गेल्या अनेक वर्षांपासून मी अध्यात्म, धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा वाचन, अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या ज्ञानाच्या अथांग समुद्राला अजून साधा स्पर्शही करू शकलो नाही, ही जाणीव सतत मनात राहते. तेव्हा साहजिकच मनात अनेक प्रश्न उभे राहतात — नेमकं सत्य काय?
चराचरात आणि माणसामाणसांत व्याप्त असलेला देव आज ठराविक धर्म विक्रेत्यांची आणि काही देवलोंब्यांची मक्तेदारी बनून बसला आहे. देव किंवा ईश्वराचं अस्तित्व मान्य करताना त्यावर चिकित्सा करायची नाही, प्रश्न विचारायचे नाहीत — असा एक अलिखित प्रघात अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे अशा विषयावर बोलत लिहित,असतांना ठराविक लोकांची मक्तेदारी असलेला देव हल्ली खूपच संवेदना प्रिय झालाय ! हि जाणीव ठेवूनच लिहाव बोलावं लागतं !
पण मग एक प्रश्न सतत उभा राहतो —
धार्मिकता आणि भक्ती-उत्सवांचा एवढा उन्माद वाढत असताना, अनाचार, दुराचार, स्वैराचार, व्यभिचार, हिंसा आणि व्यसनाधीनता यांचाही तितकाच फैलाव का होत आहे?
मग आपल्या प्रत्येकामध्ये असलेला देव नेमका कुठे हरवला?
की देव हरवला नाही,
तर देवासारख्या माणसांचं माणूसपणच हरवलं आहे?
आणि माणूस हरवला, माणुसकी हरवली, तर देवाचं देवपणही हरवणार नाही का?
अशा हरवलेल्या देवाला मंदिरात शोधण्यात अर्थ उरत नाही — हे अडीच हजार वर्षांपासून सांगितलं गेलेलं सत्य आज पुन्हा पुन्हा सांगावं लागत आहे.
हा विषय आता केवळ वैयक्तिक न राहता वैश्विक चिंतनाचा बनला आहे. ईश्वरप्राप्तीचा नेमका आणि खरा मार्ग कोणता? हा विषय अत्यंत खोल आणि गहन आहे.
लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवते.
एकदा कावळा आणि मोर एकमेकांना भेटले. मोर दिसायला सुंदर, चालण्यात ऐट; त्यामुळे सर्वत्र त्याचं कौतुक होत असे. कावळा मात्र रंग, आवाज आणि चाल — सगळ्याच बाबतीत स्वतःला कुरूप व कमी समजत असे. त्यामुळे तो मनातून दुःखी झाला.
“रंग-रूप आपल्या हातात नाही, पण निदान मोरासारखं चालता तरी येईल,” असा विचार करून कावळा एकेदिवशी मोराकडे गेला. काही दिवस त्याच्यासोबत राहून त्याची चाल शिकण्याचा प्रयत्न केला, पण ती काही त्याला जमत नव्हती. आणि या नादात तो स्वतःची मूळ चालही विसरून गेला.
म्हणूनच आज कावळा ना मोरासारखा चालू शकतो, ना स्वतःसारखा — तो फक्त उड्या मारत चालतो.
आज आपली स्थितीही काहीशी अशीच झाली आहे.
सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग भगवान तथागत गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षा पूर्वी सांगितला. — हे आपण स्वीकारलंच नाही. आपण आपल्या मनाच्या देव्हाऱ्यात त्याला स्थान दिलंच नाही.
आणि ज्यांनी स्विकारल त्यांना दुखातून मुक्त होण्याचा मार्ग सापडला …
ईश्वरप्राप्तीच्या मागे लागताना आपली अवस्था कावळ्यासारखी होत चालली आहे.
आपल्या हिंदू धार्मिक परंपरेत एकीकडे संत विचारांची वारकरी परंपरा, तर दुसरीकडे कर्मकांडप्रधान वैदिक परंपरा दिसते. वास्तवात या दोन्ही परंपरा विचार, आचार आणि कृतीच्या पातळीवर एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत — काही अंशी तर विरोधातच.
आज मात्र या दोन्हींची गोंधळलेली सरमिसळ होताना दिसते.
आपल्या समाजात प्रामुख्याने दोन वेगळ्या धार्मिक वाटा स्पष्टपणे दिसतात. हा फरक नीट समजून घेतला, तर चुकीचे कोणते याचे उत्तर आपोआप मिळू शकते.
दुर्दैवाने, अलीकडे आपणच आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, नैतिक, सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास करून घेत आहोत.
क्रमशः…
गजानन खंदारे
संभाजी ब्रिगेड, वाशिम
📌 Disclaimer (सूचना)
“या लेखातील मांडलेले विचार हे लेखकाचे वैयक्तिक चिंतन व अभ्यासावर आधारित आहेत. यामागे कोणत्याही धर्म, पंथ, परंपरा किंवा व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. समाजात सकारात्मक विचार, आत्मपरीक्षण आणि विवेक जागृती व्हावी, हा यामागील उद्देश आहे. वाचकांनी याचा स्वीकार किंवा नकार स्वतःच्या बुद्धी, श्रद्धा आणि समजुतीनुसार करावा.”


खुप छान दादा