💬 WhatsApp ग्रुप जॉइन करा

त्या दिवशी मला भिंती बोलताना ऐकू आल्या..

.शाळेची दुपारची सुट्टी झाली होती.मध्यान्ह भोजनाचा मंद सुगंध अजूनही वातावरणात दरवळत होता. मैदानावर काही मुले कबड्डी, तर काही क्रिकेट व काही इतर खेळ खेळत होते आणि काही मुलं अजूनही डब्याभोवती गप्पा मारत बसली होती. वर्गात दोन-तीन मुलं वही उघडून राहिलेला गृहपाठ पूर्ण करत होती. काही मुली एकमेकींसमोर बसून पाठांतरात दंग होत्या.
शाळा नेहमीसारखीच जिवंत होती.स्टाफ रूम मध्ये दुपारचा चहा घेतल्यानंतर मी वॉशरूम साठी बाहेर निघालो तेवढ्यात शाळेच्या व्हरांडयात उभ्या असलेल्या मुलाकडे माझे लक्ष गेले.तो एकटाच भिंतीजवळ उभा होता. मान उंचावलेली. डोळे भिंती वर खिळलेले…. इतका तल्लीन की आजूबाजूचा गोंधळही त्याच्या काना पर्यंत पोहोचत नव्हता.पहिल्यांदा वाटले, एखादा नकाशा पाहत असेल. कदाचित एखादे चित्र न्याहाळत असेल.
पण जवळ गेल्यावर लक्षात आले…तो भिंतीवर लिहिलेला एक सुविचार वाचत होता.फक्त वाचत नव्हता. प्रत्येक शब्दावर थांबत होता. एखादा शब्द पुन्हा उच्चारत होता. त्याचा अर्थ आपल्या लहानशा अनुभवविश्वाशी जोडून समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.त्या क्षणी माझ्या मनात एक विचार विजे सारखा चमकून गेला….
आपण समजतो, शिक्षण वर्गात सुरू होते. पण खरं तर शिक्षण जिथे जिज्ञासा जागी होते, तिथून सुरू होतं.त्याला फळा लागत नाही…खडू लागत नाही…घंटा लागत नाही…लागते तो फक्त विचार करण्याची इच्छा….मी त्याला विचारलं,काय वाचतोस ?तो म्हणाला….सर… हा सुविचार वाचत आहे.
मी त्याला आणखी काही संदेश वाचायला सांगितले. तो आत्म विश्वासाने वाचू लागला.अचानक माझी नजर व्यसन मुक्तीच्या संदेशा कडे गेली.मी सहज म्हणालो, हा पण वाच.त्याने तो संदेश मोठ्याने वाचला.मात्र वाचून झाल्यावर तो शांत झाला.त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. काही क्षण तो खाली मान घालून उभा राहिला.मी विचारलं, काय झालं रे? त्याने माझ्याकडे पाहिलं. तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी तराळलेलं मला दिसलं…..
अगदी शांत आवाजात तो म्हणाला सर… व्यसनामुळे आमचं कुटुंब बरबाद झालं हो… मी चुकूनही आयुष्यात व्यसन करणार नाही.त्या एका वाक्याने माझ्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले.त्या क्षणी माझ्या समोर विद्यार्थी नव्हता.आयुष्याने अकाली मोठं करून टाकलेलं एक निष्पाप बालपण उभं होतं.त्या दिवशी मी काहीच बोललो नाही पण….
दुसऱ्या दिवशी सहज त्याच्या कुटुंबाची चौकशी केली आणि त्याच्या आयुष्याचा पडदा हळूहळू उघडत गेला.मोजकीच शेती….वडील व्यसनाच्या विळख्यात.घरात रोजचा कलह.शेवटी आई-वडिलांचे मार्ग कायमचे वेगळे झाले.आई मुलाला घेऊन माहेरी आली.पण जिथे आधार मिळेल असं वाटलं, तिथेही व्यसनाच्या सावल्या आधीच पसरल्या होत्या.
