✍️ गजानन खंदारे
आज वाऱ्याने आपला प्रवाह जरा बदलला होता.
कधी मंद, तर कधी अचानक झंझावातासारखा उसळत
तो स्वतःभोवती गिरक्या घेत धुळीचे लोट उडवत होता.
तरीही रणरणत्या उन्हात मृगजळाचे पाट स्पष्ट वाहताना दिसत होते.
अवतीभवतीच्या कडक उन्हाला तोंड देत माझा बाप मात्र अजूनही चालतच होता…
उन्हाची पारग वेळ केव्हाच टळून गेली होती.
त्याच्या अंगात आता त्राण, अवसान—काहीच उरले नव्हते.
सळसळणारं रक्तही जणू गोठलं होतं, आणि
अंगातून वाहणारा घामही आता आटून गेला होता.
खोपीच्या अडोशाला ठेवलेल्या एका पालवात
गुंडाळलेली कसलीशी वस्तू त्याने माझ्या हातात दिली…
तो हळूच म्हणाला,
“आता एवढंच आहे तुझ्यासाठी…”
मी चकित होऊन विचारलं, “काय आहे हे?”
तो म्हणाला,
“तुझ्या आजोबांना एका महात्म्याने दिलं होतं.
तुमच्या पिढ्यांच्या उद्धारासाठी हे कामी येईल असं सांगितलं होतं.
बापानं जपून ठेवलं… आता वारसाहक्काने
माझ्याकडे आलं… आणि आता तुझ्याकडे.
मी कधी उघडलं नाही… तुझ्यासाठी सांभाळून ठेवलं.
माझ्याकडे आता दुसरं काहीच नाही…
या व्यवस्थेने सगळं काढून घेतलं…”
बापूचं बोलणं ऐकून मी गोंधळलो.
मनात विचार आला—काहीतरी मौल्यवानच असेल…
सुवर्णमुद्रा, दागिना, किंवा काही तरी मोठं धन…
त्या उत्सुकतेने मी लगबगीने पालव उकलायला सुरुवात केली.
कागदात गुंडाळलेली ती जाड वस्तू हळूहळू उघडत गेलो…
आजोबांना मिळालेली ती भेट—जशीच्या तशीच होती.
आजोबांनी कधी उघडून पाहिली नव्हती…
बापानेही नाही…
ती माझ्यासाठीच जपून ठेवली होती.
आणि अखेर माझ्या हातात आलं—
जगातील महान ग्रंथांपैकी एक—
शेतकऱ्याचा आसूड आणि गुलामगिरी
क्षणभर मी स्तब्ध झालो…
मनात विचार चमकून गेला—
जर आजोबांनी, बापाने हे केव्हाच उघडून वाचलं असतं,
तर माझ्या बा-चा आसूड या व्यवस्थेवर कोरडे काढत ,
या लादलेल्या गुलामगिरीतून केव्हाच मुक्त झाला असता …
तर कदाचित या झोळीवाल्या बाबांच्या
खुळखुळ्या अवलादी इतक्या माजल्याच नसत्या…
जयंती निमित्त
तमाम फुले प्रेमींच्या विचाराच्या वारसदारांना समर्पित 🙏
—
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, वाशिम
- “सहजीवनाच्या गद्दे पंचविशीत ” ती ..आणि माझ्या प्रेमाची गोष्ट !
पती-पत्नीचं नातं हे केवळ नवरा-बायकोचं नातं नसतंच मुळी; ते खऱ्या अर्थाने परस्पर सहजीवनाचं नातं असतं. म्हणूनच हे नातं जगाला दाखवायचं नसतं, तर मनापासून जपायचं असतं. स्त्रीत्वाचा सन्मान म्हणून वाशिम येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही सत्यशोधक मंडळींनी आपापल्या पत्नीचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले, तेव्हा त्यावेळी समाजधुरीणांनी आमची बरीच चेष्टा केली होती. लग्नानंतर नव्या नवलाईचे दिवस संपतात,… - श्रीकृष्ण देव नव्हे: कर्मकांड नाकारणारा खराखुरा कृषीपालक
जन्माष्टमीचा सण येतो तेव्हा संपूर्ण देश एका वेगळ्याच भक्तीभावात बुडून जातो. मंदिरांमध्ये होणारी आरास, उपवास, रात्रीचा जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी फोडली जाणारी दहीहंडी या धार्मिक चौकटीतच आपण सहसा श्री कृष्णाला पाहत आलो आहोत. पण या विधी आणि उपवासाच्या पलीकडे जाऊन पाहिले, तर समोर येतो मातीशी, गुराढोरांशी आणि शेतजमिनीशी घट्ट नाळ जोडलेला एक खराखुरा लोकनायक. श्रीकृष्ण… - आपण खरंच धार्मिक होत आहोत की,फक्त धार्मिक दिसत आहोत?
हल्ली कुठल्याही मंदिरात गेलं की दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात.त्यातचश्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच भक्तीची धार्मिकता जाणवू लागते. खरं तर श्रावण महिन्याची ओळखच ही “भक्तीमास” म्हणून आहे.शिवाची उपासना मोठ्या आस्थेने केली जाते.जागोजागी कावड मंडळांची लगबग दिसते. भगवे झेंडे, डीजे, घोषणा, मिरवणुका आणि भक्तांची गर्दी रस्त्यावर दिसू लागते.दिंडी आणि वारी ही केली जातेमंदिरांमध्ये दर्शनासाठी…
