✍️ गजानन खंदारे
आज वाऱ्याने आपला प्रवाह जरा बदलला होता.
कधी मंद, तर कधी अचानक झंझावातासारखा उसळत
तो स्वतःभोवती गिरक्या घेत धुळीचे लोट उडवत होता.
तरीही रणरणत्या उन्हात मृगजळाचे पाट स्पष्ट वाहताना दिसत होते.
अवतीभवतीच्या कडक उन्हाला तोंड देत माझा बाप मात्र अजूनही चालतच होता…
उन्हाची पारग वेळ केव्हाच टळून गेली होती.
त्याच्या अंगात आता त्राण, अवसान—काहीच उरले नव्हते.
सळसळणारं रक्तही जणू गोठलं होतं, आणि
अंगातून वाहणारा घामही आता आटून गेला होता.
खोपीच्या अडोशाला ठेवलेल्या एका पालवात
गुंडाळलेली कसलीशी वस्तू त्याने माझ्या हातात दिली…
तो हळूच म्हणाला,
“आता एवढंच आहे तुझ्यासाठी…”
मी चकित होऊन विचारलं, “काय आहे हे?”
तो म्हणाला,
“तुझ्या आजोबांना एका महात्म्याने दिलं होतं.
तुमच्या पिढ्यांच्या उद्धारासाठी हे कामी येईल असं सांगितलं होतं.
बापानं जपून ठेवलं… आता वारसाहक्काने
माझ्याकडे आलं… आणि आता तुझ्याकडे.
मी कधी उघडलं नाही… तुझ्यासाठी सांभाळून ठेवलं.
माझ्याकडे आता दुसरं काहीच नाही…
या व्यवस्थेने सगळं काढून घेतलं…”
बापूचं बोलणं ऐकून मी गोंधळलो.
मनात विचार आला—काहीतरी मौल्यवानच असेल…
सुवर्णमुद्रा, दागिना, किंवा काही तरी मोठं धन…
त्या उत्सुकतेने मी लगबगीने पालव उकलायला सुरुवात केली.
कागदात गुंडाळलेली ती जाड वस्तू हळूहळू उघडत गेलो…
आजोबांना मिळालेली ती भेट—जशीच्या तशीच होती.
आजोबांनी कधी उघडून पाहिली नव्हती…
बापानेही नाही…
ती माझ्यासाठीच जपून ठेवली होती.
आणि अखेर माझ्या हातात आलं—
जगातील महान ग्रंथांपैकी एक—
शेतकऱ्याचा आसूड आणि गुलामगिरी
क्षणभर मी स्तब्ध झालो…
मनात विचार चमकून गेला—
जर आजोबांनी, बापाने हे केव्हाच उघडून वाचलं असतं,
तर माझ्या बा-चा आसूड या व्यवस्थेवर कोरडे काढत ,
या लादलेल्या गुलामगिरीतून केव्हाच मुक्त झाला असता …
तर कदाचित या झोळीवाल्या बाबांच्या
खुळखुळ्या अवलादी इतक्या माजल्याच नसत्या…
जयंती निमित्त
तमाम फुले प्रेमींच्या विचाराच्या वारसदारांना समर्पित 🙏
—
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, वाशिम
- मेल्यावरही पोचवण्याची घाईच? नऊ तासांचा प्रवास आणि मनाचे ओझे ! ✍️ गजानन खंदारे
अलीकडे रोजच मरणाच्या बातम्या आणि घटना आपल्या कानावर येत राहतात. त्याचे दुःख आता मनाला भिडण्याऐवजी केवळ शब्दांतच अधिक उतरते आहे, असे मला वाटत असतानाच परवा माझे सासरेबुवांच्या अचानक जाण्याची बातमी आली.जेव्हा नात्यातील एखादी जवळची व्यक्ती अशी अचानक सोडून जाते, तेव्हा त्या नात्यातील परस्पर संवादाच्या खोलीवरच दुःखाचा गहिवर ठरत असतो.बायको पुण्यात असताना तिला ही घटना… - साहेब! आता तरी थोडी लाज वाटू द्या,हा ‘सन्मान’ कि ‘प्रेतावरचा’ मान !
जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि सरकार नावाच्या व्यवस्थेला आता खरंच लाज वाटायला पाहिजे!कारण आज ज्या गोष्टींचा डंका पिटला जातोय, त्या प्रत्यक्षात शिक्षण व्यवस्थेच्या अपयशावर टाकलेलं झाकण आहे.आणि उघड उघड शिक्षणाच्या “प्रेतावरचाच” मान आहे !म्हणे …कालएक शिक्षक विहित मुदतीच्या आत १००% फिजीकल आणि डिजिटल डोकी मोजतो.गावात फिरतो, रात्री- दिवसा लोकांच्या घरी जाऊन माहिती गोळा करतो… आणि त्यासाठी… - देऊळबंद : देवाच्या अस्तित्वालाच आव्हान! एक संदर्भ
✍️ गजानन खंदारे गावाखेड्यांत अध्यात्माच्या नावाखाली चालणारी ‘धार्मिक दुकानदारी’ एका नव्या चिंतेचा विषय बनत आहे. आज मंदिरांची संख्या आणि तिथली गर्दी वाढते आहे; पण या “व्यवस्थेचे” गुलाम झालेले लोक वैचारिक विद्रोह करण्याऐवजी अंधश्रद्धेचे अधिक आणि पक्के गुलाम बनत चालले आहेत. विदारक गोष्ट म्हणजे, या भोंदूगिरीच्या जाळ्यात “महिला वर्ग” मोठ्या प्रमाणावर भरडला जातो आहे. याच सामाजिक…
