
काही प्रवास नियोजन करून होत नाहीत… ते अचानक घडतात आणि आयुष्यभराच्या आठवणी देऊन जातात.

मित्रांसोबत एक दिवस मोकळेपणाने जगायला निघालो होतो. परतताना मात्र जाणवत होतं—आपण फक्त भंडारदरा पाहून आलो नाही; काही काळासाठी रोजच्या धावपळीपासून स्वतःलाच बाहेर ठेवून आलो
सप्टेंबर 2026… शनिवार … शिक्षक दिनाची सकाळची शाळा आटोपून घरी आलो. रोजच्या दिवसासारखाच दिवस होता. शाळेतील काम, विद्यार्थ्यांची लगबग आणि त्यानंतर घरी परतण्याची घाई. तेवढ्यात कव्हर सरांचा फोन आला….चला, कुठेतरी जाऊ….अचानक आलेल्या त्या वाक्याने दिवसाचा सगळा मूडच बदलला….कुठे? ते नंतर ठरवू. आधी निघूया….काही वेळात बोरकर सरांशी कॉन्फरन्सवर बोलणं झालं. बिल्लारी सर, कावरखे सर आणि आणखी काही मित्र जोडले गेले. कुठे जायचे यापेक्षा सगळ्यांनी एकत्र निघायचे हेच महत्त्वाचे वाटत होते. दहा जण. दोन गाड्या.
चार वाजता निघायचे ठरले.पण चार वाजता निघणं ही फक्त कागदावरची वेळ…. चारचे पाच झाले, पाचचे सहा झाले आणि शेवटी साधारण सहा वाजता…..गाड्यांनी एकदाच रिसोडला… मागे टाकून… लोणारला जवळ करत निघाल्या…
अशा प्रवासात घड्याळाकडे फारसं पाहायचं नसतं. कारण प्रवास सुरू होण्या आधीची घाई संपली की मन मोकळं होतं. आमचा मार्ग ठरला…लोणार, दुसरबीड…. पुढे समृद्धी महामार्ग आणि बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातून….. इगतपुरीच्या दिशेने… इगतपुरी म्हणजे … इयत्ता आठवीतील वसंत जोशी यांच्या…लाखाच्या कोटीच्या गप्पा… या पाठातील रेल्वेचे इंजिन बिघडल्यामुळे… ज्या स्टेशनवर गाडी थांबली होती… काका व तरुण यांच्या गोष्टी चालू होत्या… कोणी बाकावर आडवे झाले, कोणी पेपर वाचू लागले, कोणी चहा मागितला… दादर नागपूर एक्सप्रेस… तेच इगतपुरी रेल्वे स्टेशन… हिल स्टेशन… विपश्यना केंद्र…
समृद्धी महामार्गावर गाडीने वेग घेतला. रस्ता सरळ, मोकळा आणि लांबवर पसरलेला. गाडीच्या मीटर कडे पाहताना कधी 105…110..114…122…. असे आकडे खालीवर होतं असताना मला दिसायचे.. करण गाडीचे स्टेरिंग रिसोड ते इगतपुरी पर्यंत मलाच सांभाळावं लागलं होतं…पण नियमांची काळजी घेतच…. रात्रीचा प्रवास असल्यामुळे दोन्ही गाड्यांमधला संपर्क सतत होता. फोन….तर कधी पुढची गाडी दिसतेय का, एवढीच खात्री….

गप्पा मात्र सुरूच होत्या. नेहमीचेच किस्से, मित्रांची टिंगलटवाळी, जुन्या आठवणी आणि मध्येच येणारे शांत क्षण.रात्र वाढत गेली. शहरं मागे पडत गेली. महा मार्गावरील लाईट कमी-जास्त होत होते. खिडकीबाहेर बाहेर काळोख आणि त्या काळोखाला चिरत आमची गाडी पुढे जात होती …
आम्ही…साधारण मध्यरात्रीच्या सुमारास इगतपुरी गाठलं.आता प्रश्न होता.राहायचं कुठे ? शनिवार-रविवार असल्यामुळे हॉटेलमध्ये खोली मिळणं कठीण होतं. एका ठिकाणी विचारलं, दुसऱ्या ठिकाणी गेलो. कुठे जागा नव्हती, कुठे दर जास्त होते. शेवटी एका हॉटेलमध्ये खोली मिळाली.भाडं ऐकून सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं…..सहा हजार रुपये!
