💬 WhatsApp ग्रुप जॉइन करा

आपण खरंच धार्मिक होत आहोत की,फक्त धार्मिक दिसत आहोत?

हल्ली कुठल्याही मंदिरात गेलं की दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात.
त्यातच
श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच भक्तीची धार्मिकता जाणवू लागते.
खरं तर श्रावण महिन्याची ओळखच ही “भक्तीमास” म्हणून आहे.
शिवाची उपासना मोठ्या आस्थेने केली जाते.
जागोजागी कावड मंडळांची लगबग दिसते. भगवे झेंडे, डीजे, घोषणा, मिरवणुका आणि भक्तांची गर्दी रस्त्यावर दिसू लागते.
दिंडी आणि वारी ही केली जाते
मंदिरांमध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. अनेक ठिकाणी तर मंदिराच्या आवारात गर्दी मावत नाही.

खरंच… लोक किती धार्मिक झालीत!
हे खरे असले तरी त्यातून धार्मिक मूल्य किती रुजतात यावर विचार करायला कोणाकडेच वेळ नाही.
आषाढी एकादशी पासून चातुर्मास संपेपर्यंत
उपवासाचा देखावा निर्माण केला जातो.

सकाळच्या चहापासून रात्रीच्या झोपेपर्यंत फराळाचे वेगवेगळे पदार्थ पचवले जातात.
दिवसभर फराळ खाऊन उपवास आहे असं आपण ज्या वेळेस सांगतो त्यावेळेस आपण नेमकं स्वतःला फसवतो की देवाला?
हा विचार कोणीच करताना दिसत नाही.

देवाच्या बॅनरपासून सोशल मीडियावरील पोस्टपर्यंत सर्वत्र भक्ती दिसते.
देवाच्या बॅनरवरही आता पारंपरिक धार्मिक प्रतिमेपेक्षा मॉडेलिंगच्या धर्तीवर तयार केलेले आकर्षक फोटो दिसू लागले आहेत. भक्तीला देखील आता ग्लॅमरची किनार आली आहे.

आमच्या प्रत्येक श्वासात आणि जीवनात असलेला आमचा ‘राम’ आता केव्हाच फक्त ‘‘जय श्रीराम”च्या घोषणेत अडकला आहे.

रामाचा अर्थ काय?

त्याग, संयम, कर्तव्य, मर्यादा, सत्य, माणुसकी…

पण या मूल्यांपेक्षा घोषणा मोठी झाली तर आपण नेमकं काय साध्य करतो आहोत?

म्हणूनच प्रश्न पडतो—

यातून आपण आपण खरंच धार्मिक बनत आहोत की फक्त धार्मिक दिसत आहोत?
या सगळ्या गर्दीकडे पाहताना एक प्रश्न मात्र मनात कायम येतो
.. जर समाजात धार्मिकता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल, तर मग धार्मिक मूल्ये कुठे आहेत? आमची पारंपारिक सामाजिक मुल्य कुठे हरवली आहेत ?

अर्थात हे सर्वच सरसकट आहे किंवा एकतर्फी आहे अस मुळीच म्हणता येणार नाही. समाजामध्ये अनेक चांगली माणसं आहेत अनेक चांगली तत्व आहेत .आणि त्याला अपवाद ठरणारी असंख्य उदाहरणंही आहेत.. पण विशेषता आमची तरुण पिढीबद्दल विचार करायला हवा

देव शोधायला निघालेल्या या पिढीला देव सापडेल की नाही माहित. नाही पण

सामाजिक सभ्यता,
कौटुंबिक शिष्टाचार,
मोठ्यांचा आदर,
लहानांबद्दलची माया,
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरवलेल्या माणुसकीला शोधणे गरजेचे आहे.

मंदिरात जाणं चांगलंच आहे. उपासना करणं चांगलंच आहे. कावड, दिंडी, वारी आणि भक्तीची परंपरा जपणंही आवश्यक आहे. पण या सगळ्याबरोबर जर माणसातला माणूस जिवंत ठेवता आला नाही, तर आपल्या भक्तीचा अर्थ तरी काय? कारण देव शोधण्यासाठी मंदिरात जाण्यापूर्वी… आपल्या वागण्यातला देव शोधणं अधिक गरजेचं आहे.शेवटी आपल्या या पिढीला धार्मिक श्रद्धा, आस्था आणि भक्ती शिकवणं गरजेचं आहे..

धार्मिक उन्माद नव्हे! कारण धर्म माणसाला जोडण्यासाठी आहे, एकमेकांपासून तोडण्यासाठी नाही.

गजानन खंदारे

संभाजी ब्रिगेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top