ऑटो युनियनने मेसेज फिरविला, अन…
👉 शनिवारी मला हॉस्पिटलच्या कामानिमित्त वर्धा येथे जायचे होते. वाशिम वरून कोल्हापूर – नागपूर या रेल्वेने सकाळी 5.30 वाजताच प्रवास सुरू केला.
सकाळी 10.30 वाजता ट्रेन वर्धा येथे पोहोचली.
शनिवारचा दिवस आणि ओपीडी लवकरच बंद होत असल्यामुळे घाईघाईने स्टेशन बाहेर आल्यानंतर आम्ही रस्त्यावर चालता ऑटो पकडला. आम्हाला सावंगी मेघे येथील धर्मादाय रुग्णालय असलेल्या प्रशस्त आणि महाराष्ट्रातील नामांकित असलेल्या आचार्य विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये पोहोचायचे होते. आमच्या पाहुण्यांना ऍडमिट करण्यासाठी आम्ही जात होतो.
वर्धा येथील बस स्टॅन्ड कडून आलेल्या त्या ऑटोत आम्ही तीन प्रवासी बसलो.
अवघ्या काही मिनिटात ऑटो हॉस्पिटल समोर येऊन थांबला.
आमच्या तिघांकडेही बॅगा होत्या. आम्ही उतरलो, ऑटो वाल्यांना पैसे दिले, त्यांनाही कुठेतरी घाईगडबडीने जायचे असल्यामुळे आम्ही उतरल्यानंतर ते निघून गेले.
ऑटो बराच पुढे गेल्यानंतर आमच्या पाहुण्यांकडे असलेली बॅग त्या ऑटोमध्येच विसरल्याचे आमच्या लक्षात आले.
त्या विसरलेल्या बॅगेमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची फाईल, तसेच राशन कार्ड, आधार कार्ड, आयुष्मान कार्ड, पॅन कार्ड व इतर काही महत्त्वाचे कागदपत्र होते. तसेच सोबत आणलेले काही कपडेही होते.
ज्या कामासाठी आलो त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रच त्या बॅगेत गेल्यामुळे आम्ही हताश झालो. काय करावं सूचेना. वाटलं की, त्या ऑटो वाल्यांनी आपली बॅग पाहिली असेल आणि लवकरच आणून देतील.
मात्र, असे घडले नाही.

महत्तप्रयासाने बॅग तर मिळवावीच लागेल. कारण त्याशिवाय हॉस्पिटलचे काम पूर्ण होणार नव्हते.
शांत डोक्याने विचार केला, नंतर बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले. कारण, अकरा वाजले होते जेवणाची वेळ झाली होती.
वाटले एवढ्या वेळात, कदाचित, ऑटो वाल्या काकांच्या लक्षात आले तर ते बॅग घेऊन येतील.
मात्र, तसे झाले नाही.
शेवटी, रुग्णालयासमोरील ऑटो पॉईंट वर आलो, तेथील ऑटो वाल्यांना सर्व हकीकत सांगितली. त्या बॅगेतील डॉक्यूमेंट न मिळाल्यास आम्हाला इलाज न करताच परतावे लागेल, याची त्यांना जाणीव करून दिली.
यावेळी तेथील ऑटोचालक मनीष दाभेकर हे पुढे आले आणि त्यांनी माझ्याकडून ऑटो बद्दल माहिती जाणून घेतली. तुम्ही कुठून बसले, तसेच ऑटोचे वर्णन विचारले. ते म्हणाले की, तुम्ही चालत्या ऑटोत बसले आहात, त्यामुळे तो ऑटो कोणत्या पॉईंटचा आहे हे कळण्यास उशीर लागेल, मात्र, आपण ऑटो चा शोध घेऊच.
माझ्याकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी लगेचच ऑटोत बॅग विसरल्या बाबतचा मेसेज त्यांच्या ऑटो युनियनच्या वेगवेगळ्या ग्रुप वर सेंड केला. अवघ्या दहा मिनिटात तो मेसेज संपूर्ण वर्ध्यातील ऑटो चालकांच्या वेगवेगळ्या ग्रुप वर प्रसारित झाला. सर्व ऑटो वाले एकमेकांना विचारत होते की, आपल्या ऑटोत प्रवाशाची बॅग राहिली का?
शेवटी काय करायचे म्हणून आम्ही, हॉस्पिटल मध्ये गेलो, तेथे नवीन फाईल बनवून घेतली. आधार कार्ड सह काही डॉक्युमेंट ऑनलाइन काढून घेतले. आणि हॉस्पिटलची प्रक्रिया सुरू केली.
