‘नवसाला पावणारा देव : चमत्काराचे वास्तव की मानसिकतेचे थोतांड!’


✍️ गजानन खंदारे


समाजात देवाला “नवस” बोलण्याची परंपरा फार जुनी आणि खोलवर रुजलेली आहे. “देवाला नवस बोलला आणि तो पूर्ण झाला” म्हणजे देव पावला अशा असंख्य कथा, आख्यायिका आणि अनुभव आपण सतत ऐकत आलो आहोत.
या अशा कथातुन नवसाला पावणारे अनेक देव जन्माला आलेत. किंवा घातले गेलेत अनेक देव, देवस्थाने आणि चमत्कार प्रसिद्ध झाले. अनेक ठिकाणांची ओळखच “नवसाला पावणारा देव” अशी निर्माण झाली. ही परंपरा लोकश्रद्धे पेक्षा ती अंधश्रद्धेतून जास्त फोफावली , किंवा समाजानेच तिला अधिक बळ दिले. या अशा श्रद्धेचा खरा उगम नेमका कुठे आहे, हा प्रश्न कदाचित त्या देवालाही पडला असता.
अशा जन्माला घातलेल्या देवाचा जन्मदाता नेमका कोण हे त्या साक्षात देवालाही ठाऊक नसावे. एवढं हे अगम्य वास्तव.!

आता या गोष्टीकडे थोडा विचार करून पाहले तर असे लक्षात येते कि ,

जर देव सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वांवर समान कृपा करणारा असेल, तर तो नवस करणाऱ्याचेच ऐकेल आणि नवस न करणाऱ्याकडे दुर्लक्ष करेल का? हा साधा सरळ प्रश्न ! देवाला नारळ, हार, पैसे, पायी यात्रा किंवा दानाचे आमिष दाखवावे लागते का?

असे महत्वाचे प्रश्न उभे राहतात. सर्वांवर समान कृपा करणाऱ्या ईश्वराची कल्पना आणि नवसाची कल्पना यांत विसंगती दिसत नाही का?

याहून गंभीर बाब म्हणजे, श्रद्धेचे रूपांतर जेव्हा अंधश्रद्धेत होते, तेव्हा ती धार्मिक मानसिक गुलामी निर्माण करू लागते. अशा गुलामीत माणूस स्वतःच्या कर्तृत्वावर, विवेकावर आणि परिश्रमावर विश्वास ठेवण्याऐवजी प्रत्येक गोष्टीसाठी देव, नवस, चमत्कार किंवा मध्यस्थ यांच्यावर अवलंबून राहू लागतो. मग देवाशी नाते हे प्रेम, करुणा आणि नैतिकतेचे न राहता व्यवहाराचे बनते—“हे देवा, माझे काम कर; मी तुला अमुक देईन.”

नवस म्हणजे काय? तर
नवस म्हणजे एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाला दिलेले प्रलोभन किंवा लालूच म्हणा , व्यवहार अथवा सौदेबाजी म्हणा उदाहरणार्थ – “माझं काम झालं तर मी मंदिरात नारळ फोडेन”, “पायी चालत जाईन”, “दान करीन” इत्यादी. यामध्ये देव आणि भक्त यांच्यात एक प्रकारचा व्यवहार दिसून येतो.
यावर मी माझा या काव्य संग्रहतील अलीकडच्या या ओळी काय सांगतात..

माणसे देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखी वागतात|
आणि चार आठ आणे टाकून काहीतरी मागतात.||

तर त्या आधी सर्वच संतांनी चमत्काराचे थोतांड पूर्णपणे नाकारलेले आहे.
म्हणून जगतगुरु स्पष्ट आणि परखड शब्दांमध्ये म्हणतात
नवसे सायासे कन्या पुत्र होती, तर कशाला करावा लागे पती | याचा अर्थ स्पष्ट आहे. जर नवसानेच मुलं होत असती, तर संसार, विवाह आणि निसर्गाचे नियम यांची गरजच उरली नसती.

