✍️ गजानन खंदारे
गावाखेड्यांत अध्यात्माच्या नावाखाली चालणारी ‘धार्मिक दुकानदारी’ एका नव्या चिंतेचा विषय बनत आहे. आज मंदिरांची संख्या आणि तिथली गर्दी वाढते आहे; पण या “व्यवस्थेचे” गुलाम झालेले लोक वैचारिक विद्रोह करण्याऐवजी अंधश्रद्धेचे अधिक आणि पक्के गुलाम बनत चालले आहेत. विदारक गोष्ट म्हणजे, या भोंदूगिरीच्या जाळ्यात “महिला वर्ग” मोठ्या प्रमाणावर भरडला जातो आहे. याच सामाजिक पार्श्वभूमीवर, नुकताच पुण्यात असताना ‘देऊळ बंद भाग २’ हा चित्रपट पाहण्यात आला, ज्याने या ढासळत्या व्यवस्थेचे अनेक पदर समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे .धार्मिक भाव-भानाचा समतोल मांडत असतांना या चित्रपटाचे केवळ एकाच अंगाने परिक्षण मांडण्याचा माझा हेतू नक्कीच नाही; परंतु या चित्रपटाने समाजाच्या ज्या दुखऱ्या नसांवर बोट ठेवले आहे, त्यावर विचार करणे आज काळाची गरज बनले आहे.

देवाच्या अस्तित्वाला आव्हान….
चित्रपटात प्रवीण तरडे यांच्या पत्नीने साकारलेली भूमिका थेट देवाच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारते. तेव्हा ती केवळ एका स्त्रीची भूमिका नाही, तर अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या समाजाला जागे करू पाहणाऱ्या एका सजग, विवेकी विचाराचे प्रतिनिधित्वच आहे.असे मला चित्रपट पाहताना अनेक वेळा वाटले पण नेमका याच वेळी मला एक जिवंत विरोधाभास अनुभवायला मिळतो; जेव्हा बाजूलाच बसलेली माझी पत्नी पडद्यावर देवाच्या भूमिकेत असलेल्या नायकाला भक्तीभावाने हात जोडून, डोळे टिपतांना मी बाजूलाच बसलेल्या माझ्या बायकोला वारंवार पाहतो. ….जेव्हा मानवी मूल्यांचा ऱ्हास होतो, धर्माचा बाजार मांडला जातो आणि देव माणसाच्या कल्याणाऐवजी केवळ स्वार्थाचे साधन बनतो, तेव्हा देऊळ बंद’ करण्याची भूमिका किंवा ‘देवळाला कुलूप लावण्याची’ आलेली वेळ बरंच काही सांगून जाते. हा प्रसंग केवळ प्रतीकात्मक नाही, तर तो आपल्या ढासळत्या सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेवर ओढलेला एक तीव्र आसूड आहे.देवावर श्रद्धा असणे यात काहीच गैर नाही, पण जेव्हा ती श्रद्धा

‘अंधश्रद्धा’ बनते आणि त्यातून लोकांचे आर्थिक व मानसिक शोषण होते, तेव्हा ती समाजाला लागलेली कीड ठरते.चित्रपटाचा गर्भितार्थ हाच आहे, देव हा देवळातल्या दगडात किंवा बुवाबापूंच्या पायात नसून, तो भुकेलेल्याला अन्न देण्यात आणि माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्यात आहे. हे खरे व अंतिम सत्य आहे.’देऊळ बंद भाग २’ हा केवळ एक कौटुंबिक किंवा आध्यात्मिक चित्रपट नाही, तर तो आजच्या ‘धार्मिक दुकानदारी’च्या विरोधात विवेकाचा आवाज बुलंद करणारा एक निष्कर्ष आहे. जोपर्यंत आपली पावले अंधश्रद्धेच्या केंद्रांकडे वळण्याऐवजी विवेकाकडे वळत नाहीत, तोपर्यंत समाजाची ही ढासळती व्यवस्था सुधारणार नाही. आता गरज आहे ती देवळातल्या गर्दीची नाही, तर माणसाच्या मनातील विवेक जागा करण्याची!
गजानन खंदारे
संभाजी ब्रिगेड वाशिम

