अल्बम चाळताना अचानक हा फोटो समोर आला…
आणि डोळ्यासमोर उभा राहिला तो काळ – भीतीचा, असहायतेचा, आणि माणुसकीची खरी परीक्षा घेणारा…
लॉकडाऊनचा तो भयानक काळ…
जिथे जिवंत माणूस माणसाला घाबरत होता…
जिथे नाती, रक्ताची असोत किंवा जिव्हाळ्याची – सगळी दूर पळाली होती…
मृत्यू इतका जवळून फिरत होता की प्रत्येक श्वास भीतीने भरलेला होता…
लोक पटापट मरत होते…
स्मशानभूमीत प्रेतांचा ढीग लागत होता…
आणि सर्वात वेदनादायक म्हणजे –
स्वतःच्या माणसाला अग्नी द्यायलाही कोणी पुढे येत नव्हतं…
अशा काळात, यवतमाळमधील दोन मुस्लिम तरुण पुढे आले…
धर्माच्या पलीकडे जाऊन, स्वतःचा जीव धोक्यात घालून
हिंदू संस्कारांप्रमाणे मृतांना अग्नी, भडाग्नी देत होते…दाह संस्कार हिंदू रिवाजा प्रमाणे करत होते …
ही फक्त सेवा नव्हती… तर
ही “माणुसकीची सर्वोच्च पातळी होती”…
जिथे धर्म नाही, जाती नाही…
फक्त “माणूस” उरतो…
नगर प्रशासनाच्या नोंदीत आकडे वाढत होते…
२००… ५००… ७००… १०००…
पण या आकड्यांमागे उभं होतं –
या दोन जिवांचं निःस्वार्थ धैर्य…
त्या वेळी काहीजण टाळ्या-थाळ्या वाजवण्यात व्यस्त होते…
तर काहीजण द्वेषाचं राजकारण पेटवत होते…
पण याच काळात,
माणुसकी मात्र शांतपणे, न बोलता काम करत होती…
या कार्याची दखल स्थानिक माध्यमांनी घेतली…
आणि मनात एकच विचार आला –
या देवदूतांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे…
मराठा सेवा संघ आणि शंभूराजे ग्रुप, वाशिम यांनी पुढाकार घेतला…
आवाहन केलं…
आणि आश्चर्य म्हणजे –
फाटक्या कपड्यातला माणूसही आपला खिसा रिकामा करत होता…
दीड-दोन लाखांची मदत सहज उभी राहिली…
ही श्रीमंती नव्हती पैशाची –
ही श्रीमंती होती मनाची…
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते
या तरुणांना ₹५१,००० मदत व सन्मानपत्र देण्यात आलं…
तो सन्मान फक्त त्यांचा नव्हता…
तो सन्मान होता –
माणुसकीचा…
आजही हा फोटो पाहिला की एकच जाणवतं –
देव कुठे मंदिरात, मशिदीत नाही…
तो अशा माणसांत असतो…
माणूस म्हणून माणसातल्या देवाला वंदन करणं,
हाच खरा धर्म… हाच आपला देव…
बाकी तुम्ही द्वेष पसरवत राहा…
आम्ही मात्र माणुसकी जपणार…


✍️ लेखक परिचय –
गजानन खंदारे हे सामाजिक विषयांवर ठाम भूमिका घेणारे,
प्रखर आणि अभ्यासपूर्ण लेखन करणारे लेखक आहेत.समाजातील विसंगती, अंधश्रद्धा, राजकीय व सामाजिक वास्तव
यावर ते आक्रमक पण तथ्याधारित लिखाण करतात.तसेच ते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत
माणुसकी, समता आणि जागरूकता यांचा संदेश पोहोचवण्याचे कार्य करतात. — गजानन धामणे -संपादक
⚠️ Disclaimer
हा लेख कोणत्याही धर्म, जात किंवा समुदायाच्याला उद्देशुन लिहिलेला नाही.
सदर लेखाचा उद्देश केवळ माणुसकी, सामाजिक उत्तरदायित्व आणि सकारात्मक कार्य यांना अधोरेखित करणे हा आहे.
लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.
कविता
सुकन्या
आई बापाची लाडाची लेक
जेव्हा नवर्या घरी जाते
आई बापाच्या सन्मानासाठी
पतिव्रता धर्माचे पालन करते
पती परमेश्वर समजून
नवऱ्याला देव मानते
तुटक्या फुटक्या झोपडीतही
महालाचे स्वप्न रंगवते
गरीबीची तिला लाज
वाटत नाही
नवऱ्याच्या सुखापेक्षा
तिला काही मोठ वाटत नाही
हे संस्काराशिवाय घडत नाही
पण कधीकधी घडतं असंही
कि जिला नांदायचंच नाही
तिच्यासाठी ना गाडी ना बंगला
ना नवरा ना त्याची किंमत काही
पण जी स्वतःच्या संस्काराचं
शिक्षणाचं कर्तव्याचे भान ठेवते
ती आपल्या फाटक्या संसाराला
सदसद विवेक बुद्धी रुपी धाग्याने
सतत शिवण्याचा प्रयत्न करते
सेवा सासू-सासर्याची
करिते मायबापापरी
देते मान त्यांना माया लावूनी
पाळीते आज्ञा त्यांची
देव्हाऱ्यातल्या देवा परी
सासर आणि माहेर
जिच्यासाठी दोन्ही पंढरपूर
लाडाची सुकन्या म्हणून
तिचा दोन्हीकडे आदर
सासू-सासरे आणि मायबाप
तिच्यासाठी पांडुरंगाचे रूप
मागते एकच त्यांना आशीर्वाद
मस्तक त्यांच्या ठेवून चरणावर
लेक समजून मला फिरवा
मायेचा हात माझ्या पाठीवर
माझ्या फाटक्या संसाराला
असू द्या आधार जन्मभर
सुकन्या म्हणून करते
विनंती सर्वाला
नका हीन समजू तुम्ही
मुलीच्या जन्माला
तीच जिजाई तीच रमाई
तीच अहिल्या तीच लक्ष्मीबाई
समजून तिला जन्माला घाला
कवी गायक
विजू मास्तर तिजारे
सोनाटी ता मेहकर जि बुलढाणा