मग देव आणि मानवी व्यवहाराची संकल्पना नेमकी कुठून आली तर
जर देव सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि निरपेक्ष असेल, तर त्याला प्रलोभन देण्याची गरज का भासावी? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

नवस करण्यामागे मानवी मनाची एक गरज असते – अनिश्चिततेत आधार शोधण्याची. जेव्हा माणूस अडचणीत असतो, तेव्हा तो काहीतरी नियंत्रणात असल्याची भावना निर्माण करतो. नवस ही त्याचाच एक भाग आहे. यामुळे व्यक्तीला मानसिक बळ मिळते, आशा निर्माण होते आणि तो अधिक प्रयत्नशील होतो.

मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिले, तर नवस हा अनेकदा अनिश्चिततेतून निर्माण होणारा मानसिक आधार असतो. संकटात असलेला माणूस एखाद्या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवतो आणि त्यातून त्याला धीर, आशा आणि आत्मविश्वास मिळतो. अनेकदा यश हे स्वतःच्या प्रयत्नांमुळे, परिस्थितीतील बदलामुळे किंवा योगायोगाने मिळते; परंतु त्याचे श्रेय नवसाला दिले जाते. यालाच मानसशास्त्रात confirmation bias म्हणजे आपल्या श्रद्धेला पुष्टी देणाऱ्या घटनाच लक्षात ठेवण्याची प्रवृत्ती असे म्हणतात.

अशी मानसिकता समाजात भीती, अपराधीपणा आणि अवलंबित्व वाढवते. काही ठिकाणी याच भावनेचा वापर करून आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक शोषणही केले जाते. श्रद्धेचा बाजार मांडला जातो आणि देवापेक्षा देवाचे दलाल अधिक प्रभावी ठरतात.

श्रद्धा ही माणसाला नैतिकता, संवेदनशीलता आणि चांगल्या कर्मांची प्रेरणा देणारी असावी. पण ती जर विवेक, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि स्वकर्तृत्व यांना दुय्यम ठरवत असेल, तर ती श्रद्धा नसून मानसिक गुलामी ठरते
श्रद्धा आणि अंधश्रद्धा
श्रद्धा ही सकारात्मक असते, परंतु जेव्हा ती विचारशून्य होते तेव्हा ती अंधश्रद्धेत बदलते. नवस जर फक्त मानसिक बळ देण्यासाठी असेल, तर तो निरुपद्रवी आहे. पण जर तो भीती, दबाव किंवा अज्ञानातून केला जात असेल, तर तो समाजासाठी घातक ठरू शकतो.
सामाजिक आणि आर्थिक परिणाम
काही ठिकाणी नवसाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जातो. गरीब माणूसही कर्ज काढून नवस पूर्ण करतो. यामुळे आर्थिक ताण वाढतो. तसेच काही ठिकाणी याचा गैरफायदा घेतला जातो.
आध्यात्मिक दृष्टीकोन
अनेक संत आणि विचारवंतांनी सांगितले आहे की देवाला प्रलोभनाने नाही तर शुद्ध भावनेने प्राप्त करता येते. भक्ती म्हणजे व्यवहार नाही, तर आत्मिक अनुभव आहे. देवाला नवस नव्हे, तर प्रामाणिकपणा आणि चांगले आचरण अधिक महत्त्वाचे आहे.
निष्कर्ष
“नवसाला पावणारा देव” ही संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे असे म्हणता येणार नाही, पण ती शाब्दिक अर्थाने घेतली तर ती दिशाभूल करणारी ठरते. नवस हा देवाला बदलत नाही, तर तो माणसाच्या मनाला बळ देतो. त्यामुळे नवसाकडे अंधश्रद्धेने नव्हे तर समजूतदारपणे पाहण्याची गरज आहे.
शेवटी, देव हा व्यवहाराचा विषय नाही; तो अनुभवाचा आणि श्रद्धेचा विषय आहे. नवसापेक्षा कर्म, प्रामाणिकता आणि विवेक हाच खरा मार्ग आहे.

गजानन खंदारे रिसोड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top