प्रचलित पद्धतीने आम्ही कधीच वाढदिवस साजरे करत नाही.
तरी पण औपचारिकता पाळाव्याच लागतात. मात्र काही दिवस असे असतात, जे केवळ उत्सवाचे नसतात, तर आयुष्याच्या प्रवासाकडे मागे वळून पाहण्याचे असतात.
आणि हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात ठरलेलाच असतो.
२४ ऑगस्ट १९९८ रोजी माझी मुलगी प्राजक्ता उर्फ अश्विनी हिचा जन्म झाला.
त्या काळातील सामाजिक परिस्थिती आजच्यासारखी नव्हती. मुलीचा जन्म हा फारसा कौतुकाचा विषय मानला जात नव्हता. मात्र चळवळीच्या विचारांचा आमच्यावर प्रभाव होता. त्यामुळे त्या काळच्या प्रचलित विचारांच्या विरोधात जाऊन आम्ही पहिल्यांदाच स्त्री जन्माचे स्वागत केले..
तिच्या जन्माच्या पहिल्या वर्षपूर्तीला पाहुण्यांना आणि घरच्यांना पुरणपोळीचे जेवण दिले. त्या वेळी काहीच न समजणाऱ्या त्या चिमुकलीला खेळण्यांसोबत शैक्षणिक साहित्यही भेट दिले…

दरम्यान माझ्या नोकरीचा वाद न्यायालयात सुरू होता. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल होती. गावाकडच्या सामाजिक परिस्थितीत मुलींना जेमतेम आठवी- दहावी पर्यंत शिकवले जायचे. मात्र आम्ही मुलींच्या शिक्षणाबाबत तडजोड केली नाही.
२००२ मध्ये ‘देशोन्नती’सोबत माझा पत्रकारितेचा करार झाला. अल्पावधीतच माझ्या लिखाणामुळे मला प्रसिद्धी मिळाली. त्याच काळात दोन वर्षे प्रचंड संघर्ष करून जिल्हा परिषद शाळेला आम्ही पाचवा वर्ग जोडला. खूप मेहनतीने शाळेचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला.
त्याचा परिणाम म्हणून पहिल्याच वर्षी गावातील तीन मुले नवोदय परीक्षेसाठी पात्र ठरली. त्यात माझी मुलगीही होती.
वर्षभर पुन्हा शाळा व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न केला. शाळा व्यवस्थापन समितीही अस्तित्वात आली.
मात्र गावच्या राजकारणात आणि समाजकारणात “एका” घरावाल्याचे नाव कटाक्षाने टाळले जाणे, हा अनुभव आजही माझ्यासाठी काही नवा नाही. परिणामी तीच शाळा आज आपली गळती थांबवण्यासाठी आटापिटा करताना दिसते.यात माझ्या मोठेपणाचा अहंभाव असण्याचे कारण नाही.
खरी कसरत पुढे होती.
मुलींना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवण्याची मानसिकता नव्हती. मात्र अकरावीनंतरच्या शिक्षणासाठी एम.पी. लॉ कॉलेजच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला. तिने वाणिज्य शाखेत पदवी घेतली, पुढे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यस बँकेत नोकरीं सुरु झाली.
त्यानंतर लग्नाचा विषय सुरू झाला. पण लग्न हा संस्कार न मानता त्याकडे व्यवहाराच्या नजरेने पाहणारेच अधिक दिसले.

दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले.
लग्नाच्या बोहल्यावरच आम्ही तिला एक सार्वजनिक शपथ घ्यायला लावली—
“मायबाप तीर्थ काशी; सासू-सासऱ्यांची आई-वडिलांप्रमाणे सेवा करीन.शेती मातीशी नातं कायम ठेऊन निसर्ग तत्वाची जपणूक करेन ”
लग्नानंतर संसार,नोकरीं,सांभाळत असतानाही तिने अभ्यास सुरू ठेवला. अत्यंत कठीण परिस्थितीत मेहनत करून एसबीआय ऑफिसरची (CBO )परीक्षा उत्तीर्ण केली. मुलाखतीचे सोपस्कारही पूर्ण झाले आहेत आणि आता दहा-पंधरा दिवसांत ती अधिकारी म्हणून रुजू होईल.
आमच्या माहेर-सासरच्या दोन्ही कुटुंबांतून अधिकारी पदासाठी पात्र ठरणारी ती पहिलीच मुलगी आहे, याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे.
आज तिचा जन्मदिवस.
प्राजक्ता, तुला आयुष्यात शेती-मातीशी असलेले नाते, आपली संस्कृती, कुटुंबव्यवस्था आणि निसर्गाची तत्त्वे कायम समजून घेता आली पाहिजेत. पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवताना माणुसकी, संवेदनशीलता आणि मातीशी असलेली नाळ कधीही तुटू नये.
तुला आयुष्यभर मोठं व्हायचं आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे चांगलं माणूस म्हणून जगायचं आहे.
तुझ्या जन्माने आमच्या घरात केवळ एक मुलगी आली नाही, तर आमच्या विचारांना जगण्याची एक नवी संधी मिळाली.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक नवा टप्पा तुझ्या कष्टाला, विचारांना आणि संस्कारांना अधिक उंची देणारा ठरो.
खूप मोठं यश मिळव… पण माणूस म्हणून त्याहून मोठी होत जा !
कामाच्या गोष्टी
गजानन खंदारे वडील

