आकाशाला भिडताना…


✍🏻. गजानन खंदारे

आकाशात झेप घेण्यापूर्वी बेंगळुरू विमानतळावरून माझ्या मुलाचा फोन आला.
“पप्पा, पुढील काही वेळ मी हवेत असणार. फोन फ्लाइट मोडवर राहील.”
मी पुढचं काही बोलणार, एवढ्यात फोन कट झाला. माझा मुलगा पहिल्यांदाच विमानप्रवास करत होता, आणि त्याच्या या यशाचा मला मनस्वी अभिमान वाटत होता. त्याच्या डोमेस्टिक क्लासची व्यवस्था केली होती.

तरीही, त्याच्या या वाक्याने मला क्षणभर विचारात पाडलं – काही काळ का होईना, त्याचं जमिनीशी असलेलं नातं तुटणार होतं.
एका क्षणात तो जमिनीवरून उंच भरारी घेणार होता. हे केवळ विमानाचं अंतर नव्हतं; तर आपल्या मुळांपासून, आपल्या सवयींनी बांधलेल्या आयुष्याच्या जमिनीपासून काही क्षण दूर जाण्याचं प्रतीक होतं. त्या विचारांनी मला थोडंसं आतून ढवळून काढलं.”

विमान वेगाने पुण्याच्या दिशेने झेपावत असताना, माझं मन मात्र भूतकाळात हरवलं.

१९८० च्या दशकात, माझे वडील शिक्षकी पेशा सांभाळत पायदळ प्रवास करत शिक्षणाचा प्रसार करत होते. घरी पहिली सायकल आली तेव्हा आईने कुंकवाने तिची पूजा केली होती. पुढें त्याच सायकलवरून कैची, दांडी, सिटवर बसत आम्ही लहानाचे मोठे झालो.
ती सायकल प्रवासाच साधन नव्हती तर आयुष्य उभं करण्याचं पाहिलं पाऊल होत.त्यांच्या साध्या जीवनशैलीतून त्यांनी जमिनीशी घट्ट नातं जपलं होतं.

चांगलं आयुष्य जगण्यासाठी माणसाला खूप कमी लागतं,” बापूचं हे वाक्य आजही माझ्या मनात ताजं आहे.

पुढे, माझ्या पगारातून मी मोटरसायकल घेतली. ती केवळ प्रवासाचं साधन नव्हती, तर प्रगतीचं प्रतीक होती. मोटरसायकलच्या वेगाने माझ्या स्वप्नांना गती मिळाली, पण जमिनीशी नातं कधीच तुटलं नाही. त्यामुळेच, पुढे नोकरी गेली तरी आयुष्य स्थिर राहिलं.

आज, माझ्या मुलाने विमानप्रवास केला. ही केवळ त्याची भौतिक प्रगती नव्हती, तर त्याच्या स्वप्नांना मिळालेलं आकाश होतं. त्याच्या कष्टांनी त्याला भरारी घेता आली , पण या उंचीवरही त्याने जमिनीचं महत्त्व विसरू नये, अशी माझी इच्छा होती.

त्याच्या त्या पहिल्या विमान प्रवासाविषयी मला विचारायच नव्हतच मुळी! प्रत्येक प्रवास हा नवा अनुभव देऊन जातो.

आज तू विमानात बसून आकाशात झेपावला आहेस, याचा मला अभिमान आहे. पण लक्षात ठेव, भौतिक साधनं बदलली तरी साधेपण टिकवणं ही खरी प्रगती असते. कष्ट आणि साधेपणा याचं महत्त्व विसरू नकोस. विमानातून उंच उडताना खाली असलेल्या जमिनीचा, आपल्या मुळांचा आदर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आयुष्याच्या प्रवासात उंच भरारी घे, पण त्या उंचीवरही जमिनीशी जोडलेलं तुझं नातं टिकून राहील, याची काळजी घे. आकाशला भिडण आणि जमिनिशी नातं तोडणे यात सूक्ष्म फरक असतो
तीन पिढ्यांचा हा प्रवास – सायकलपासून विमानापर्यंत – केवळ भौतिक साधनांचा बदल नाही, तर कष्ट, साधेपणा, आणि मूल्यं जपण्याची परंपरा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांनीही टिकवावी, कारण खरी प्रगती ही मुळांशी घट्ट जोडूनच शक्य आहे! आयुष्याचा प्रवास खाच खळग्या सोबत अनुभवानेच अधिक सिद्ध होतो. हे मात्र खरे!

प्रतिक्रिया

“गजाननराव, तुमच्या शब्दांत तीन पिढ्यांचा सायकलपासून विमानापर्यंतचा प्रवास अप्रतिम रेखाटलाय. तुमच्या मुलाची पहिली भरारी वाचताना आम्हालाही अभिमानाची जाणीव झाली. साधेपणा आणि मुळांचा आदर जपण्याचा तुमचा संदेश हृदयाला भिडतो.”

“तुमच्या मुलाच्या विमानप्रवासाचा अभिमान व्यक्त करतानाच तुम्ही दिलेला साधेपणाचा धडा खरंच प्रेरणादायी आहे. आकाशाला भिडतानाही जमिनीशी घट्ट नातं ठेवावं, हा संदेश प्रत्येक पिढीने आत्मसात करावा असाच आहे.”

मुलाच्या पहिल्या आकाशभरारीतून तुम्ही मांडलेले विचार आयुष्याची खरी दिशा दाखवतात. प्रगती साधनांतून मोजली जात नाही, तर मूल्यं जपून उंच भरारी घेणं हेच खरं यश आहे, हे तुमचं लेखन वाचून मनापासून पटतं.”-प्रशांत देशमुख वाशिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top