जन्माष्टमीचा सण येतो तेव्हा संपूर्ण देश एका वेगळ्याच भक्तीभावात बुडून जातो. मंदिरांमध्ये होणारी आरास, उपवास, रात्रीचा जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी फोडली जाणारी दहीहंडी या धार्मिक चौकटीतच आपण सहसा श्री कृष्णाला पाहत आलो आहोत. पण या विधी आणि उपवासाच्या पलीकडे जाऊन पाहिले, तर समोर येतो मातीशी, गुराढोरांशी आणि शेतजमिनीशी घट्ट नाळ जोडलेला एक खराखुरा लोकनायक. श्रीकृष्ण हा राजवैभवाचा कैवारी नसून, भारतीय कृषी आणि पशुपालन संस्कृतीचा खराखुरा पालक आहे.
प्राचीन काळापासून जनमानसात दोन मुख्य विचारप्रवाहांचा संघर्ष पाहायला मिळतो, तो म्हणजे कृषी संस्कृती आणि ऋषी संस्कृती. यावर अशोक राणा यांनी त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात अतिशय रोखठोक मांडणी केली आहे, तर डॉ. आ. ह. साळुंखे यांनीही बळीवंश आणि इतर ग्रंथांमधून शेतकरी संस्कृतीची स्वतंत्र ओळख अधोरेखित केली आहे. ऋषी संस्कृती ही प्रामुख्याने यज्ञ, मंत्र आणि परलोकावर आधारलेली होती, जिथे निसर्गातील शक्तींना प्रसन्न करण्यासाठी धान्याची आहुती दिली जात असे. याउलट मूळ भारतीय कृषी संस्कृती ही प्रत्यक्ष श्रम, घाम आणि निसर्गाशी असलेल्या थेट सहजीवनावर उभी राहिली. या कृषी संस्कृतीने कोणत्याही काल्पनिक कर्मकांडाला किंवा यज्ञातील नासाडीला नेहमीच नाकारले आहे.
अगदी अलीकडे जगद्गुरु तुकाराम महाराज वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं म्हणत निसर्ग तत्वाशी सोयर पण सांगतात.

कृषी विचारांचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे विष्णू आणि भागवत पुराणात आलेला गोवर्धन पूजेचा प्रसंग. गोकुळात वर्षानुवर्षे पाऊस पाडणाऱ्या इंद्राच्या नावाने मोठे यज्ञ आणि पूजा करण्याची परंपरा चालू होती. भयाच्या सावटाखाली होणाऱ्या या शोषक विधींना तरुण कृष्णाने थेट आव्हान दिले. त्याने गोपाळांना अगदी साधा पण विचार करायला लावणारा प्रश्न विचारला, की आपल्या जीवनाचा खरा आधार कोण आहे. आभाळात बसलेला अदृश्य इंद्र की डोळ्यांसमोर उभा असलेला गोवर्धन पर्वत.
कृष्णाने गोपसमाजाला पटवून दिले की ज्या डोंगरावर आपल्या गाई चरतात, जिथून नद्या आणि झरे वाहतात, जिथे दाट जंगले आणि औषधी वनस्पती आहेत, तो निसर्गच आपला खरा देव आहे. गोवर्धन शब्दाचा खरा अर्थच मुळात गोधनाचे पोषण करणारी व्यवस्था असा होतो. भगवद्गीतेमध्ये अन्नातून जीव, पावसातून अन्न आणि कर्मातून पाऊस असे चक्र मांडले असले, तरी त्याचा खरा अर्थ निसर्गाच्या चक्राशी आणि मानवी कर्माशी जोडलेला आहे. कर्म सोडून केवळ यज्ञ केल्याने पोट भरत नाही, हाच विचार कृष्णाने इंद्राची पूजा बंद पाडून प्रत्यक्ष निसर्गाची म्हणजे गोवर्धनाची पूजा सुरू करून दिला.
या संपूर्ण व्यवस्थेत श्रीकृष्णासोबत त्याचे मोठे बंधू बलराम यांचे स्थानही तितकेच महत्त्वाचे आहे. बलरामाच्या हातात नांगर आहे, जो जमिनीची मशागत, कस सुधारणे आणि कृषीचे प्रतीक आहे. तर कृष्णाच्या हाती बासरी आणि गोधनाची काठी आहे, जी पशुपालन आणि कुरणांच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. शेती आणि पशुपालन ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे या दोघांच्या अस्तित्वातून सिद्ध होते.
त्यामुळे जन्माष्टमीकडे केवळ एक धार्मिक सण म्हणून न पाहता, ती निसर्गाचा सन्मान करणारी आणि बळीराजाच्या स्वावलंबनाचा पुरस्कार करणारी एक जीवनपद्धती म्हणून पाहिली पाहिजे. कर्मकांडाच्या विळख्यातून ग्रामीण व्यवस्थेला बाहेर काढून प्रत्यक्ष उत्पादक घटकांना प्रतिष्ठा मिळवून देणारा कृष्ण म्हणूनच शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि या मातीचा खराखुरा लोकदेव ठरतो.
✍️गजानन खंदारे
