नेते की पत्रक छाप भिकाऱ्याच्या टोळ्या ?

आता पावसाचा काही ठावठिकाणा राहिलेला नाही. आधी जसा नियमित, वेळेवर आणि आशीर्वादासारखा पाऊस यायचा, तसा तो उरलेलाच नाही. आत्ता दोन थेंब पडले की लोक घाबरतात -कोणी ओले कपडे सुकवतं, कोणी चप्पल धरून पळतो. थोडा जरी पाऊस झाला, तरी लगेच बोंब सुरू होते – ढगफुटी झाली, रस्ते भरले, शाळा बंद करा!

त्या ढगांनी फक्त पाणीच नाही, तर आपलं नियोजनही उघडं पाडलेलं असतं. कारण पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आपणच अडवलेला असतो – प्लास्टिकच्या नाल्यांनी, सिमेंटच्या जंगलांनी, आणि लालसेच्या रोडरोलरने. पण खरा प्रश्न पावसाचा नाही, तर माणसाच्या मनाचा आणि व्यवस्था बिघडवणाऱ्या मनोवृत्तीचा आहे. आपणच प्लास्टिक फेकून गटारं बंद केली, घरं सिमेंटात पुरली, नाले बुजवले. पावसाचे परंपरागत नैसर्गिक प्रवाह बंद पाडले, त्यामुळे पावसाचं पाणी वाहायला रस्ता नाही. त्यात पाणी साचतं, वाहून जातं, शेती खराब होते, जनावरं अडकतात, आणि मग सुरू होतो दुसरा खेळ – “पत्रक छापा!”
या गावातले त्या गावातले ,खालच्या आळीचे वरच्या वेटाळचे , सभागृहातले ,मुंबईचे ,दिल्लीचे खातेप्रमुख झाडून खरडून वाहून भरते आलेले सगळेच नेते आपआपल्या टेबलावरून पत्रकं छापायला लागतात. कुठे ढगफुटीचं, कुठे शेतातल्या नुकसानीचं…. मग झाडझडती होते… खरडून गेलेली वाफसा, वाहून गेलेली माती, उध्वस्त झालेली कर्जाची आशा. पंचनामे करा, फोटो काढा, अंगठा घ्या… आणि मग “भरपाई देतो” या बहाण्याखाली थोडंसे तुकडे फेकले जातात – भीक म्हणून.!तेच ते जुने चेहरे काही नविन– लोकप्रतिनिधी, अधिकारी, पुढारी – एकाच चावडीवर उभं राहून फोटो काढतात, आणि पत्रकं छापतात. “ढगफुटी! नुकसान! पंचनामे सुरू!”
पण खरं कायदा बनवणं, निर्णय घेणं, धोरण तयार करणं कुणाच्या हातात असते ! हे सगळंच बाजूला!
शेती गेली, माणसं उध्वस्त झाली, तरी फक्त पत्रकं येतात – कायद्याचे शब्द मात्र येत नाहीत.जे हातात कलम घेऊन कायदे बनवायला हवेत, ते आज कलम सोडून फक्त प्रेस नोट छापतात.
शेतकऱ्याच्या श्रमाला, हक्काला , आणि त्याच्या मालाला काहीही किंमत नाही. पण नेत्याच्या फोटोला, घोषणेला, आणि बातमीला मात्र प्रचंड मोल आहे.म्हणजे हे सगळं बघून एकच वाटतं –
हे राजकीय नेते म्हणजे फक्त पत्रक छापून भिक मागणाऱ्या टोळ्याच उरल्या आहेत ,व्यवस्था बदलाची ताकत आणि क्षमता यात कधी निर्माण होणार हा खरा प्रश्न आहे बाकी पाऊस निसर्गाचं देणं आहे. पण तो आपली जबाबदारीही अधोरेखित करतो.

गजानन खंदारे रिसोड

लेखक हे पत्रलेखक व अभ्यासक आहेत

सर्व प्रतिमा प्रातिनिधिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top