💬 WhatsApp ग्रुप जॉइन करा

कष्ट करणारा गरीबच का? श्रमाला प्रतिष्ठा नसलेल्या समाजाचं हे कटू वास्तव!

श्रमाधिष्ठित समाजाचे सामाजिक वास्तव..

प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही कष्टकरी, श्रमकरी समाजाच्या कष्टावर उभी असते मग तो कारखान्यात काम करणारा कामगार असेल किंवा शेती करणारा शेतकरी, शेतमजूर असेल.. किंवा कचरा उचलणारा, नाल्याची साफसफाई करणारा कामगार असेल.. आजच्या या जागतिकीकरणाच्या आधुनिक अर्थव्यवस्थेत सेवा देणारे अनेक क्षेत्र आहेत.. मग तो एखादा आयटी क्षेत्रामध्ये संगणकावर काम करणारा इंजिनीयर असो किंवा दवाखान्यात अगदी नर्स पासून तर मोठ-मोठे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर्स पर्यंत सेवा देणारे डॉक्टर्स वकील, शिक्षक, बँक, रेल्वे, बस सेवा, एमएसईबी किंवा इतर विविध क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, किंवा छोटे-मोठे उद्योग करणारे, व्यवसाय करणारे व्यवसायिक असोत या सर्वांच्याच कष्टावर त्या त्या देशाची अर्थव्यवस्था चालत असते

आपल्या देशात जे कष्टाची कामे करतात त्यांच्या श्रमाला मोल नाही.. श्रमाची प्रतिष्ठा जपल्या जात नाही आणि त्यामुळे अशा कष्टकरी समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे.. हा वर्ग असंघटित वर्गात मोडला जातो त्यामुळे हा वर्ग मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकला गेलेला आहे असे दिसते.. या वर्गात व्यसनाधीनतेचे प्रमाण खूप असते हालाखीची परिस्थिती, आर्थिक विवंचना, कर्जाचा डोंगर, आणि दैनंदिन जगण्याचा संघर्ष यामुळे अनेक जण व्यसनाच्या आहारी जातात.. शारीरिक श्रमामुळे येणार थकवा घालवण्यासाठी आणि आर्थिक विवंचनेमुळे येणारा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी व्यसनाचा आधार घेतला जातो.. दारू, तंबाखू , बिडी, गुटखा यासारख्या अमली पदार्थाचा व्यसनासाठी वापर केला जातो यामुळे तात्पुरते समाधान मिळत असले तरी त्याचे अतिशय दूरगामी गंभीर आणि विपरीत परिणाम त्या व्यक्तीवर आणि कुटुंबावर होत असतात.. कौटुंबिक हिंसाचार वाढतो, घरात सतत होणाऱ्या वादामुळे लहान मुलांच्या शिक्षणावर आणि संस्कारावर विपरीत परिणाम होतात.. आणि त्यामुळे सर्वच कुटुंबाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते या अतिशय गंभीर समस्येवर शासनाकडून आणि समाजाकडून कोणत्याही प्रकारच्या उपायोजना केल्या जाताना दिसत नाहीत.. हा सामाजिक वर्ग दारिद्र्याच्या दुष्टचक्रात अडकला गेलेला आहे त्यामुळे या श्रमकरी , कष्टकरी समाजाची स्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे

बौद्धिक श्रम करणारा वर्ग यापेक्षा थोडा उच्च मानला जातो यांच्या श्रमाला थोडी अधिक किंमत आहे यांचे दोन वर्गात विभाजन करता येईल एक म्हणजे मिळणाऱ्या पगारात तुकाराम मुंढे साहेबांसारखं प्रामाणिकपणे आपले काम करणारा.. अनेक शासकीय कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे आपले काम करतात काम करत असताना कोणताही कामाचा गाजावाजा करत नाही आपलं नाव व्हावं हा त्यांचा हेतू नसतो आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे ही त्यांची भूमिका असते.. हा वर्ग मोठा आहे यांची संख्या जास्त आहे.. आणि दुसरा म्हणजे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून इतरांचं शोषण करणारा वर्ग यांची नजर केवळ पैशावर असते पैशाशिवाय यांना दुसरं काही दिसत नाही काल किती कमावले.. आणि आज किती कमावता येतील याकडे यांचे लक्ष असते.. खेड्यापाड्यातून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या कार्यालयामध्ये जेव्हा एखादा सामान्य माणूस येतो त्यावेळेस त्याच आर्थिक शोषण करण्याचे काम हे अधिकारी कर्मचारी करत असतात.. कार्यालयातील आपलं काम करणे ही त्यांची जबाबदारी असते.. मात्र आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून त्या कामाचा मोबदला ते गोरगरीब सामान्य माणसाकडून घेत असतात.. ना विलाजाने.. त्या व्यक्तीला वारंवार चक्रा मारण्याऐवजी कामाचा मोबदला म्हणून पैसे देणे कबूल करावे लागते.. एकाच कार्यालयामध्ये असलेले काही अधिकारी कर्मचारी पैसे घेतात तर काही घेत नाही यावरून असे म्हणता येईल की प्रामाणिकपणा हा रक्तातच असतो.. अशा भ्रष्टाचारी , अप्रमाणिक अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे यावर मात्र कोणाचाही वचक नाही त्यामुळे असे अधिकारी अधिक मुजोर झालेले दिसतात.. यांच्याकडे सामाजिक संवेदना दिसत नाही.. या वर्गातील लोक आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा आणि अधिकाराचा उपयोग समाजाच शोषण करण्यासाठी करत असतात.. आर्थिक हव्यासापोटी यांनी नैतिकता, माणुसकी आणि इमान विकलेली असते.. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ असते कारण यातील काही वाटा हा त्या भ्रष्ट पुढार्‍यांना मिळत असतो.. त्यामुळे ते अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण करत असतात.. यांच्या या वर्तनामुळे चांगला वर्ग बदनाम होत असतो..