त्या मुलाने अजून आयुष्य समजूनही घेतले नव्हते, पण आयुष्याने त्याला दुःखाची भाषा शिकवली होती.मी बराच मनातल्या मनात विचार करू लागलो…व्यसन फक्त एक माणूस संपवत नाही..ते संपूर्ण कुटुंबाची स्वप्नं जाळतं.मुलांच्या हसण्यावर काळी रेघ ओढतं.त्यांच्या बालपणावर अकाली प्रौढत्व लादतं.
त्या मुलाने त्या दिवशी व्यसनमुक्तीचा संदेश वाचला नव्हता…तो स्वतःचे आयुष्य वाचत होता.भिंतीवर लिहिलेल्या प्रत्येक शब्दामागे त्याला स्वतःचे घर दिसत होते.म्हणूनच तो म्हणाला सर… मी चुकूनही व्यसन करणार नाही.त्या क्षणी मला शाळेच्या भिंतींवर लिहिलेल्या शब्दांचे सामर्थ्य समजले.ते फक्त रंगीत अक्षरं नव्हती.ती एखाद्या मुलाच्या आयुष्याला दिशा देणारे…. महापुरुष… असल्याचे जाणवलं.
आजही मी रोज शेकडो विद्यार्थ्यांना पाहतो.कोणाचे गणवेश फाटके असतात, कोणाचे मळके असतात.कोणाच्या पायात चप्पल नसते… तर कोणाच्या दप्तरात वह्या नसतात.पण सर्वांत जास्त अदृश्य असतात त्या त्यांच्या मनावरच्या जखमा.त्या आपल्याला दिसत नाहीत.
आणि म्हणूनच शिक्षकांची जबाबदारी केवळ अभ्यासक्रम शिकवण्या पुरती उरत नाही. तर मुलांना आशा शिकवावी लागते.जगण्याचा अर्थ शिकवावा लागतो.स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवावे लागते.
त्या दिवशी मला समजलं….शाळेच्या भिंतींवर लिहिलेला प्रत्येक सुविचार हा सजावटीचा भाग नसतो,तो एखाद्या मुलाच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या आयुष्याला धरून ठेवणारा शेवटचा धागा असतो आणि तेव्हाच माझ्या मनात एक विचार कायमचा कोरला गेला…
शाळा ही अशा मुलांसाठी केवळ शिक्षणाची जागा नसते. ती त्यांच्या जखमी बालपणाला आधार देणारी कुशी असते. ती तुटलेल्या स्वप्नांना पुन्हा उभं करण्याची ताकद असते आणि अनेक मुलांसाठी… तीच अंधारात तेवत राहिलेली आशेची शेवटची पणती असते… म्हणून त्या दिवशी दुपारच्या सुट्टीत मी एका मुलाला वाचताना पाहिलं नव्हतं…तर एका शाळेला बोलताना ऐकलं होतं…. म्हणून जेव्हा जेव्हा मी शाळेच्या भिंतीकडे पाहतो तेव्हा… तेव्हा त्या बोलक्या भिंतीकडे पाहून…. असे वाटते……..

भिंती भिंतीवर ज्ञानाचा प्रकाश….
अक्षरांचा भास जिकडे तिकडे…..
​सुविचार सुंदर सांगती नीती….
घडवितात मती लेकरांची…..
​चित्रे अन् आकडे नकाशांची ओढ….
लावे मोठी गोड शिकण्याची….
​सांगती इतिहास थोर महात्मे….
जागवती आत्मे संस्कारांचे….
​शाळेच्या भिंती या नव्हत्या केवळ शिळा…
ज्ञानानेच लावला लळा आम्हा….

शब्दांकन…
दिलीप भिसडे
( सहाय्यक शिक्षक )
स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय, धोडप बु.
9767926227

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top