– गजानन खंदारे मोप (रिसोड)

पी. एस. खंदारे सर…
इथल्या संवेदनाहीन सरकारी व्यवस्थेने सुमारे १४ हजार सरकारी शाळा बंद करण्याचा घाट घातला होता.
माझ्यासह अनेक सहकारी मित्र व्यथित झाले होते. आम्ही काही जण सरकारशी दोन हात करण्याची भाषा करत होतो; तसेच नियोजनही सुरू होते. शेवटी ८ जानेवारी २०२३ ही तारीख निश्चित झाली.
शाळा आणि शिक्षण वाचवण्यासाठी आम्ही अक्षरशः धावपळ करत होतो. जिल्ह्यात अंतरराज्य शाळा-शिक्षण बचाव परिषदेचे नियोजन जोरात सुरू होते. शाळा, जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी आयुष्य झोकून दिलेले विविध राज्यांतील जागतिक ख्यातीचे तज्ज्ञ येणार होते. संपूर्ण वातावरण भारलेले होते.
आणि त्या सगळ्या धावपळीत… प्रत्येक कामात, प्रत्येक निर्णयात, प्रत्येक पावलावर आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे असणारा माझा भाऊ आमच्यासोबत होता— पी. एस. खंदारे सर!
गजानन धामणे, मी आणि चळवळीशी जोडलेले शेकडो कार्यकर्ते गावोगावी फिरत होतो. शाळांना, ग्रामसभांना भेटी देत होतो. ठराव संकलित करत होतो.
कोणताही कार्यक्रम असो— पी. एस. सरांची वेशभूषा ठरलेली, त्यांचा साधेपणा ठरलेला आणि समाजकार्यावरील त्यांची निष्ठा तर विलक्षणच. गाडगेबाबांचा कर्मयोग त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसायचा.
चळवळीत अनेक माणसं पाहिली, अनुभवली; पण स्वतःला पूर्णवेळ समाजासाठी झोकून देणारी माणसं फारच विरळ असतात. पी. एस. सर त्या अपवादांपैकी एक होते.

हल्ली मृत्यूच्या बातम्या रोजच कानावर येतात. त्या शब्दांत मांडता येतात; किंबहुना तशी प्रथाच पडत चालली आहे. पण काही बातम्या अशा असतात, ज्या थेट काळजाला भिडतात…
आज तसंच काहीसं झालं आहे…
शब्द हरवले आहेत…
मन सुन्न झालं आहे…
बाहेर आकाश निरभ्र आहे… पण रात्र मात्र गहिवरून आली आहे…
मी लिहितोय… पुन्हा खोडतोय…
मनाचा हा गहिवर शब्दांत कसा मांडायचा?
कारण आज आपण केवळ एक माणूस गमावलेला नाही; आपण एक चालती-बोलती विचारधारा गमावली आहे.
पी. एस. खंदारे सर…
गेली अनेक दिवस ते मृत्यूशी संघर्ष करत होते. त्यांच्या सहवासात घडलेले शेकडो हात त्यांच्यासाठी मदतीसाठी धावपळ करत होते.
नियतीलाही ठामपणे आव्हान देणारा, अंधश्रद्धेच्या अंधारात विवेकाची ज्योत पेटवणारा तो दीप आज शांत झाला…
पण त्यांनी पेटवलेल्या हजारो ज्योती आजही तेवढ्याच तेजाने प्रज्वलित आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली ती परिषद यशस्वी झाली. आज त्या आठवणीच आमचा आधार आहेत.
समाजप्रबोधनासाठी त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य झोकून दिलं.
माझ्या मोप गावात त्यांचं प्रबोधन आयोजित करायचं होतं…
आम्हाला बोधगयेला एकत्र जायचं होतं…
सर…
आपण निघून गेलात…
आणि आपल्या सोबतचा हा प्रवास अर्धवट थांबला…
पण आपल्या सहवासातून मिळालेला प्रबोधनाचा विचार आमच्या रक्तात मिसळला आहे.
ही मशाल आम्ही कधीच विझू देणार नाही.
आज वाशिमच्या मातीतला एक “बाप माणूस” हरपला आहे.
कारण…
माणूस निघून जातो… पण त्याने पेटवलेला विचाराचा दीप कधीच विझत नाही.
💐 पी. एस. खंदारे सरांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली! 💐

- पी. एस. खंदारे : मला बुद्ध सांगणारा गाडगेबाबा हरपला…!
- “चंपा” च्या मेंदूची ‘फॉरेन्सिक क्रांती’ : आणि नोबेलची शिफारस

