साहेब! आता तरी थोडी लाज वाटू द्या,हा ‘सन्मान’ कि ‘प्रेतावरचा’ मान !

जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि सरकार नावाच्या व्यवस्थेला आता खरंच लाज वाटायला पाहिजे!
कारण आज ज्या गोष्टींचा डंका पिटला जातोय, त्या प्रत्यक्षात शिक्षण व्यवस्थेच्या अपयशावर टाकलेलं झाकण आहे.आणि उघड उघड शिक्षणाच्या “प्रेतावरचाच” मान आहे !
म्हणे …काल
एक शिक्षक विहित मुदतीच्या आत १००% फिजीकल आणि डिजिटल डोकी मोजतो.गावात फिरतो, रात्री- दिवसा लोकांच्या घरी जाऊन माहिती गोळा करतो… आणि त्यासाठी त्याचा सन्मान होतो. व वर्तमान पत्रात बातमी येते.
प्रश्न इतकाच — हा सन्मान नेमका कशासाठी? शिक्षणासाठी की जनगणनेच्या शाळाबाह्य कामांसाठी?
शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीप लावणारा असतो . पण आज त्याच्या हातात खडू ऐवजी फॉर्म आहे.यादी, डेटा एन्ट्रीतच त्याच्या शिकवणीचे तास फील केले जात असतील आणि वरून त्याचं कौतुक केलं जातं असेल तर इथल्या अशा या व्यवस्थेचा आम्ही धिक्कार नोंदवतो.
उद्या कदाचित अशीही वेळ येईल —
“शिक्षकांनी माध्यान्ह भोजन चविष्ट शिजवले म्हणून जिल्हास्तरीय गौरव!”
“गावातील मोकाट कुत्र्यांची अचूक मोजणी केल्याबद्दल सन्मान!”
“गोठ्यात जाऊन गुरांची गणना केल्याबद्दल विशेष प्रशस्तीपत्र!”
काय चुकीचं आहे यात? कारण आज जे सुरू आहे, त्याचेच हे टप्पे आहेत ..


व्यवस्थेने शिक्षकाला ‘सर्वकाही करणारा कर्मचारी’ बनवून टाकलं आहे. सकाळी शिक्षक , दुपारी सर्वेक्षक, संध्याकाळी डेटा ऑपरेटर, आणि रात्री जनजागृती करणारा अधिकारी! मग तो शिक्षक कधी शिकवणार? विद्यार्थ्यांशी संवाद कधी साधणार?
याचं उत्तर कुणाकडेच नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात टाळ्या वाजवणं सोपं असतं हो साहेब! पण त्या टाळ्यांच्या आवाजात विद्यार्थ्यांच्या रिकाम्या वर्गांची शांतता “दडपली” जातेय, शिक्षकाला शाळेबाहेर पळवून, शिक्षणाच्या गुणवत्तेचा बळी देऊन, “१००% कामगिरी”चा अभिमान बाळगणं — हीच या व्यवस्थेची सर्वात मोठी विडंबना आहे.गुलामानो! या विरोधात जाब विचारणाऱ्या सरपंच मंगेश साबळे ला जामीन भेटलाय म्हणे ..
आता हा प्रश्न शिक्षकाचा नाही, तर संपूर्ण पिढीचा आहे. कारण शिक्षक वर्गात नसेल, तर विद्यार्थ्यांचं भविष्य कोण घडवणार?

कागदपत्रं? सर्वेक्षण? की तुमचं प्रशस्तीपत्र?


जर खरंच शिक्षकांचा सन्मान करायचा असेल, तर त्यांना त्यांच्या मूळ कामासाठी त्याला मोकळं करा. शाळाबाह्य कामांचा हा डोंगर त्यांच्या खांद्यावरून उतरवा. नाहीतर उद्या विद्यार्थ्यांच्या अपयशासाठीही एखादा “गौरव सोहळा” ठेवावा लागेल!
शेवटी एकच कडू सत्य —
आज शिक्षकांचा गौरव होत नाही; त्यांच्या मूळ कर्तव्याची उघडपणे थट्टा केली जात आहे… आणि त्यालाच ‘सन्मान’ नाव दिलं जात आहे!तेव्हा तुमच्या त्या सन्मानाचा धिक्कार असो !

शेवटी साहेब आमच्या ज्या पूर्वजांनी हातात पाटी लेखणी यावी म्हणून आपले आयुष्य पणाला लावले ती पाटी तुम्ही “जाणीवपूर्वक ” हिसकावून घेत असाल तर उद्या चुकून या आमच्या पोरांच्या हातात गोफणीचा दगड आला तर पहिला “कपाळ मोक्ष” तुमचाच असेल !

गजानन खंदारे रिसोड वाशिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top