घास भरवत-भरवत उंच आकाशी गगन भरारी घेण्यासाठी ज्या चिल्या-पिल्यांच्या पंखांना बळ दिले. तीच चिली-पिली जेव्हा वयोवृद्ध आई-वडिलांना नाकारायला लागतात. किंबहुना लाथाडायला देखील लागतात. अशा अगतिक, असहाय आणि अनाथ व्यक्तींच्या जीवनातील सल म्हणजे समाजमनावरील भळभळती जखम!! जी या नटसम्राटाने अचूकपणे मांडली. नटसम्राट रंगवताना नानांनी आपल्या सशक्त अभिनयातून जशी डॉ.श्रीराम लागू यांची प्रकर्षाने आठवण करून दिली.तशी त्यांनी सुखासीन व विलासी जीवन जगणाऱ्या अनेक पोरा-सुनांना, लेकीबाळींना त्यांच्या आई-वडिलांच्या त्यागाच्या राशींचे आपल्या दमदार अभिनयातून स्मरण सुद्धा करून दिले.
शेक्सपियरच्या हॅम्लेट मधील हॅम्लेटने अगतिक होऊन To be or not be? या स्वगत संवादातून मांडलेले अंतरीचे द्वंद्व नानांनी नटसम्राटाच्या माध्यमातून हृदयस्पर्शी केले.
नटसम्राट मधील अप्पा बेलवलकर रंगवताना ' घर देतं का कोणी, घर? ' असा करुणामय सवाल करणारे नाना, रसिक प्रेक्षकांच्या मन-मस्तकात आज कायमचे घर बांधून गेलेत!
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दुःखीतांचे आणि विशेषता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारांचे अश्रू पुसणाऱ्या नाना पाटेकर नावाच्या एकाच माणसानी... भारतीय जनमानसाला रील हिरो व रियल हिरो ताकदीनिशी जगवून दाखवले!
सिने सृष्टीतील अजित, अमरीश पुरी,अमिताभ बच्चन व नाना पाटेकर इत्यादी सर्वच भारदस्त आवाजाचे धनी! परंतु नानांचा कणखर व भारदस्त आवाज त्यांच्या सामाजिक बांधिलकीने व साध्या राहणीने जनमानसात अधिकच बुलंद केला आहे. जो महाराष्ट्राच्या कडे कपारीतून 'यावच्चंद्र दिवाकरो' प्रतिध्वनीत होणार आहे. यात मुळीच शंका नाही.
पडद्यावर हिरो असणाऱ्या व पडदा पडल्या नंतर देखील हिरोच असणाऱ्या दिवंगत नानांना भावपूर्ण श्रद्धांजली!

© प्रशांत देशमुख
समर्पण, वाशीम.
९९७५१२२५७५