त्यानंतर मी बाहेर आलो, हॉस्पिटलच्या गेटवरच सीसीटीव्ही लावलेले आहेत, तसेच सीसीटीव्ही चे एक स्वतंत्र युनिट ( खोली ) तेथेच होते. मेघे मेडिकल कॉलेजच्या गेटवर दोन्ही साईडला सीसीटीव्ही असल्यामुळे या सीसीटीव्ही मध्ये आम्ही ज्या ऑटोत आलो तो ऑटो नक्कीच आला असेल. याची चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासाठी मी सीसीटीव्ही इन्चार्ज यांना संपर्क केला. वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यांनी सीसीटीव्ही मला दाखविला. सीसीटीव्ही मध्ये आम्ही ज्या ऑटोत आलो होतो तो ऑटो दिसत होता, मात्र, ऑटो चा नंबर स्पष्ट दिसत नव्हता.
तो सीसीटीव्ही मला तुम्हाला लगेच देता येणार नाही, मात्र, माझ्या वरिष्ठांनी परवानगी दिली तर मी तुम्हाला देऊ शकतो. असे तेथील सीसीटीव्ही ऑपरेटरने मला सांगितले. आमच्या पेशंट बद्दल खात्री करून त्यांनी वरिष्ठांना कॉल केला. त्यांनीही परवानगी दिली. आणि मी माझ्या मोबाईल मध्ये तो सीसीटीव्ही फुटेज घेतला.
आणि लगेचच ऑटो पॉईंट वरील ऑटो वाल्या बंधूंना तो दाखविला.
… अरे हा तर ऑटो सालोड येथील वाघमारे काकांचा आहे. असे तेथील एका ऑटो वाल्याने सांगितले.
त्यांच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला. वाटले की अर्धी लढाई तर आपण येथेच जिंकलो आहे. आता आपली बॅग शंभर टक्के मिळणार, याची मला खात्री झाली होती.
त्यांनी ऑटो तर ओळखला, मात्र वाघमारे काकांचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे नव्हता. नंतर येथील चार-पाच ऑटो वाल्यांनी पटापट आपल्या ऑटोवाल्या मित्रांना कॉल केलेत आणि सालोड येथील वाघमारे काकांचा नंबर आहे का? असे विचारले. त्यातील एका जणाने होकार दिला आणि वाघमारे काकांचा मोबाईल नंबरही मिळाला.
लगेचच वाघमारे काकांना संपर्क करण्यात आला.
यावेळी त्यांनी सांगितले की, हो माझ्या ऑटो मध्ये मेघे हॉस्पिटल येथे आलेल्या प्रवाशांची विसरलेली बॅग माझ्याकडे आहे. मला तेथून तातडीने यायचे होते. मला घरी आल्यानंतर ती बॅग ऑटोत पाठीमागे असल्याचे लक्षात आले. बॅग घरी ठेवून मी शेतात गेल्याचे त्यांनी सांगितले. शेतातून आल्यानंतर बॅगेतील कागदपत्रांवरून संपर्क करून परत करणार होतोच.
मात्र काही अडचण नाही, आपण त्यांना ( मला ) घेऊन या आणि माझ्या घरी ठेवलेली बॅग त्यांना परत करा.
वाघमारे काका आणि येथील ऑटो चालकांमध्ये हा संवाद झाला.
आम्हाला कागदपत्रांची नितांत गरज असल्यामुळे
मी तात्काळ ऑटो मध्ये बसलो आणि सालोड या गावच्या दिशेने रवाना झालो. चार-पाच किलोमीटर अंतरानंतर ते गाव आले. तेथे रस्त्यातच वाघमारे काकांची भेट झाली, ते नुकतेच शेतातुन येत होते. त्यांच्या ऑटोच्या मागेच आम्ही त्यांच्या घरी गेलो.
सुभाषराव वाघमारे असे त्यांचे नाव, आपली शेती करण्यासह ते ऑटोही चालवितात.
घरी गेल्यानंतर त्यांनी आत बोलावले, आम्हाला चहापाणी केले.
यावेळी त्यांना मी माझा परिचय दिला. यावेळी ते म्हणाले की, मला खूप घाई गडबडीने यायचे होते, त्यामुळे ऑटोत आपली बॅग विसरल्याचे माझ्या लक्षात आले नाही. घरी आल्यानंतर लक्षात आले, मी बॅग घरी काढून ठेवली, शेतातून आल्यानंतर बॅगेतील कागदपत्रांवरून मी आपणास संपर्क करणारच होतो. एवढ्यात तुम्ही आलात.
