अलीकडेच आमदार अमित झनक यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक छायाचित्र प्रसिद्ध केले. या छायाचित्रात ते सोनिया गांधी यांचे ‘Belonging: A Journey of Love’ हे आत्मकथन वाचताना दिसत आहेत.
या पोस्टसोबत त्यांनी एक छान विचारही मांडला आहे.
“चांगली पुस्तके माणसाला केवळ माहिती देत नाहीत, तर विचार करण्याची नवी दृष्टीही देतात.”
आम्ही जेव्हा सामान्य मतदाराच्या नजरेतून पाहिले तर या पोस्टमध्ये आम्हाला चुकीचे किंवा आक्षेपार्ह असे काहीही वाटले नाही. लोकप्रतिनिधीने पुस्तक वाचणे, वाचनाची आवड जोपासणे आणि आपला वाचनानुभव इतरांसोबत शेअर करणे ही निश्चितच चांगली बाब आहे. आम्ही तर याही पुढे असं म्हणू की आमदार महाशयांनी वाचना सोबत विविध गोष्टींचा, मतदार संघाच्या प्रश्नाचा अभ्यास पण केला पाहिजे.
“यात गैर असे काहीच नाही.“
मात्र, या पोस्टखाली आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर वेगळेच चित्र दिसले . पुस्तक, त्यातील आशय, लेखिकेचे अनुभव किंवा वाचनसंस्कृती यावर चर्चा होणे अपेक्षित होतें. पण बहुतांश प्रतिक्रिया नकारात्मक स्वरूपाच्याच दिसल्या. ‘आधी हे करा’, ‘आधी ते करा’, विकासाची कामे कुठे आहेत?, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारणाऱ्या शेकडो कॉमेंट होत्या.
खरे तर हे प्रश्न चुकीचे आहेत असंही आम्ही मुळीच म्हणणार नाही. आमदारांना विकासकामांचा जाब विचारलाच पाहिजे.
एक पत्रकार म्हणून आम्ही सुद्धा आमदारांना त्यांच्या कामाचा आरसा अधुन मधून दाखवतोच.
बरं ते आमदार आहेत, सामान्य माणूस नाहीत.म्हणुन खाली प्रतिक्रिया लिहणाराची मानसिकता समजायला वेळ लागत नाही.
आता
सामान्य माणसाचे बाबतीत ही बऱ्याचदा असं घडतं!
काही दिवसांपूर्वी किरण सरनाईक आमदार म्हणून निवडून आले आणि एक जवळचे स्नेही म्हणून आणि त्यांचे स्टेटस ठेवले त्यावेळी “ज्याला म्हणजे आम्हाला कोणी स्वतःच्या गावातही ओळखत नाही अशा आमच्यासारख्या सामान्य माणसांवर सुद्धा असाच शंकेच्या प्रश्नाचा भडिमार सुरू झाला.
एका रील प्रकरणात विद्यमान तहसीलदार मॅडम संबंधाने आम्ही याच ब्लॉगवर एक मजकूर प्रसिद्ध केला तेव्हाही आम्हाला असेच फोन कॉल आले.तेव्हा
सामान्य माणसाची ही तऱ्हा असेल तर आमदाराला वेगळा न्याय लागु पडणारच..!
आमदारांच्या कामावर टीका करू नये, अशी आमची भूमिका अजिबात नाही.
पण खरा प्रश्न इथे निर्माण होतो अलीकडे कंगना बाईच्या स्वातंत्र्य-ऊत्तर काळात कुणालाही ट्रोल करण्याची जी मानसिकता वाढीस लागली आहे. समाजाची सकारात्मक मानसिकता कुठे लुप्त झाली खरा प्रश्न!
आमचा प्रश्न एवढाच आहे की, प्रत्येक पोस्टखाली विकासाचा जाब विचारण्याचे औचित्य असते का? एखादा लोकप्रतिनिधी पुस्तक वाचत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध करतो, तेव्हा त्यावर पुस्तकाच्या आशयाची चर्चा होऊ नये का? वाचनाची सवय चांगली आहे, असे म्हणणे म्हणजे त्या लोकप्रतिनिधीच्या प्रत्येक राजकीय निर्णयाचे समर्थन करणे नव्हे.
अलीकडच्या काही वर्ष फोडाफोडीच्या राजकारणाने अगदी खालची पातळी गाठलेली असताना झनक हे आजही आपल्या पक्षासोबत एकनिष्ठ आहेत.तेव्हा
व्यक्तीच्या चांगल्या सवयीचे कौतुक करणे आणि त्याच्या राजकीय कामाचे मूल्यमापन करणे. किंवा आरसा दाखवणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
सोशल मीडियावर ही एक विचित्र प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. राजकीय विचार वेगळे असतील तर समोरच्याच्या प्रत्येक कृतीला विरोध करायचाच, प्रत्येक पोस्टमध्ये दोष शोधायचाच आणि सकारात्मक गोष्टीतही नकारात्मकता पसरवायची. मग ती सामान्य व्यक्ती असो की एखादा आमदार
या प्रवृत्तीने अनेकदा विकृत स्वरूप धारण केले आहे.
राजकीय नेत्यांवरील टीका ही लोकशाहीचा आत्मा आहे; पण नेत्यांच्या समर्थकांनीही विवेक सोडू नये. विरोधकांची प्रत्येक गोष्ट चुकीची आणि आपल्या विचारांच्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट योग्य, असा अंध भक्तीचा दृष्टिकोन समाजासाठी घातक आहे.
प्रत्येक जण आपापल्या सोयीच्या गोष्टी पाहत असतो.
शेवटी पुस्तक वाचणारा प्रत्येक जण विकासकामांपासून पळ काढत असतो असे नाही आणि पुस्तक वाचण्याचे कौतुक करणारा प्रत्येक जण कोणाचा अंधसमर्थक असतो असेही नाही!
गजानन खंदारे पत्रलेखक
Disclaimer :
हा लेख कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या समर्थनार्थ अथवा विरोधात नसून, सोशल मीडियावरील बदलत्या संवादपातळीवर भाष्य करणारा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकप्रतिनिधींना विकासाचे प्रश्न विचारण्याचा अधिकार अबाधित ठेवून, केवळ टीका करताना संदर्भाचे भान असावे, हाच या लेखामागील मूळ हेतू आहे.

