भक्ती आणि श्रद्धेचा मूळ मार्ग — एक दृष्टिकोण

आपल्याकडे भक्ती मार्ग सांगणाऱ्या दोन भिन्न परंपरा दिसतात.

एक म्हणजे सनातनी कर्मकांड परंपरा.
ज्यात “बहूईश्वर” वाद विधी, नियम, पद्धती आणि कर्मकांडांचे पालन महत्त्वाचे मानले जाते.

तर दुसरी म्हणजे संतपरंपरेचा भक्ती मार्ग. “एक-ईश्वर” वाद
ज्यात देवापर्यंत पोहोचण्यासाठी भावना, प्रेम, सत्व आणि चांगुलपणा यांना महत्त्व दिले जाते.

दोन्ही परंपरा एकमेकांना समांतर आहेत, परंतु विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे.

समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा आपण दोन्ही मार्गांची सरमिसळ करतो.
काहीजण स्वतःला ह.भ.प. म्हणवून घेतात आणि संतपरंपरेचे नाव घेत असतानाही प्रत्यक्षात भक्तीच्या नावाखाली कर्मकांडाचा आग्रह धरतात. हे अपवादात्मक असू शकते, पण घडते.

भक्तीचा मार्ग नेहमी मनातून सुरू होतो.

समाधी अवस्थेला पोहोचलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा देवाकडे दान मागण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही.
त्यांनी जगाच्या कल्याणासाठी “पसायदान” मागितले.

दुर्गा सप्तशती या ग्रंथात म्हटले आहे :
“सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके…
किंवा…या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता”

स्त्रीशक्ती ही ईश्वरी तत्त्वाचीच प्रतिमा आहे.

माणसांबद्दल बोलताना चंद्रशेखर गोखले म्हणतात :
“माणसं हल्ली देवळात जाऊन दुकानात गेल्याप्रमाणे वागतात.
अन चार–आठ आणे पेटीत टाकून काहीतरी मागतात.”

नवस बोलणे म्हणजे आपण देवा सोबत व्यवहारच बोलतो.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात अत्यंत सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक आहे.

हा फरक सांगताना भगवान रजनीश म्हणतात :
“मानो मत, जानो.”

ईश्वराला फक्त मानणे म्हणजे अंधश्रद्धा होऊ शकते.
इतरांनी सांगितले म्हणून आपण मानतो.

परंतु ईश्वराला समजून घेणे म्हणजेच श्रद्धा.
हा मार्ग विचार, अनुभव आणि जाणिवेवर आधारित असतो.

तुकाराम महाराज म्हणतात :
“बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणुनी कळवळा येत असे.”
म्हणुन ते म्हणतात, तिर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी|
तर
महर्षी पतंजली यांनी अष्टांग योग साधना या ग्रंथात ईश्वरप्राप्तीचा स्पष्ट मार्ग सांगितला आहे.
यम, नियम,आहार, विहार, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी.

हे आठ अंग आत्मशुद्धी, अंतर्मुखता आणि स्वतःची जाणीव वाढवतात.

खरी श्रद्धा कधीच दिखावा करत नाही.
देवाच्या जवळ जाण्यासाठी पवित्र हृदय, स्वच्छ विचार आणि सच्ची भावना यापेक्षा मोठा मार्ग नाही.

— शेवटी माझ्या वाचनात आलेला अतिशय सुंदर असा संस्कृत श्लोक आहे
कराग्रे वसती लक्ष्मी,
कर मध्य सरस्वती,
करमुले तो गोविंद,
प्रभाते कर दर्शनम|

लेखक – गजानन खंदारे मोप

(वरील लेख हा ग्रंथाधारित अभ्यास आणि वैयक्तिक चिंतनातून घेतलेला निष्कर्ष आहे.आम्ही कुठल्याही वादास  चालना देत नाही)

आपल्या प्रतिक्रिया नक्की लिहा लेख वाचण्या साठी खालील शीर्षकावर click करा

2 thoughts on “भक्ती आणि श्रद्धेचा मूळ मार्ग — एक दृष्टिकोण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top