✍️ गजानन खंदारे
आपला भारत देश आता निर्विवाद जागतिक महासत्ता बनला आहे, यासाठी आणखी कोणतीही सिद्धता किंवा पुरावा देण्याची गरज उरलेली नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात “चंपा”सारखे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आपले अवतारकार्य पुढे नेत असताना आपण सर्वच धन्य झालो आहोत!
अलीकडेच दिल्लीत काही तरुणांनी आंदोलन केले. त्या संदर्भात “चंपा” यांनी एक विधान केले – त्यांच्या या अविष्काराची चर्चा होणे अपरिहार्य म्हणूनच आमचा हा प्रपंच.
“पोलिसांनी प्रत्येक दगड उचलला आहे. त्या दगडावरचे फूटप्रिंट आधारशी लिंक होतील. अहवाल पाहिला तर चक्कर येईल.”
हे विधान होताच महाराष्ट्र धन्य झाला. चारही बाजूंनी कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.
दरम्यान, यातूनच नेहमीच गुडघ्याला बांधून नेहमीच उतावळे असलेले आमचे “राठा” यांना “चंपा” यांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स पाहण्याची तीव्र इच्छा झाली, यात नवल ते काय? त्यांनी तसा जाहीर आग्रहच धरला. “संरा” यांनी अजून एक पाऊल पुढे टाकत थेट नोबेल पुरस्काराचीच मागणीच केली. त्यातच पळून जाऊन गळालेल्या सेनेतील “रधं” गप्प कसे बसणार? त्यांनीही प्रतिक्रिया दिलीच –
“वाय-झेड सिक्युरिटी असलेल्या माणसाची बुद्धिमत्ता ‘वय-झेड’ झाल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.”
असं सांगून कोल्हापूरचं पार्सल पुण्यात उघडलंच!
आता समजा, खरोखरच दगडांवरील ठसे आधारशी जोडले गेले, तर पुढे काय? आंब्यावरील ठसेही जोडले जाणार का? कारण यापूर्वीच “चंपा”साहेबांनी पेपरफुटीची तुलना ‘आंबा चोरी’शी केली होती. आंबा चोरला तर फाशी नसते, फक्त समज दिली जाते!
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले – ते ‘आंबा’ नव्हते. आंबा पुन्हा विकत घेता येतो, पण भविष्य नाही. हे “चंपा” यांना कळलेच नाही. यात दंगे-करांचा काय दोष, पण ही खंत कुणालाच नाही.
दगडांवरील ठसे जोडले गेले, तर आंदोलक सापडतील. पण त्या दगडांनी कोणत्या विद्यार्थ्याचे भविष्य फोडले, हे मात्र कसे समजणार?
उच्च शिक्षण मंत्री असताना विद्यापीठाच्या योगदानावर शंका घेणे, पेपरफुटीला ‘आंबा चोरी’ म्हणणे आणि आता दगडांवरील ठसे आधारशी जोडण्याचा दावा करणे – हे सगळे एकाच मेंदूतून आलेले विचार आहेत.
राजकारणात असली पोरकट विधाने करणे ही एक कला किंवा हल्ली फॅशन झाली आहे. काही लोक ती शिकतात, तर काही लोक स्वतःच त्या कलेचे प्रतीक बनतात. “चंपा” यांनी दुसरी गोष्ट साध्य केली आहे. त्यांचे प्रत्येक विधान आता ‘वादाचे बीज’ ठरत आहे.
विरोधक हसत आहेत, समर्थक गप्प आहेत आणि सामान्य माणूस विचारतो – “शिक्षण मंत्री असे बोलत असतील, तर आपल्या मुलांना काय शिकवणार?”
दगडांवरील ठसे कदाचित शोधले जातील, पण त्या दगडांनी उद्ध्वस्त केलेले विद्यार्थ्यांचे भविष्य आणि त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू – ते कशाशी जोडले जाणार? आधार कार्डाशी की मंत्र्यांच्या संवेदनशीलतेशी?
“चंपा” यांना नोबेल द्या, पण ‘वैज्ञानिकता’ किंवा ‘सामाजिक संवेदनशीलता’ यासाठी नाही. ‘राजकीय हास्यास्पदता’ या श्रेणीत ते निर्विवाद विजेते आहेत.
दगडांवरील ठसे शोधत राहा… मेंदूवरील ठसे कधी सापडलेच तर आम्हालाही कळवा. आम्ही वाट पाहत आहोत.
गजानन खंदारे ✍️
⚠️ Disclaimer:
हा लेख पूर्णपणे वैचारिक किंवा उपरोधिक अंगाने असु शकतो . यात व्यक्त केलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते असून कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा पदाचा अवमान करण्याचा हेतू नाही. सार्वजनिक विधानांवर भाष्य करणे हा लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. वाचकांनी हा लेख त्याच दृष्टिकोनातून वाचावा.
