हल्ली मूत्यू सुद्धा उत्सव प्रियतेचा सोहळा बनतोय! माणूस जगाचा निरोप घेतो तेव्हा मागे उरतात फक्त त्याच्या आठवणी. या आठवणींना उजाळा देण्यासाठी महागडे, खर्चिक आणि क्षणभंगुर सोहळे केले जातात. मात्र, वाशिम तालुक्यातील सुरकंडी खुर्द येथील भोयर कुटुंबाने दुःखाच्या प्रसंगालाही एक संवेदनशील आणि पर्यावरणपूरक वळण दिले आहे. आपल्या आप्तांच्या स्मृती त्यांनी केवळ मनात नाही, तर थेट निसर्गाच्या कुशीत रुजवल्या आहेत.आमचे संभाजी ब्रिगेडचे सहकारी मित्र गजानन भोयर आणि त्यांच्या कुटुंबाने घेतलेला हा निर्णय आजच्या ‘उत्सवप्रिय’ समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरत आहे.
मृत्यूच्या शांततेतून नवजीवनाची सुरुवात!
भोयर कुटुंबाने केवळ झाडे लावली नाहीत, तर प्रत्येक नात्याची भावना त्या-त्या वृक्षाच्या माध्यमातून जिवंत ठेवली आहे:वड हे स्थैर्याचे प्रतीक आहे : दिवंगत कै.रामचंद्र नारायण भोयर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गावातील स्मशानभूमीत वडाचे रोप लावले गेले. अनेक पिढ्यांना सावली देणारा वड हा त्यांच्या घरातील वडिलाधाऱ्या स्थानाची आठवण करून देतो.कडुलिंब व पिंपळ आरोग्य आणि अखंडता देतात महिनाभरापूर्वी दिवंगत झालेले काका माधव भोयर यांच्या स्मरणार्थ कडुलिंब आणि पिंपळाची रोपे लावून समाजस्वास्थ्याचा आणि जीवनाच्या अखंड प्रवाहाचा संदेश दिला गेला.तर सर्वात हृदयस्पर्शी कृती म्हणजे सावडण्याच्या दिवशी जमा झालेली राख शेतातील मातीमध्ये विसर्जित करून, तिथे आंब्याचे रोप लावण्यात आले. मृत्यूच्या अंतिम सत्याला निसर्गाच्या नवसृजनाशी जोडण्याचा हा एक अनोखा प्रयोग ठरावा .

कृतीतून चपराक
आजच्या काळात जिथे अंत्यविधी आणि उत्तरकार्यातही दिखाऊपणा वाढू लागला आहे, तिथे भोयर कुटुंबाचा हा उपक्रम समाजप्रबोधनाची एक नवी सुरुवात म्हणायला हरकत नाही. केवळ रोपे लावून आपले कर्तव्य संपवले नाही, तर या वृक्षांच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. रिकाम्या भाषणांपेक्षा त्यांची ही कृती समाजाला खूप काही शिकवून जाते.*भविष्याला ‘हरित’ आश्वासन*काही वर्षांनी ही झाडे मोठी होतील, बहरतील आणि पक्ष्यांचा किलबिलाट तिथे सुरू होईल. तेव्हा त्या वृक्षाच्या प्रत्येक पानातून आणि सावलीतून भोयर कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या स्मृती हळुवारपणे जिवंत राहतील. निसर्गाच्या सान्निध्यात जपलेली ही ‘हिरवी स्मृती’ खऱ्या अर्थाने अमर आणि चिरंतन ठरेल, यात शंका नाही.
“माणूस निघून जातो, पण त्याच्या नावाने लावलेले झाड येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्राणवायू, सावली आणि जीवन देत राहते. हाच आमच्या भावनांचा आणि संस्कारांचा खरा वारसा आहे.”— भोयर कुटुंब
संकलन: गजानन खंदारे,

