स्वतः सोबत देवाला फसवणारी माणसं! आषाढी विशेष ..

आपल्याकडे दोन प्रकारच्या धार्मिक परंपरा रूढ आहेत. एक वैदिक हिंदू परंपरा आणि दुसरी वारकरी विचारांची साधी, सरळ भक्तीमार्गाची परंपरा. दोन्ही परंपरा समांतर चालणाऱ्या असल्या तरी त्यांच्यातील विचारधारा मात्र पूर्णपणे वेगळी आहे.
आणि नेमकं इथेच आजच्या काळात गोंधळ निर्माण झाला आहे.अलीकडच्या काळात कीर्तन परंपरेत जशी “कथित” वारकऱ्यांची घुसखोरी झाली.
भक्ती मार्गातही आपण आपल्याच मनानुसार घुसखोरी करून घेतली. संस्कृती ,परंपरा मांडत असतांना व त्यासाठी कधी कधी भांडत हि असतांना मनाला आवडतील तसे पायंडे आपण स्वता पुरते निर्माण करून घेतले आहेत .

दर महिन्याला दोनदा येणाऱ्या एकादशीच्या तिथीला आपण उपवास करून पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतो .त्यातच आषाढी व कार्तिकी एकादशीचे महत्व विशेष ! या दिवशी लहान थोर सर्वच उपवास करण्याचा प्रयत्न करतो .मात्र उपवासाचे नावाखाली आपण नेमक काय करतो हे हे स्वताच्या मनाला विचारणे अधिक योग्य ठरेल.

यादिवशी संपूर्ण दिवस भगवान विष्णूंची भक्ती, नामस्मरण आणि आत्मशुद्धीत घालवल्याने मोक्षप्राप्ती होते, असा समज आहे.
या समजावर कितपत विश्वास ठेवायचा, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि विचारांचा विषय आहे.

मात्र ज्या संतांचे नाव घेऊन आपण हा श्रद्धेचा विषय पुढे नेतो त्याच संतानी मृत्यू पश्चात स्वर्ग किंवा मोक्ष नाकारलेला आहे ,याबाबत जगद्गुरू तुकोबांच्या अनेक अभंगाचे दाखले देता येतील ...

एक गोष्ट मात्र नक्की कि —
एकादशीचा उपवास हा केवळ धार्मिक विधी नसून, तो शारीरिक आणि मानसिक शुद्धीचा एक प्रभावी मार्ग आहे.

संत तुकाराम महाराज यांनीही एकादशी व्रताला सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले आहे, अशी परंपरागत मान्यता आहे. एकादशी म्हणजे केवळ उपवास नाही, तर संयम, शुद्धी आणि भक्तीचा एक सखोल अनुभव आहे. म्हणूनच एकादशीला “हिंदूंचे व्रत” म्हणण्यापेक्षा ते वारकऱ्यांचे “जीवनतत्त्व” आहे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
‘एकादशी’ या शब्दातच गूढ अर्थ दडलेला आहे—
‘एक’ म्हणजे मन आणि ‘दहा’ म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये.
या सर्व इंद्रियांना नियंत्रित करून त्यांना ईश्वरभक्तीकडे वळवणे, हाच एकादशीचा खरा उद्देश आहे.

इंद्रियसंयम म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नव्हे, तर विचार, वाणी आणि कृती यांवरही नियंत्रण ठेवणे.
हा दिवस मन शांत करून आत्मपरीक्षण करण्याचा आणि स्वतःला अधिक शुद्ध बनवण्याचा असतो.

महाराष्ट्रात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.वारकरी संप्रदायाने या दिवसाला विशेष आध्यात्मिक उंची दिली.
पंढरपूरची वारी, हरिपाठ, अभंगगायन आणि “विठ्ठल नाम” यांचा गजर—हे सर्व एकादशीला एक वेगळंच पावित्र्य देतात.
हा दिवस म्हणजे केवळ व्रत नव्हे, तर समूहभाव, भक्ती आणि समर्पणाचा उत्सव आहे. इथे मंत्रोच्चाराला विरोध असण्याचे कारण नाही तो तुम्हाला अंतर्मनाशी जोडतो का? हे अधिक महत्त्वाचे आहे.

मग घुसखोरी कुठे झाली?

पूर्वी कीर्तन म्हणजे ज्ञान, समाजप्रबोधन आणि आत्मशुद्धीचा मार्ग होता.
पण अलीकडच्या काळात कीर्तन परंपरेत कथित वारकऱ्यांची घुसखोरी झाली आहे.
पैसे घेऊन कथा सांगणाऱ्या बा महाराजांनी याचा बाजार केला भक्तीपेक्षा प्रसिद्धी महत्त्वाची झाली ,नामस्मरणापेक्षा दिखावा वाढला साधेपणाऐवजी अहंकार आला

उपवास म्हणून दिवस भर वेगवेगळे पदार्थ पचवायचे अन निराहार असल्याचे सांगायचे यातून आपण नेमक फसवतो कुणाला देवाला कि स्वतःला ?

लोकांनीही भक्ती आपल्या सोयीप्रमाणे बदलून घेतली —
उपवास करायचा, पण मनात वाईट विचार ठेवायचे

नाम घ्यायचं, पण वागणं मात्र त्याच्या उलट ठेवायचं

खरी भक्ती मंदिरात नाही, ती मनात असते.
देवाला नाही, तर स्वतःला फसवणं थांबवा.

vdo पाहण्यासाठी येथे click करा

गजानन खंदारे रिसोड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top