पण त्या वेळी थकवा इतका होता की सहा हजारांचा विचार करण्या पेक्षा खोली मिळाली, हेच महत्त्वाचं वाटलं….रात्र संपली.सकाळी उठलो. तयार झालो. हॉटेलच्या समोरच एका छोट्याशा ठिकाणी चहा-नाश्ता केला….आणि समोरचा सकाळचा रस्ता हळूहळू जागा होत होता.
कालपर्यंत शहराच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या आमच्या गाड्या आता डोंगराच्या दिशेने वळल्या होत्या.जुना नाशिक-मुंबई महामार्ग सोडला आणिभंडारदऱ्याची वाट धरली. जसजसं पुढे जाऊ लागलो तसतसं परिसर बदलत गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवाई वाढत होती. डोंगर जवळ येत होते. काही ठिकाणी धुक्याची हलकी चादर डोंगराच्या अंगावर विसावली होती. बारी गावाजवळ पोहोचलो. हे भंडारदऱ्याच्या परिसरातील महत्त्वाचे ठिकाण. कळसू बाईच्या डोंगर रांगांच्या पायथ्याशी वसलेलं….
भंडारदऱ्याचा परिसर फिरायचा म्हणजे एक-दोन ठिकाणं पाहून परतायचं नव्हतं. जवळपास साठ किलोमीटरचा परिसर फिरायचा होता…. म्हणून विठ्ठलाला सोबत घेतलं… विठ्ठल लोटे… तिथला स्थानिक तरुण…बारावी होऊन आयटीआय केलेला…. पण खूपच माणुसकीचा वाटला….. त्याला आमच्या सोबत घेऊन आम्ही सगळ्यात आधी भंडारदरा धरणाकडे निघालो..ब्रिटिश काळात बांधलेले हे धरण म्हणजे या परिसराच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग. धरणाच्या भिंतीजवळ उभं राहिल्यावर पाण्याचा विस्तार डोळ्यांसमोर पसरलेला दिसतो. या पाण्यामुळे तयार झालेलं आर्थर लेक,आजू बाजूचे डोंगर आणि त्यात मिसळलेलं आकाश…सगळं मिळून एक वेगळंच दृश्य तयार होतं…. पण नेमक्याच झालेल्या नेपाळच्या महापुरामुळे… त्या पुलावरून पाण्याकडे पाहताना… काय वाटत असेल याची कल्पनाच न केलेली बरी….
एक विचार सहज मनात आला.आपण शहरात पाण्याची बाटली विकत घेतो. इथे मात्र हजारो एकर परिसराला जगवणारं पाणी डोळ्यांसमोर शांतपणे साठलेलं होतं. निसर्गाचा मोठेपणा कधी कधी त्याच्या शांतपणातच दिसतो… पण आपण निसर्गाला आव्हान देतो आणि म्हणूनच त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात…

तिथून पुढे अंब्रेला फॉल्सकडे गेलो. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह दगडांवरून खाली पडताना छत्रीसारखा आकार घेतो म्हणून त्याला हे नाव. पावसाळ्याचा जोर कमी असला तरी परिसरात त्या धबधब्याची ओल आणि हिरवाई जाणवत होती. पुढे गेल्यावर घाटघर गावचा कोकणकडा…अतिशय प्रसिद्ध….असुन इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते…. हे ठिकाण म्हणजे तीन जिल्ह्याच्या सीमा… अहिल्यानगर,नाशिक व ठाणे… येथे मक्याचे कणसं खाण्याचा मोह आवरता आवरेना… त्यानंतर गवती चहा न घेणे… म्हणजे निसर्गाशी प्रतारणा करण्यासारखे झाले असते…. म्हणून गवती चहा घेतला.येथे आदिवासी कोळी महादेव जमातीच्या कुलदेवीचे देखील मंदिर आहे तिचे नाव घाटन देवी आहे. याच नावावरून गावाचे नाव घाटघर असे पडले आहे. इथे अनेक धबधबे असुन पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर धुक्यात हरविलेला असतो. घाटघरला खुप पाऊस पडतो म्हणुन यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हंटले जाते.
