नाती ही केवळ रक्ताचीच असतात असं नाही. काही नाती सह-विचारांतून निर्माण होतात, आपुलकीने फुलतात आणि परस्पर जिव्हाळ्यातून आयुष्यभरासाठी मनात घर करून राहतात. अशी नाती कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट असतात.
१९९९ मध्ये, म्हणजे आजपासून २७ वर्षांपूर्वी, आम्ही शेजारी राहायला आलो. आमच्या जाती वेगळ्या होत्या, चुली वेगळ्या होत्या; पण मनं मात्र एकाच घरातली होती. धर्माच्या पुस्तकांत ज्याची नोंद नाही, पण माणुसकीच्या जगात ज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असा एक सुंदर धर्म आम्ही जगत होतो
— तो म्हणजे -‘शेजारधर्म!’

या शेजारधर्माने आमच्या दोन कुटुंबांना केवळ शेजारीच ठेवलं नाही, तर एका विस्तारित कुटुंबाचे सदस्य बनवलं. आमची मुलं एकत्र शिकली, एकत्र वाढली, आयुष्याच्या वाटेवर पुढे गेली आणि आपापल्या क्षेत्रांत हुद्द्यांवर पोहोचली. या प्रदीर्घ सहवासात कधी मोठं भांडण झालं नाही, कधी मनात कटुता निर्माण झाली नाही, कधी कुरबुरींनी नात्यात अंतर पाडलं नाही. कारण आमच्या नात्याचा पाया व्यवहार नव्हता, तर विश्वास होता; स्वार्थ नव्हता, तर आपुलकी होती.
आयुष्याच्या या प्रवासात सुख-दुःखाचे कितीतरी क्षण आम्ही एकत्र अनुभवले.
मुंबईत असताना १६ तारखेला अचानक मामांच्या निधनाची बातमी आली. वयाची नव्वदी पार केलेल्या मामांना जायचंच होतं हे माहीत होतं;
पण एखाद्या व्यक्तीचं जाणं आणि त्या व्यक्तीच्या सहवासाची सवय कायमची तुटणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
काल, २५ ऑक्टोबरला मामांचं दहावं होतं. मामांच्या पाठोपाठ मामीही कायमच्या निघून गेल्या. जणू आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने चाललेली दोन पावलं मृत्यूनंतरही एकमेकांपासून फार काळ दूर राहू शकली नाहीत.
जनार्दन बाबारावजी तळणकर आणि कुसुम जनार्दन तळणकर—तुम्ही दोघंही आमच्या आयुष्यातून निघून गेलात; पण तुमच्या आठवणींचं काय?
माणूस निघून जातो, तेव्हा त्याच्यासोबत केवळ त्याचा देह जातो. त्याच्यासोबत घालवलेले क्षण, त्याचे बोलणे, त्याचा स्वभाव, त्याची हाक, त्याच्या सहवासातून मिळालेली ऊब आणि नकळत निर्माण झालेली नाती कुठे जातात? तर ती मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायमची घर करून राहतात.
काही आठवणी दिसत नाहीत, पण डोळ्यांसमोर उभ्या राहतात.
अशा वेळी मन भूतकाळात धाव घेतं. जुन्या आठवणींचा एक अदृश्य चित्रपट डोळ्यांसमोर सुरू होतो.
आणि मग मनाला प्रश्न पडतो— खरंच,
प्रत्येकाचा भूतकाळ हा सुंदरच असतो पण…!
वर्तमानात जगणं सोपं नसतं. भूतकाळाच्या आठवणी मनाला आधार देतात आणि भविष्याच्या आशा जगण्याचं बळ देतात. या दोन्हींच्या मध्ये उभा असलेला माणूस मात्र वर्तमानातील दुःख पचवत राहतो.
आम्ही कुठल्याही देवाला मानत नाही. मृत्यूनंतर काय असतं, याबद्दलही आमचे दावे नाहीत. पण निसर्गाच्या या विराट तत्त्वात तुमच्या अस्तित्वाची खूण कायम राहील,
जनार्दन बाबारावजी तळणकर आणि कुसुम जनार्दन तळणकर
तुमच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
— गजानन व लता खंदारे
मोप रिसोड
