मराठा सेवा संघाच्या ३६ वर्षांच्या प्रवासाकडे आज नव्याने पाहण्याची गरज आहे का?

वर्षानुवर्षांच्या सामाजिक, मानसिक आणि वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी एकजूट, विचार आणि संघटन हीच खरी ताकद आहे. मराठा सेवा संघाने समाजाला केवळ संघटित करण्याचा प्रयत्न केला नाही, तर प्रश्न विचारण्याची, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि विवेकाने विचार करण्याची दिशा दिली. आज गरज आहे ती व्यक्ती, गट आणि पदांपलीकडे जाऊन समाजाच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्याची. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून जर समाजाने परिवर्तनवादी विचारांच्या झेंड्याखाली एकजूट दाखवली, तर कोणतीही गुलामगिरीची मानसिकता आपल्याला रोखू शकणार नाही. मराठा सेवा संघ हा पर्याय नसून समाजाला वैचारिकदृष्ट्या सक्षम आणि संघटित करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचे माध्यम आहे.
प्रश्न एवढाच—आपण फक्त इतिहासाचा अभिमान बाळगणार, की त्या विचारांना कृतीची जोड देऊन भविष्य घडवणार?
@ कामाच्या-गोष्टी


एक सप्टेंबर 1990 रोजी अकोला येथे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीची स्थापना केली . चळवळ ही समाजाच्या विकासासाठी विचार पुरवणारे माध्यम असते . कोणत्याही सामाजिक परिवर्तनवादी चळवळीचे मानव कल्याण हेच अंतिम उद्दिष्ट असायला हवे . अन्यायाची जाणीव निर्माण करणे , अन्यायग्रस्तांना संघर्षासाठी प्रेरित करणे , अन्यायाविषयीची चीड निर्माण करणे हे चळवळीचे महत्त्वाचे अंग असावे. चळवळीच्या माध्यमातून आपल्याला आपला इतिहास, महामानव यांचे वास्तव दर्शन व्हायला पाहिजे. आपल्या गरजा काय ? अधिकार कोणते ? समाजव्यवस्था आणि शासन व्यवस्था याची ओळख होऊन आपल्या प्रगतीतील अडथळे कोणते याचे आत्मपरीक्षण करण्यापासून समृद्ध जीवनापर्यंतचा विचार चळवळ आपल्याला देत असते . चळवळीमुळे आपल्याला जगाची ओळख होते आणि चळवळीत वाहून घेऊन निस्वार्थ भावाने काम केल्यास त्या व्यक्तीस व चळवळीस जग ओळखत असते. मराठा बहुजन समाजाच्या विद्यमान सामाजिक जीवनाला जो आकार प्राप्त झाला आहे तो मराठा सेवा संघाच्या वैचारिक चळवळीचे फलित आहे.


ज्यावेळेस समाजात समस्या निर्माण होतात त्यावेळेस संघटनेचा जन्म होतो. 1990 च्या कालखंडापर्यंत मराठा व बहुजन समाजाची आर्थिक , सामाजिक , शैक्षणिक स्थिती अत्यंत दयनीय होती. शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक विवंचनेत असलेला समाज व्यसनाधीनतेकडे व धार्मिक कर्मकांडाकडे वळू लागला होता, स्त्रिया व्रत वैकल्ये , उपवास , परमार्थप्राप्ती व मोक्षप्राप्ती यात अडकल्या होत्या. अशा रीतीने अंधारात चाचपडत असलेल्या समाजाला मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आधुनिक विचाराची चाबी मिळाली. मराठा सेवा संघाचा विज्ञानवादी , वास्तववादी , बुद्धी प्रामाण्यवादी परिवर्तनवादी नवविचार मिळाला मराठा सेवा संघाचे वक्ते , प्रबोधनकार खेड्यापाड्यावर जाऊन समाजाचे प्रबोधन करू लागले . प्रबोधन चळवळीमुळे समाजमन ढवळून निघाले. अनेक वैचारिक संघटनांना सुद्धा मराठा सेवा संघाचे विचार पटायला लागले त्यामुळे जातीय सलोखा निर्माण होऊन धार्मिक व जातीय दंगली कमी व्हायला लागल्या..

प्रेरक महामानवांचे विचार आणि मराठा सेवा संघाच्या प्रेरणादायी विचारामुळे समाज परिवर्तन घडून आले. सध्याच्या परिस्थितीत कॅडरबेस कार्यकर्त्यांची कमतरता जाणवत आहे. मराठा सेवा संघाच्या चळवळीला वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली पाहिजे. कॅडरबेस पदाधिकारी हा संघटनेचा कणा असतो. स्वार्थी आणि संकुचित हेतू ठेवून संघटनेत सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांचे आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे कॅडर कॅम्प च्या माध्यमातून उद्बोधन व मत परिवर्तन करणे आवश्यक आहे

आज मराठा सेवा संघाचे विविध 32 कक्षाच्या माध्यमातून काम सुरू आहे. संघटनेला व संघटनेच्या विचार धारेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळ देणाऱ्या सर्व बांधवांना मराठा सेवा संघाच्या स्थापना दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा…

जय जिजाऊ

विजय बोरकर
श्री शिवाजी हायस्कूल हराळ
(मराठा सेवा संघ रिसोड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top