अलीकडे रोजच मरणाच्या बातम्या आणि घटना आपल्या कानावर येत राहतात. त्याचे दुःख आता मनाला भिडण्याऐवजी केवळ शब्दांतच अधिक उतरते आहे, असे मला वाटत असतानाच परवा माझे सासरेबुवांच्या अचानक जाण्याची बातमी आली.
जेव्हा नात्यातील एखादी जवळची व्यक्ती अशी अचानक सोडून जाते, तेव्हा त्या नात्यातील परस्पर संवादाच्या खोलीवरच दुःखाचा गहिवर ठरत असतो.
बायको पुण्यात असताना तिला ही घटना एकदम कशी सांगावी, हा प्रश्न होताच; कारण तिचा बाप अचानक गेला होता. एका मुलीसाठी ही बातमी पचवणं कठीणच!
शनिवार-रविवार असल्याने मुलाला सुट्टी होती म्हणुन
“कुठलंही कारण काढून आईला घेऊन या, हळू हळू तिच्या मनाची तयारी करा,”
असं मी बोललो. मुलगी येईपर्यंत नऊ तास सर्वाना या अकाली मृत्यूचं ओझं सांभाळावं लागणार हे ठरलेलं. ही वेळ सांभाळणं तसं भयंकरच!
आयुष्यभर माणूसच माणसाला सुखाने जगू देत नाही. मेल्यावर सुद्धा पोहोचवण्याची घाईच…!

आमच्या नात्यातील माणसं दर दहा मिनिटाला बायकोला फोन करून विचारत होती, “ताई, कुठवर आलीस?”
अखेर अर्ध्या वाटेतच तिचा बांध फुटला. शेवटच्या क्षणी हात लागावा यासाठी जवळची माणसं खोळंबली होती.
त्याच वेळी माझ्या मनात या दुःखाच्या जाणीवेचा एक वेगळाच विचार उभा राहत होता. हल्ली मृत्यूचं वर्णन शब्दांत करण्याचा प्रघात पडत आहे.
मुळात मृत्यू हा शब्दांचा विषय नसावा, तो मनाच्या अनुभवाचा विषय असावा.
म्हणूनच इथे मृत्यूबद्दल बोलण्यापेक्षा मानवी मनाच्या प्रवृत्तींबद्दल बोलणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. माणसाच्या मनात दोन मुख्य प्रवृत्ती असतात – आसक्ती आणि विरक्ती. या दोन्ही नैसर्गिक प्रवृत्ती आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रमाणात दिसतात.
त्यातील आसक्ती ही तुमच्या-आमच्यातील सहज प्रवृत्ती! एखाद्या व्यक्तीशी, नात्याशी, वस्तूशी किंवा आठवणीशी आपलं मन घट्ट बांधलं जाणं. “हे माझं आहे” ही भावना मनात खोलवर बसते. आपलं सुख, आपली शांती या गोष्टींवर अवलंबून राहते. नात्यांमध्ये प्रेम असतं, आपुलकी असते आणि त्याचसोबत ही आसक्तीही असते. ही आसक्ती नसती तर नाती उभीच राहिली नसती. पण हीच आसक्ती कधी कधी दुःखाचं कारण बनते; कारण जेवढं आपण घट्ट धरून ठेवतो, तेवढंच गमावल्यावर जास्त वेदना होतात.
खरं तर माणूस आपल्या आयुष्याच्या प्रवासात या दोन टोकांच्या प्रवृत्तींच्या मध्ये उभा असतो. आसक्ती, जिने आपल्याला जगाशी घट्ट बांधून ठेवले आहे, आणि दुसरी विरक्ती, जी आपल्याला हळूहळू या जगापासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवते. आसक्ती ही सहज प्रवृत्ती असताना विरक्ती ही अभावानेच निर्माण होणारी प्रवृत्ती.
मग त्यासाठी “ध्यान-धारणाच” करावी लागते असं काहीच नसतं.
माझे सासरे गेल्या १२-१५ वर्षांत प्रत्येकाच्या जबाबदारीचं ओझं निश्चित करून या प्रापंचिक जगण्यातून पूर्णपणे विरक्त झाले होते.
दिवसभर ते मंदिरातच असायचे… ते देवभोळे की देवाला मानणारे होते, असं मुळीच नाही. देवाला मानणे आणि देवाला समजून घेणे यात खूप सारा फरक असतो. देवाला समजून घेणे हे कित्येकांना जमतच नाही, म्हणूनच लोक अंधश्रद्धेच्या गर्दीत अडकतात आणि फसतात.
साध्या-सोप्या भक्तिमार्गातून गावाला एकत्र करण्यामध्ये आणि गावातील भव्य-दिव्य मंदिराची वास्तू उभी करण्यामध्ये कै.जानराव बोडखे यांची विरक्त सेवा आता त्या मंदिरात दिसणार नाही. निसर्गाचे स्वामित्व आणि अस्तित्व मान्य करत असताना निसर्गतत्वात विलीन झालेल्या त्यांच्या स्मृती कायमच्या स्मरणात राहाव्यात, यासाठी मी आज “वृक्षदानाचा” संकल्प मांडत आहे.
— गजानन खंदारे, मोप, रिसोड, वाशिम

— ✍️ गजानन खंदारे, मोप, रिसोड, वाशिम