शेतकरी कुटुंबातील त्यांची धावपळ, त्यांच्या बोलण्यातील सोज्वळपणा, प्रामाणिकपणा दर्शवीत होती. यावेळी आमची बरीच चर्चा झाली. त्यांच्या परवानगी ने मी माझ्या मोबाईल मध्ये एक फोटो घेतला.
आपल्या प्रामाणिकपणाबद्दल मी लिहिणार आहे. असेही मी त्यांना सांगितले.
कदाचित ही बॅग आम्हाला मिळाली नसती तर, राशन कार्ड सह इतर महत्त्वाचे कागदपत्र मिळविण्यासाठी आमचा बराच वेळ गेला असता, त्यामुळे आपले मनस्वी धन्यवाद.
असे बोलून मी पुन्हा हॉस्पिटल कडे मार्गस्थ झालो.
ऑटोत बसल्यानंतर मी आपली बॅग मिळाल्याची माहिती उपचारासाठी आणलेल्या पाहुण्यांना दिली.
त्यांनीही सुटकेचा निस्वास टाकला. आता हॉस्पिटलची पुढील प्रक्रिया लवकर होण्याचा मार्गही मोकळा झाला होता.
हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आम्ही जेवण केले, त्यानंतर ज्यांनी हा मेसेज आपल्या ऑटोवाल्या बांधवांपर्यंत पोहोचवला होता. त्या मनीषभाऊ दाभेकर यांना कॉल करून बॅग सापडल्याची माहिती दिली आणि त्यांचे आभार मानले.
सोबतच आमचे वर्धा येथे राहत असलेले आणि बॅग शोधण्यासाठी ज्यांनी मोलाची मदत केली असे पाहुणे महेश ऊलेमाले यांनाही माहिती दिली.
या घटनेच्या माध्यमातून वर्धा येथील ऑटोवाल्या सर्व भावांबद्दल माझ्या मनात कमालीचा आदरभाव निर्माण झाला आहे. एकतर ते अत्यंत कमी दरात प्रवाशांची ने आन करत असल्याचे दिसून येते. आणि त्यांची युनियन सुद्धा खूप स्ट्रॉंग असून चांगल्या कामासाठी ते एकमेकांना सहकार्य करण्याची भावना त्यांच्यात दिसून येते. हे मला प्रकर्षाने जाणवले.
येथील आचार्य विनोबा भावे या हॉस्पिटल मधील एकूणच व्यवस्था नितांत सुंदर आहे. याबद्दल मी स्वतंत्रपणे लिहीनच.
महत्त्वाची घटना असूनही वेळेअभावी दोन दिवस उशिरा लिहीत आहे. त्याबद्दल क्षमस्व.
प्रवासातील अनुभव…
( भाग : 18 )
शनिवार दि. 10 मे 2025 रोजीचा अनुभव…
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी प्रवासातील अनुभव हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा अठरावा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. )
✍ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
9881204538
आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या
सूचना / Disclaimer:
शेतीमाती, कामाच्या गोष्टी आणि मराठा लग्न अक्षदा या सामाजिक प्लॅटफॉर्म्सवर प्रसिद्ध होणारे लेख, विचार, विश्लेषण व मजकूर हे संबंधित लेखकांच्या वैयक्तिक अभ्यास, वाचन, निरीक्षण, आकलन आणि सामाजिक जाणिवांच्या आधारे मांडलेले असतात.
हे विचार कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा गटाविरुद्ध द्वेष पसरविण्याचा हेतू ठेवून मांडलेले नसून, समाजप्रबोधन व चर्चेला चालना देणे हाच प्रमुख उद्देश आहे.
येथील मजकूर कोणत्याही वादास कारणीभूत ठरू नये, हीच विनंती.
या प्लॅटफॉर्मचा उद्देश सामाजिक जाणीवा समृद्ध करणे व लोकशाही संवादाला प्रोत्साहन देणे आहे.
Disclaimer:
The content, opinions, and articles published on the platforms Sheti-Mati, Kamachya Goshti, and Maratha Lagna Akshada reflect the personal understanding, observations, research, and social awareness of individual writers.
These expressions are not intended to defame or provoke any individual, group, or organization but aim to foster social consciousness and constructive discussion.
The platforms shall not be held responsible for any controversy arising out of in
थँक्स