पती-पत्नीचं नातं हे केवळ नवरा-बायकोचं नातं नसतंच मुळी; ते खऱ्या अर्थाने परस्पर सहजीवनाचं नातं असतं. म्हणूनच हे नातं जगाला दाखवायचं नसतं, तर मनापासून जपायचं असतं. स्त्रीत्वाचा सन्मान म्हणून वाशिम येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही सत्यशोधक मंडळींनी आपापल्या पत्नीचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले, तेव्हा त्यावेळी समाजधुरीणांनी आमची बरीच चेष्टा केली होती.
लग्नानंतर नव्या नवलाईचे दिवस संपतात, तेव्हा “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” किंवा “एकमेकांत खूप जीव आहे” अशा केवळ तोंडी गप्पा सुरू होतात आणि तिथूनच नात्यात खटके उडायला सुरुवात होते.
चंद्रशेखर गोखले म्हणतात…
घर दोघांचं असतं, ते दोघांनीही सावरायचं असतं,
एकानं पसरवलं, तर दुसऱ्याने आवरायचं असतं.

नवरा बायकोच्या नात्याचा पाया असतो तो परस्पर विश्वास! त्या विश्वासातूनच निखळ प्रेम जन्माला येते. विश्वास आणि प्रेम ही संसाररथाची दोन चाके असतात; यातलं विश्वासाचं चाक जरी डळमळीत झालं, तरी प्रेमाचा डोलारा आपोआप कोसळतो. म्हणूनच नवरा-बायकोचं नातं निभावताना केवळ प्रेमाच्या दिखाव्यापेक्षा कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव समृद्ध असणे अधिक गरजेचे असते.
आज ५ सप्टेंबर, शिक्षक दिन ?… पण नात्यातलं “प्रेम” हे कोणत्याही लादलेल्या दिवसासारखं दिखाऊ असता कामा नये. अडीच अक्षरी ‘प्रेम’ या शब्दाची व्याप्ती अथांग आहे. प्रेमाच्या अभिव्यक्तीबद्दल लिहिताना व. पु. काळे लिहतात की, प्रेम म्हणजे निव्वळ वासनापूर्तीसाठी स्वार्थी भावनेने केलेला व्यवहार नसतो ; ती अंतर्मनातून उमटलेली एक सहज, निखळ अभिव्यक्ती असते.प्रेम कुणाचंही कुणावर असू शकतं. जशी दोन पुरुषांमध्ये निकोप मैत्री असते, तशीच एक स्त्री आणि पुरुषातही उत्तम मैत्री असू शकते. पती-पत्नीनेही आधी एकमेकांचे सच्चे मित्र बनून सहजीवन समजून घ्यायला हवे.
आमच्या सहजीवनाची सुरुवात त्या उमेदीच्या पंचविशीत आलीय . शिक्षणाने आणि लौकिक ज्ञानाने माझ्यापेक्षा कमी असलेली माझी सहचारिणी, जेव्हा हक्काने “तुम्हाला यातलं काहीच कळत नाही” असे म्हणत एखाद्या शिक्षकासारखी मला घरात शिकवते, बऱ्याच दा भांडते, पण तेव्हा त्यातील भांडणापेक्षा तिची सहज म्हणून काळजी स्पष्ट दिसते.
‘मायबाप हेच तीर्थ-काशी’ मानून वार्धक्याने थकलेल्या माझ्या आई-वडिलांची ती मनोभावे सेवा करते. घरात किंवा गावात मी तिला कधीही कोणाशी वाद घालताना वा भांडताना पाहिले नाही.
आज तिचा जन्मदिवस… तिच्यासाठी हा वाढदिवस असू शकेल, पण माझ्यासाठी मात्र हा तिच्या “साथीबद्दल” कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे.
माझी पत्नी, माझी मैत्रीण आणि प्रसंगी मायेची सावली देणारी माझी ती आई , आमची “लताबाई” आहे अशा सर्व भूमिकांतून मला काळजीने जपणाऱ्या आमच्या या घरातल्या ‘आऊ’ला वाढदिवसाच्या मनःपूर्वक सदिच्छा!

गजानन व लता खंदारे मोप