पुढे रंधा धबधबा….इथे मात्र पाण्याचा आवाजच वेगळा वाटतो. वरून खाली कोसळणाऱ्या पाण्याचा गडगडाट, आसपासच्या दगडांवर उडणारे तुषार आणि त्या आवाजात हरवून जाणारी माणसांची बोलणी.काही वेळ आम्ही फक्त तिथे उभे असताना त्या दरीत दोन-तीन मुलं माशा पकडताना दिसले.. त्यांच्या हातातील ती माशी पाहून मला….. इयत्ता नववीतील तुकाराम धांडे…यांच्या… वनवासी…. कवितेतील…. ओळी आपसुकच आठवल्या…
आम्ही डोंगरराजाची पोरं!….
आम्ही उंबर माळीचे….
बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राकं हसून…..
डोई आभाळ पेलीत चालू शिंव्हाच्या चालीत…
कळसूबाई माऊली…
आमच्या कडेकपारीला…
तिच्याच अंगाखांद्यावर…
खेळतो आम्ही मुलं….
प्रवरामाय माऊली…
आम्हा कडेकपारीत….
तिच्याच दुधावरती…
वाढलो आम्ही मातीत!
उन्हातान्हात हिंडतो..
पावसात भिजतो..
वाघाची आमची डरकाळी
रानावनातून फिरतो
आम्ही निसर्गाची लेकरं सगळी….
तिथून पुढे… जय आदिवासी… असा झेंडा फडकत असलेल्या बोटीतून त्या पाण्यातून प्रवास करण्याचा मोह आवरता आला नाही… पाण्याची पातळी दोनशे फूट खोल… दोन्ही बाजूला उंच उंच खडकांच्या रांगा.. त्या खडकाला आगीमोहोळाच्या पोळ्या… आगीमोहोळ उठले असते तर…
डोंगरांच्या कुशीतलं हे गाव पाहताना शहरापासून आपण किती दूर आलो आहोत याची जाणीव होते. घरं साधी. रस्ते साधे. आजूबाजूला डोंगर. आणि त्या सगळ्यात आपापल्या कामात गुंतलेली माणसं.
आम्ही पर्यटक म्हणून तिथे गेलो होतो.पण गावकऱ्यांसाठी तो त्यांचा रोजचा परिसर होता.हे दृश्य काही काळ मनात राहून गेलं. कित्येक पिढ्या या परिसरातून गेल्या असतील. पाऊस आला असेल, दुष्काळ पडला असेल, माणसं बदलली असतील..पण दगडात कोरलेली ही शांतता अजून तशीच उभी आहे.डोंगरांची रचना बदलत होती. एखाद्या वळणावर अचानक खोल दरी दिसायची. दुसऱ्या वळणावर हिरव्या उतारावर एखादं छोटंसं घर दिसायचं. दूरवर शेळ्या घेऊन जाणारा माणूस दिसायचा.अशा वेळी गाडीचा वेग आपोआप कमी होतो.कारण काही दृश्यं पाहण्यासाठी गाडी थांबवावी लागत नाहीत..फक्त मन थोडं शांत करावं लागतं.
पुढे तीव्र उतार… धरणाच्या भिंतीवरील रस्ता… तेवढ्यात समोर लाईट देऊनही… समोरची गाडी आमच्या दिशेने आली… आम्हाला मागे जाणं शक्य नव्हतं कारण माग पाच सहा गाड्या होत्या…

साधन दरी परिसरात पोहोचलो तेव्हा सह्याद्रीचा विस्तार अधिक जाणवला. डोंगरांच्या रांगा एकामागोमाग एक पसरलेल्या. मध्ये खोल दऱ्या. वर निळं आकाश…. तिथे एक गोष्ट मात्र आमची राहून गेली.. रोपवे झिप लाईन… डोंगराच्या या कड्यावरून दुसऱ्या कड्यावर जाणे… कारण त्याला दीड दोन तास लागणार होते….. आम्ही एवढ्या उंचावर गेलो होतो.. ढग सुद्धा आमच्या खाली होते.त्या ढगातून जात असताना… स्वर्गात पोहोचण्याचा अनुभव मिळत होता… खरा स्वर्ग काय असतो ते तिथे गेल्यावरच कळालं… तिथून दूरवर कळसूबाईचं शिखर दिसत होतं.महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर…..
