अशा वाचाळ वीरांकडून केवळ दिलगिरी व्यक्त करून हा प्रश्न—किंवा सत्तेचा माज—इथेच संपणार नाही. यावर कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे; अन्यथा रस्त्यावर “Get out” म्हणणारेच उद्या घरात घुसण्याचीही हिम्मत ठेवतील. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी व अतिरेकाची भाषा बोलणाऱ्यानी हे वेळेत लक्षात घ्यावं.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत, तर लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. पण या श्रद्धेचं राजकारण करणं, तिचा दिखावा करून स्वतःची ओळख निर्माण करणं किंवा चर्चेत राहणं—ही प्रवृत्ती अलीकडे वाढताना दिसते.
अलीकडच्या वादात एका वादग्रस्त आमदाराने ३८ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावर आक्षेप घेतला. लेखक गोविंद पानसरे—ज्यांनी आयुष्यभर विवेकवाद आणि सामाजिक प्रबोधनासाठी काम केलं—त्यांच्या लिखाणावर आक्रमक प्रतिक्रिया देण्यासाठी केवळ भावना नाही, तर बौद्धिक तयारीही लागते. मात्र संविधानिक पदावर असलेल्या “बौद्धिक दिवाळखोराकडून” हा खरोखर अभ्यासाचा मुद्दा आहे का, की फक्त सवंग प्रसिद्धीचा प्रयत्न—हा प्रश्न उपस्थित होतो.
इतिहासात अनेक अभ्यासकांनी “शिवाजी” असा एकेरी उल्लेख केला आहे. तो अनादर नसून लेखनशैलीचा भाग आहे. यावर यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. जर आक्षेप असेलच, तर त्यावर अभ्यासपूर्ण प्रतिवाद व्हायला हवा होता. पण इथे दिसते ती भाषा—शिवीगाळ, धमक्या आणि आक्रमकता.
संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून “जीभ कापेन”, “घरात घुसून मारेन” अशा प्रकारची खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते, शिवीगाळ केली जाते—हा केवळ मतभेदाचा मुद्दा नसून सार्वजनिक संस्कृतीचा अपमान आणि पदाच्या जबाबदारीला न शोभणारा प्रकार आहे.
वादासाठी वाद—लक्ष वेधण्याचा फॉर्म्युला
हल्ली नाक्यावर, चौकात, अगदी गल्लीत सुद्धा असे काही नमुने दिसतात. मुद्दाम भडक वर्तन करून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. लोक दुर्लक्ष करू लागले की ते अजून टोकाचं वागतात—फक्त चर्चेत राहण्यासाठी. आज काही राजकीय वर्तनातही हाच पॅटर्न स्पष्ट दिसतोय.
आजकाल शांत विषय उकरून काढायचा, त्यावर तीव्र प्रतिक्रिया द्यायची आणि चर्चेचा केंद्रबिंदू व्हायचं—हा “गाजावाजा करून लक्ष वेधण्याचा” प्रकार झाला आहे. यात ना खऱ्या अर्थाने शिवभक्ती असते, ना विचारांची खोली—फक्त दृश्यता असते.

भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, जेम्स लेन प्रकरणात जिजाऊंचा अवमान होतो, गडकरी आमच्या युवराजांना बदफैली ठरवतो; “बम्मो” सारखी काही पिलावळ आयुष्यभर छत्रपतींची बदनामी करत राहते, मनोहर कुलकर्णी सारखे सतत गरळ ओकतात—महामानवांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये होतात—तेव्हा जनतेच्या पैशावर कमिशनची भाषा करणाऱ्या, आणि चड्डी-बनियनवर धुडगूस घालणाऱ्या या लोकांचा संताप नेमका कुठे असतो?
अशा वाचाळ वीरांकडून केवळ दिलगिरी व्यक्त करून हा प्रश्न—किंवा सत्तेचा माज—इथेच संपणार नाही. यावर कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे; अन्यथा रस्त्यावर “Get out” म्हणणारेच उद्या घरात घुसण्याचीही हिम्मत ठेवतील. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी व अतिरेकाची भाषा बोलणाऱ्यानी हे वेळेत लक्षात घ्यावं.
हा वाद पुस्तकाच्या आशयावर नाही—तर प्रतिक्रियेच्या पातळीवर आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणं सोपं आहे, पण त्यांच्या मूल्यांनुसार वागणं कठीण आहे.
आज गरज आहे ती अशा “वादासाठी वाद” करणाऱ्यांना ओळखण्याची, त्यांना त्यांची जागा दाखवण्याची—आणि विचार, संयम व जबाबदारी जपणाऱ्यांना पुढे आणण्याची. कारण शिवचरित्र आपल्याला शत्रूच्या स्त्रियांचाही आदर करायला शिकवते—हीच खरी शिवभक्तीची ओळख आहे.
म्हणूनच समाजात जाती-धर्माच्या नावावर विष पेरणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं—जनतेचा संयम हा कमजोरी नसतो. वेळ आली तर समाज विचाराने आणि कायद्याच्या चौकटीत राहून ठामपणे उभा राहतो, आणि चुकीच्या प्रवृत्तींना थांबवतो. आणि रस्त्यात जाब विचारतो.
जय जिजाऊ!
Most Viewed Posts
✍️ : गजानन खंदारे
जिल्हा-प्रमुख, संभाजी ब्रिगेड, वाशिम
( समाज माध्यम)
Disclaimer (सूचना):
या लेखातील मते ही लेखकाची ठाम व वैयक्तिक भूमिका आहे. यात व्यक्त केलेले विचार हे कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा संघटनेची भीती न बाळगता मांडलेले आहेत. सत्य, इतिहास आणि सामाजिक वास्तव यावर भाष्य करताना जर कोणाला ते त्रासदायक किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर तो त्या विषयाच्या गांभीर्याचा भाग आहे.हा लेख कोणाचाही विनाकारण अपमान करण्यासाठी नसून, जाणीवपूर्वक निर्माण होणाऱ्या विकृत प्रवृत्ती, दुटप्पीपणा आणि असंवैधानिक वर्तनावर थेट प्रहार करण्यासाठी आहे. वाचकांनी भावनेपेक्षा विचाराने प्रतिसाद द्यावा, ही अपेक्षा.
शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण सुरू आहे का? हा लेख वाचा आणि तुमचं मत नक्की सांगा.
#ShivajiMaharaj #MarathiArticle #Rajkaran #Maharashtra