राजकीय सत्ताधाऱ्यांचा वर्ग याहीपेक्षा वेगळा असतो यातील काही लोककल्याणकारी भावना ठेवून स्वातंत्र्य , समता आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काम करतात.. सामाजिक समता आणि शोषणमुक्त समाजासाठी राजसत्तेचा वापर करतात.. यांची संख्या नगण्य असते.. राजकारणात शंभरात एखादा असा प्रामाणिकपणे काम करत असतो.. आणि बाकी केवळ सत्तेचा उपभोग घेण्यासाठी समाजामध्ये जातीपातीचे विष पेरून, खोटी प्रलोभाने देऊन, धर्माची नशा देऊन , धार्मिक अंधश्रद्धा पसरवून, सत्ता मिळविण्यासाठी लोकशाहीची हत्या करणारेच आहेत.. हे सत्ता हाती आल्यानंतर सत्तेतून पैसा आणि नंतर पैशातून सत्ता या समीकरणावर राजसत्ता उपभोगत असतात.. शोषित कष्टकरी समाजाला खोटी प्रलोभणे दाखवणे , त्यांना शब्दाच्या मायाजालात फसवणे , माया दाखवून माया जमा करणे.. अशी यांची मानसिकता असते.. याला श्रमकरी कष्टकरी समाज बळी पडतो आणि पुन्हा दारिद्र्याच्या दुष्टचक्रात अडकतो..

शेतीपासून मोठ्या उद्योगधंद्यापर्यंत सर्वच प्रकारच्या उद्योग व्यवसायामध्ये कुशल व अकुशल कामगारांची आवश्यकता असते त्यावरच उद्योग उभे असतात भारतात काम करणाऱ्या लोकांपैकी दोन तृतीयांश लोकांचा उदरनिर्वाह हा शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायावर चालतो.. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.. आणि ती देशातील रोजगार, अन्नधान्य आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावते.. तरी शेती आणि शेतकरी शासनाकडून दुर्लक्षित आहे.. मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी शेतीमधून निर्माण होतात मात्र कष्टाला योग्य न्याय मिळत नसल्या कारणामुळे आणि शासन स्तरावर सुद्धा शेती दुर्लक्षित असल्या कारणामुळे शेतीवर अवलंबून असलेला वर्ग हा आर्थिक विवंचनेत सापडलेला दिसतो कोणत्याही बँका शेतीवर पतपुरवठा करत नाहीत.. शेतीसाठी लागणारा खर्च, कुटुंबाचे भरण पोषण आणि घरातील सुख दुःख , लग्न प्रसंग यासाठी लागणारा पैसा कुठून उभा करायचा ही मोठी समस्या शेतकरी आणि कष्टकरी वर्गाकडे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडून अव्वा च्या सव्वा व्याज दराने आपल्या जमिनी, घरे, सोने नाणे गहाण ठेवून कर्ज घ्यावे लागते त्या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही.. कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि त्यातूनच मग कौटुंबिक कलह निर्माण होतात कुटुंबप्रमुखाला कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा.. मुलांचे शिक्षण, लग्न कसे करायचे या असंख्य समस्येतून तो व्यसनाधीनतेकडे वळतो मुला बाळांच्या शिक्षणाला ब्रेक लागतो काही तर आत्महत्येसारखा मार्ग अवलंबतात त्यामुळे श्रमप्रतिष्ठेची संकल्पना केवळ पुस्तकातच शोभून दिसते असे म्हणावे लागेल…

विजय बोरकर
श्री शिवाजी हायस्कूल, हराळ
(रिसोड वाशिम )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top