवा आपली साधना सफल होत नाही .उदा. मंदिरांत रांगा लागतात. पेढा , साबुदाणा खिचडी, उपवासाचे चिप्स, बटाटेवडे खाल्ले जातात आणि मग म्हटले जाते — “मी उपवास केला!” आज माझा उपवास आहे. मग उपवासाचा “लंघन ” हा खरा हेतू फराळाखाली झाकला जातो का ? ही खरी भक्ती आहे का? मग ही भक्ती कुठल्या परंपरेतून येते? आपण का आणि कशासाठी शिवाची उपासना करतो, हे समजून घेण्याची खरी गरज आहे.महाराष्ट्रात प्राचीन काळापासून दोन भक्तिपंथ प्रचलित आहेत. वारकरी परंपरा, आणि वैदिक परंपरा.. वारकरी परंपरा ही संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखोबा, गोरा कुंभार अशा संतांनी रुजवलेली.त्यात पांडुरंग हे सगुण साकार रूपातले मानले जाते.इथे आत्मिक भक्ती, नामस्मरण, परमार्थ, यांना महत्त्व आहे म्हणजे स्वानुभवातून आलेली साधना. तर वैदिक,तांत्रिक परंपरा हि यज्ञ, पूजापद्धती, मंत्रोच्चार, ग्रह-नक्षत्र, रुद्राभिषेक, होमहवन इत्यादी वर भर घालते.या परंपरेत शिवोपासना रुद्रसूक्‍त, शिवपुराण, व्रते, अभिषेक या माध्यमातून केली जाते.हि परंपरा वाटते तितकी सोपी नाही .बऱ्चुयाचदा चूकीच्या पूजा पद्धतीचा अवलंब यात होतो. उदा. “…भवानी सहित नमामि ” याचा उच्चार “..चैतन्य मामि” असा ऐकायला येतो. बेलपत्र शिवाला प्रिय आहे हे खरे , पण मग बेल पत्राची लाखोली वाह्ल्यावर त्यातून “निर्माल्याच “काय ?

भक्ती आणि कर्मकांड यातील नेमका गोंधळ! आज बरेच भक्त ना वारकरी ना वैदिक — तर त्या दोघांचं अर्धवट अनुकरण करणारे बनले आहेत.श्रद्धा आणि भक्ती हि मुळात एक निरपेक्ष भावना असावी. खरी भक्ती म्हणजे -आपुलकीने एक बेलपत्र वाहणं, “ॐ नमः शिवाय” या मंत्राचा शुद्ध जप करणं. उपवासात क्षुधाशांतीसाठी हलका आहार घेणं, पण मन मात्र शिवस्मरणात असणं. रांगेत उभं राहून, मोबाईलवर reels बघत शिवदर्शन करणं नव्हे तर मनाने तिथे उपस्थित असणं.मग मनामध्ये इच्छा ठेऊन केलेलं व्रत हे फलद्रूप होते .मात्र हल्ली व्रत हे एक व्यवसायिक व्रत बनलं आहे. बऱ्याचशा महाराजांनी त्यात सौदेबाजीचं स्वरूप आणलं आहे.” एक लोटा जल ” हे नेमकं काय आहे. कशासाठी आहे ? मी उपवास करतो, देवा तू माझ्या मागण्या पूर्ण कर.! ” मग ही श्रद्धा आहे की व्यवहार ? संतांनी नेहमीच सांगितलं —देव हा व्यवहारात नाही, अनुभवात आहे.” गोखल्यांची एक ओळ आठवते ” माणसे देवळात जाऊन ,दुकानात गेल्यासारखी वागतात .चारआठ आणे टाकून काहीतरी मागतात “
“नामात शक्ती आहे, कर्मात भक्ती आहे म्हणूनच पाप-पुण्याच्या पलीकडची अवस्था म्हणजे शिव. शिव म्हणजे शांत, साक्षी, सत्वशील अवस्था.आणि ती अवस्था उपवास, व्रत, अभिषेक या बाह्य साधनांपेक्षा आत्मिक प्रबोधनातून मिळते.श्रावण महिना हा शिवाची दया, करुणा, आणि शुद्ध भावनेने स्मरण करण्याचा महिना आहे न की मेनूकार्ड पाहून फराळ खाण्याचा. ना दिखावा करण्वायाचा .वारकरी परंपरेसारख्या सहज, स्वाभाविक भक्तीतून आपण खरं शिवतत्त्व समजू शकतो.
कृपया अंधश्रद्धेवर आधारित, व्यवसायीक व्रतांपासून दूर राहा.”भक्ती म्हणजे पुजारी बुवांचे अनुकरण नव्हे तर स्वतःला ओळखण्याचा आणि देवाशी संवाद साधण्याचा शुद्ध, प्रामाणिक प्रयत्न आहे.”

अस्वीकरण:

हा लेख भक्ती आणि (अंध) श्रद्धा यामधील फरक स्पष्ट करण्यासाठी आणि समजून-उमजून केलेल्या शुद्ध भक्तीचा विचारप्रवण प्रचार करण्यासाठी लिहिण्यात आलेला आहे. कोणत्याही धार्मिक आस्था, रूढी, किंवा परंपरांप्रती आमचा अनादर करण्याचा हेतू नाही.
वाचकांनी विवेकबुद्धीने व श्रद्धेच्या सीमेत राहून यातील विचारांचा विचार करावा. हा या लेखामागील मूळ हेतू आहे.लेखाचे लेखक गजानन खंदारे हे संत वाङ्मय, धार्मिक परंपरा, समाजविज्ञान आणि तत्त्वज्ञानाचे चिकित्सक अभ्यासक व पत्रकार आहेत.
निकोप चर्चा आणि संवादासाठी आम्ही सदैव खुले आहोत.गजानन धामणे कार्यकारी संपादक (kamachya-goshti.com) support@kamachya -goshti .com

गजानन खंदारे
| लेखक | पत्रकार
(कामाच्या गोष्टी/ शेती माती)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top