बेंग्याला कधी पाहिले नाही. आता तो कधीच दिसणार नाही. नुकताच मिसरूड फुटलेला एक पोरसवदा बेंग्या होता, हेही कुणी लक्षात ठेवणार नाही. का ठेवावे? कारण तो पारधी होता, भुरटा चोर होता. तो चोर झाला, कारण शेकडो वर्षांपासून या व्यवस्थेने त्याचे, त्याच्या समाजाचे हक्क चोरले; नव्हे, पांढरपेशी वर्गाने आपल्या हितासाठी त्यांच्या सुखावर दरोडाच टाकला. या दरोड्याचा लाभ आज समाजव्यवस्थेत कुठेतरी मीही घेत आहे. पुढे माझ्या अनेक पिढ्याही घेतील. एवढा मोठा हा दरोडा आहे.आज बेंग्या असता, तर ३५ वर्षांचा असता. मे २०११ मध्ये रिसोडच्या पोलिस कोठडीत त्याला पोलिसांनी तुडवून तुडवून ठार केले. पोलिसांवर गुन्हा नोंदवू नका, म्हणून त्यावेळी काही प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी वरिष्ठांची भेट घेऊन निवेदन दिले होते. पोलिसांना वाचवण्यासाठी रिसोड शहर बंदही ठेवले. त्यावेळी बेंग्याच्या खूनप्रकरणात कारवाई होऊच नये, असे वाटणारे ९० टक्क्यांपेक्षा अधिक होते.प्रकरण तिथेच दबले असते. पण, व्यवस्थेतील जातीय अन्यायाविरुद्ध चीड असणारे काही जण एकवटले. त्यात काही पोलिस, काही पत्रकार आणि वकीलही होते.सेनगाव (जिल्हा हिंगोली) येथील संदेश देशमुख यांनी मेच्या कडक उन्हात ४०-५० पारध्यांना घेऊन वाशीम पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांना स्वतःच्या जातीतूनच काहींनी विरोध केला. प्रचंड दबाव असतानाही सीआयडीचे अन्वर शेख, चव्हाण यांनी पारदर्शकपणे तपास करून नऊ पोलिसांवर बेंग्याच्या खुनाचा ठपका ठेवला.पत्रकार म्हणून मी आणि नितीन पगार यांनी पोलिसांच्या अन्यायाची लक्तरे वेशीवर टांगलीच होती. बातम्या बंद कराव्यात, यासाठी दबावही येत होता. त्यावेळी माझे वरिष्ठ गजानन जानभोर, नितीन कोंडुलीकर आणि सनत आहाळे यांनी भक्कम पाठबळ दिले. सतीश जमोदकर, राम शृंगारे, गजानन धामणे, गणेश आढाव आणि विठ्ठल जोशी यांच्या चर्चेतून दिशा मिळत गेली. त्यावेळी मी उमेदीच्या काळात होतो. पोलिसांना अंगावर घेऊन भिडलो. पोलिसांवर गुन्हा दाखल झाला, तेव्हाच पत्रकार म्हणून आमच्यासाठी हे प्रकरण संपले होते. पण, अधूनमधून बेंग्या आठवत होता, ‘सोड यार!’ असे स्वतःच स्वतःला म्हणून माझ्यातील पांढरपेशी त्याला विसरत गेला. पण, दुसरीकडे संदेश देशमुख आतापर्यंत आर्थिक बाजूनेही बेंग्यासाठी लढत राहिले. सीआयडीने पारदर्शक तपास केला. सरकारी वकील अभिजित व्यवहारे यांनी भक्कम, अभ्यासपूर्ण बाजू मांडली. कुठल्याही अमिषाला बळी न पडता पुन्हा कुणी बेंग्या होऊ नये, यासाठी विविध क्षेत्रांतील हात एकवटले. हे हात मोजकेच आहेत. त्यातील चार-दोन नावे सोडली, तर अनेकजण एकमेकांना अजूनही ओळखतही नाहीत. पण, हे सगळे ज्ञात-अज्ञात बेंग्यासाठी लढले. ते कुठल्याही एका जातीचे, एका धर्माचे नाहीत. एका क्षेत्रातीलही नाहीत. कुणी पोलिस, कुणी वकील, कुणी पत्रकार, कुणी अधिकारी, कुणी सामाजिक कार्यकर्ते, तर कुणी नेता आहे. आज १५ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला. न्यायालयाने नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता आम्ही बेंग्याला ‘जय भीम’ म्हणू शकतो. अपेक्षा एवढीच की, त्याच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या पिढीने आम्हाला माफ करावे; कारण बेंग्याचा खून नऊ जणांनी नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेने केला आहे.
– विकास देशमुख, २ जुलै २०२६….
संपादक दिव्य मराठी छत्रपती संभाजीनगर
((संदर्भ))….
बेंग्या माफ कर; तुला ‘जयभीम’ घालू शकत नाही!
(१४ नोव्हेंबर २०२१)
————- विकास देशमुख————
विकास… अतिशय हळवा आणि संवेदनशील पत्रकार! वाशिम सारख्या ठिकाणी मातृभूमी, लोकमत, सकाळ दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात संपादकीय काम सांभाळताना
संवेदनशील मनाला अशा घटना आजही अस्वस्थ करून सोडतात..काळ बदलला, पण व्यवस्था अजूनही तशीच आहे, हे दिवसेंदिवस अधिक वेदनादायी होत आहे.
अलीकडेच बुलडाणा जिल्ह्यातील प्रकरण समोर आलं… कुणाचं एन्काऊंटर होतं, कुणाला विनाकारण तुरुंगात टाकलं जातं. कायदा आणि न्याय यांच्यातील अंतर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. —
तरीही… अजून काही मनं जिवंत आहेत. अजून काही शब्द अस्वस्थ होतात. अजून काही डोळे पाणावतात.
कवी मनाच्या माणसांना हे सगळं पाहून सैरभैर होणं साहजिकच आहे… आणि कदाचित हीच “अस्वस्थता” बदलाची सुरुवात ठरू शकते.
— गजानन खंदारे1