ते शिखर पाहताना उंचीपेक्षा त्याच्या पायथ्याशी उभ्या असलेल्या माणसाची जाणीव झाली. एवढ्या मोठ्या डोंगरासमोर आपण किती लहान आहोत, हे सांगण्यासाठी कुणा तत्त्वज्ञाची गरज नव्हती.निसर्ग ते काम सहज करतो.
दिवसभर फिरताना आमच्यातील प्रत्येक जण कधी फोटो काढत होता… असेच कळसुबाई शिखर प्रवेशद्वारा जवळ फोटो काढत असताना…. तिथले आमदार आले… नाव त्यांचे यशवंत आमदार… पुढच्या निवडणुकीला मला निवडून द्या असे आम्हाला म्हणाले.. त्यांची फाईव्ह स्टार हॉटेल आहे म्हणे… झोपडी वजा… तिथं बाजरीच्या भाकरी व पिठलं… असं स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आनंद वेगळाच होता… अशा या सांधण दरी… परिसराच्या स्मृती मनाच्या कप्प्यात कायम ठेवल्या.. तिथले विद्यमान आमदार आहेत डॉ. किरण लहामटे…..
ही दरी म्हणजे हजारो वर्षांमधील पाणी आणि वाऱ्याच्या प्रवाहामुळे खडकांची झालेली धूप आणि एका अतिप्राचीन भौगोलिक प्रस्तरभंग रेषेमुळे तयार झालेली एक मोठी नैसर्गिक भेग आहे. ही दरी 200 ते 300 फूट खोल आणि जवळपास 2 ते 4 किलोमीटर लांब पसरलेली आहे. या दरीच्या आसपास कळसुबाई शिखर असा भव्य सह्याद्रीचा परिसर आहे.
कधी एखाद्या दृश्यावर थांबत होतो, तर कधी एकमेकांची चेष्टा करत होतो . काल रात्रीपर्यंत थकलेले चेहरे आता उत्साही झाले होते.प्रवासात अशीच गंमत असते.
आपण एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी निघतो.. पण परतताना त्या ठिकाणापेक्षा सोबत असलेली माणसं आणि त्यांच्यासोबत घालवलेला वेळ अधिक आठवतो.
भंडारदऱ्याचा दिवस हळूहळू संपत आला.परतीच्या वाटेवर पुन्हा तेच डोंगर मागे सरकत होते. सकाळी जे दृश्य नवीन वाटत होते, ते आता ओळखीचे वाटू लागले होते.
शेंडी मागे सरकली…डोंगर मागे पडले.रस्ता पुन्हा शहराच्या दिशेने वळला.
पण मन मात्र अजून त्या डोंगरांमध्येच होतं.या प्रवासाचे नियोजन फार आधीपासून केले नव्हते. कुठे जायचे हेही शेवटच्या क्षणापर्यंत ठरले नव्हते. चार वाजता निघायचे ठरवून सहा वाजता निघालो. रात्री खोलीसाठी धावपळ झाली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा प्रवास सुरू झाला.सगळं अगदी नियोजनाप्रमाणे झालं असं काहीच नव्हतं.पण कदाचित म्हणूनच तो प्रवास सुंदर झाला.काही प्रवास ठरवून केले जातात आणि काही प्रवास मनाच्या हाकेला प्रतिसाद देऊन.भंडारदऱ्याचा हा प्रवास दुसऱ्या प्रकारचा होता.
मित्रांसोबत एक दिवस मोकळेपणाने जगायला निघालो होतो. परतताना मात्र वाटत होतं…आपण फक्त भंडारदरा पाहून आलो नाही..काही काळासाठी रोजच्या धावपळीपासून स्वतःलाच बाहेर काढून..डोंगर, पाणी, धबधबे आणि रस्ते तर पुन्हा पाहता येतील…पण त्यादिवशी, त्या माणसांसोबत, त्या मनःस्थितीत झालेला प्रवास पुन्हा तसाच घडत नाही…. हे मात्र खरे…
प्रवासाची हिच खरी मजा असते….. मग तो प्रवास आयुष्याचा असो की प्रवासाचा… प्रवास असो…
शब्दांकन…
दिलीप भिसडे
( सहाय्यक शिक्षक )
स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय, धोडप बु.
