माझी “आई” ही जुनी नववी पर्यंत शिकलेली पोथी, पुराण कथात ती डोकं खुपसून बसायची.
ती खूपच “देवभोळी” होती असं नाही,
पण “परोपकार ते परपीडा” या विचाराभोवती
“देव आणि दानव” या “अवताराच्या” कथा मला ती लहानपणी नेहमी सांगायची.
तेव्हा यांचा खरा आशय मला कळत नव्हता.पण, आपणही हातात शस्त्र घेऊन या राक्षसाचा संहार करावा असं मला नेहमी वाटायचं.
तेव्हा आई मला घट्ट जवळ घ्यायची
“सूर आणि असुर “
“देव आणि दानव ” हे दोन स्वतंत्र अस्तित्व नसून,
माणसाच्या मनातील दोन छटा आहेत.
पण आईच बोलणं मला काहीच कळत नव्हतं.
तेव्हा आई मला ‘मम्बा’ भटाची कपटनीती आणि तुकारामाचा 13 दिवसाचा आत्मक्लेष, बापाच्या सांगण्यावरून आईची हत्या करणारा परशु.. जगण्या वागण्यातला चिर- चैतन्य असलेला “राम” अशा अनेक कथा सांगायची.मला समजावताना आई खुप गोंधळात पडायची….
मग आई
वामन अवताराची कथा सांगायची
“बटू” (वामन) मध्ये कपटनीती होती.
आणि महासम्राट “बळी” मध्ये दानशीलता
म्हणजेच चांगुलपणा वाईटात,
आणि वाईट चांगुलपणात दडलेलं असतं बरं का पोरा!
राजा ‘बळी’ हा राक्षस कुळातीलच “असुर ” होता,
प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे त्याचं साम्राज्य वाढतच होतं. त्याच्या राज्यात कोणीच दुःखी नव्हतं, म्हणुन देवाला अवतार घेऊन कपटकथा रचून बळीला पाताळत लोटावं लागलं.
हे सगळं माझ्या डोक्यात न घुसता डोक्यावरून फिरायचं!
दिवाळीला आईने कधीच दिवा पेटवला नाही. यावर आई बोलायची आपण छोटीशी पणती होऊन अंधाराला “भगदाड” पाडलं पाहिजे. माझा भाऊ खुप दानी आहे. न चुकता तो दिवाळीला येतों त्याला माझ्या अंधाराचे दुःख सांगता यावे म्हणुन मी दिवा लावत नाही.
म्हणूनच की काय,
भाऊबीजेला आई म्हणायची —
“इडा पिडा टळू दे, अन् पुन्हा बळीचंच राज्य येऊ दे!”
आई असं का म्हणायची?
हा प्रश्न आजही कुणालाच का पडत नाही?
आपण बळीचेच वंशज, तु मी आपण सर्वच.
मग माझी आई सुद्धा राक्षस कुळातीलच —
बळीचीच वंशज!
म्हणूनच की काय, तिच्या ‘पदराच्या सावलीत’ मी कधीच दुःखी नव्हतो.
कधी कधी देवत्वात “कपट आणि अहंकाराचा” वास येतो,
हे आई ज्या वयात सांगायची,
तेव्हा त्याचा अर्थ काहीच कळत नव्हता.
अर्थात, हे बाहेर कुठे बोलायचं नसतं – असं
आई म्हणायची.
सुरुवातीला चीड आणणारी आई,
आता मात्र फार शांत वाटत होती.
“नववा अवतार” म्हणजे “बुद्धच ” आहे —
जो देव-असुर, धर्म-अधर्म यांच्या पलीकडे जाऊन
करुणा आणि सत्याचा मार्ग दाखवतो,
आणि माणसाला स्वतःच्या अंतर्मनातील प्रकाश शोधायला सांगतो.
तेव्हा बुद्धाला देवघरात स्थान देऊ नकोस.किंवा कुणाला कळू देऊ नकोस. त्याचं स्थान मनात निर्माण कर.
तो नववा अवतार म्हणजे कुणा देवाचा चमत्कार नाही,
तर माणसाच्या दु:खातून उमलणारा
अंतर्मनातील बुद्धच आहे.
हे जेव्हा मला समजलं,
तेव्हा आईने डोळे मिटलेले होते…!
माझ्या आईला समर्पित कविता
——————————————-
लहानपणी आई मला अवतारांच्या कथा सांगायची,
आणि मग माझ्याच असुर-जन्माच्या गोष्टींत मी हरवायचो.
ती म्हणायची —
“नवव्या अवताराची गोष्ट ऐकताना, गोंधळू नकोस बाळा,
देव आणि असुर यांच्या सीमारेषा नेहमी स्पष्ट नसतात.”
“आपण असुरकुळातीलच आहोत,
हे सिद्ध करण्याच्या भानगडीत कधी पडायचं नाही,
कारण असुरपणातच बळीची समृद्धी,
आणि ‘बटू’चं कपट दडलेलं असतं,
तर देवत्वातही कधी कधी अहंकाराचा वास येतो.”
आई म्हणायची —
“जग तुझा न्याय करेल, पण आधी तू स्वतःला ओळख.”
आणि त्या शब्दांतून उमजलं —
की देव-दानव, प्रकाश-अंधार,
हे सगळं फक्त मनात उभं केलेलं अंतर आहे.
आज मोठा झालो, पण त्या कथांचा शेवट अजून शोधतोय…
आई गेली, आणि नववा अवतार अजूनही जन्म घ्यायचा आहे —
कदाचित तो कुणा देवाचा नसेल,
तर असुरांच्या अश्रूंमधून उमलणारा,
अंतिम सत्य सांगणारा बुद्धच असेल.
.
✍🏼लेखक –गजानन खंदारे, रिसोड
अस्विकारण/ स्पष्टीकरण
हे आत्मनिवेदनात्मक साहित्य, प्रतीकात्मक आणि पूर्णतः काल्पनिक अभिव्यक्ती आहे.
यात उल्लेखलेली पात्रे, प्रसंग, आणि संदर्भ (उदा. बळी, वामन, बुद्ध इत्यादी) हे केवळ प्रतीकात्मक अर्थाने वापरले गेले आहेत.
या कवितेचा उद्देश कोणत्याही धर्म, परंपरा, ग्रंथ, समुदाय किंवा व्यक्ती, प्रवृत्तीशी जोडणे,अपमान करणे नाही.
रचनामध्ये आलेले विचार हे लेखकाच्या तत्त्वचिंतनात्मक आणि कलात्मक दृष्टीकोनाचे प्रतिबिंब असु शकते, आणि त्यांचा कोणत्याही धार्मिक किंवा ऐतिहासिक सत्याशी थेट संबंध नाही.
वाचकांनी ही रचना साहित्यिक, तत्त्वज्ञानिक आणि मानवी मूल्यांच्या अंगाने समजून घ्यावी.
या कवितेचा हेतू फक्त मानवतेतील करुणा, विवेक आणि आत्मबुद्ध जागवण्याचा आहे —
ना की कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा वाद निर्माण करण्याचा– संपादक-कामाच्या गोष्टी .कॉम

लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही click here

