बुका लाऊन तुका सांगणाऱ्या “घुसखोरांकडून” बालमनांचा सौदा — ही वारकरी परंपरा की राजकीय दलाली?

लहान मुले हि अनुकरण प्रिय असतात.चांगले वाईट याची फारशी समज त्यांना नसते .काल आळंदी येथे घडलेल्या घटनेनंतर उभा राहिलेला प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही; तो संपूर्ण समाजाच्या विवेकाला हादरा देणारा ठरतो . ज्या वारकरी परंपरेने शतकानुशतके संतांच्या शिकवणीचा संयम, समता आणि शांततेचा मार्ग दाखवला, त्याच परंपरेच्या नावाखाली आज काही तथाकथित भोंदू जे स्वतःला नावामागे ह.भ.प.लाऊन वारकरी म्हणून घेत वावरत आहेत . बुका लाऊन तुका सांगणाऱ्या या लोकांनी सुरवातीला किर्तन परंपरेचा हवा तसा बाजार केला आणि आता राजकीय दलालीचा उघड धंदा मांडलाय .

काल परवा तर या लोकांनी बालमनांचा वापर करत एका घाणेरड्या कृत्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढून त्यात बालमनाचा सौदा केला आहे — हे केवळ निंदनीयच नाही, तर लज्जास्पद आहे व माणुसकीला काळिमा फासणारे आहे!
10 ते 16 वयोगटातील निरागस मुलांच्या हातात टाळ-मृदंग देऊन, त्यांना मोर्चात उभं करून, घोषणाबाजी करायला लावणं — हा कोणता संस्कार? ही कोणती भक्ती? की हा फक्त राजकीय हेतू साधण्यासाठी तयार केलेला स्वस्त तमाशा आहे?
ज्या मुलांना शाळेत असायला हवं, संस्कारांच्या गोष्टी शिकायला हव्यात, त्यांना रस्त्यावर आणून द्वेष, दबाव आणि गोंधळ याची भाषा शिकवली जाते. कि ज्या गोष्टीशी त्यांना काहीच घेणे देणे नाही किंवा आपण मोर्चा कशासाठी काढतोय याची त्यांना कुठलीच कल्पनाही नाही . — आणि हे सगळं धर्माच्या नावाखाली! ही गोष्ट जितकी धक्कादायक आहे, तितकीच धोकादायकही आहे. कारण आज जे बालमन आपण अशा प्रकारे वाकवतो, उद्या तेच समाजाच्या भविष्याचं रूप ठरणार आहे. हा मोर्चा कशासाठी आहे आणि पोलिसांना दिल जाणारे निवेदन कोणासाठी आहे याची कल्पना देऊनही हि खेळी त्या बालमनाच्या आकलना बाहेर आहे .
वारकरी संप्रदाय म्हणजे ज्ञान, भक्ती आणि नम्रतेचा संगम. संत तुकाराम, ज्ञानेश्वरांनी कधीही द्वेष, धमकी किंवा दहशतीचा मार्ग दाखवला नाही. मग आज काही लोक स्वतःला वारकरी म्हणवून घेतात , भगवी पताका खांद्यावर घेऊन ‘अहंकाराचे’ प्रदर्शन करणारे हे लोक नेमके कोणाचे वारसदार आहेत? नेमकं काय सिद्ध करू पाहत आहेत? भक्तीचा मार्ग की भीतीचा रस्ता ?


ही बाब केवळ नैतिकदृष्ट्या चुकीची नाही, तर कायद्याच्या दृष्टीनेही गंभीर आहे. लहान मुलांचा अशा संवेदनशील आणि वादग्रस्त विषयात वापर करणं म्हणजे त्यांच्या हक्कांवर गदा आणणं होय. हा सरळसरळ बालहक्कांचा भंग आहे — आणि यावर केवळ कठोर कारवाईच नाही तर असा लहान मुलाचा मोर्चा साठी वापर करणाऱ्या या “तथाकथित “वारकऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल होऊन कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे.
आज गरज आहे ती ठाम भूमिका घेण्याची. समाजाने हे स्पष्ट सांगितलं पाहिजे की, “भक्तीच्या नावाखाली राजकारण आणि बालमनांचा गैरवापर आम्ही सहन करणार नाही!”
नाहीतर उद्या प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक वादात, निरागस मुलांना पुढे करून स्वतःचे स्वार्थ साधणाऱ्यांचा पाय अधिकच भक्कम होईल — आणि मग दोष फक्त त्यांचा नाही, तर गप्प बसणाऱ्या आपल्या सगळ्यांचाही असेल.
“जिथे बालमनांचा वापर स्वार्थासाठी सुरू होतो, तिथे भक्तीचा अंत होतो आणि विनाशाचा बाजार मांडला जातो! सावध व्हा, कारण गप्प बसणे ही देखील या पापातील भागीदारीच आहे!”

शेवटी –बालहक्कांचे उघड उल्लंघन झाले हा केवळ नैतिक गुन्हा नाही, तर कायद्याने सुद्धा गुन्हा आहे. लहान मुलांच्या निरागसतेचा ‘मानवी ढाल’ म्हणून वापर करणे हा बालहक्कांचा क्रूर भंग आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच चाप लावला नाही, तर उद्या मंदिरांच्या ओसरीवर ज्ञानाऐवजी दहशतीचे धडे गिरवले जातील.

समाजाची जबाबदारी म्हणून जर आज आपण या तथाकथित महाराजांच्या आणि दलाल प्रवृत्तींच्या विरोधात बोललो नाही, तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. धर्माच्या नावाखाली चालणारा हा ‘अधर्माचा’ खेळ आता थांबलाच पाहिजे.

गजानन खंदारे

जिल्हाप्रमुख संभाजी ब्रिगेड वाशिम

डिस्क्लेमर (Disclaimer):

“उपरोक्त लेखामध्ये व्यक्त केलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते असून, ती विशिष्ट घटनेच्या संदर्भातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतात. हा लेख संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान करण्यासाठी नसून, परंपरेचा चुकीचा वापर करणाऱ्या विशिष्ट प्रवृत्तींविषयी जागृती निर्माण करण्यासाठी लिहिला आहे. यातील मजकुराचा उद्देश कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणं हा नसून बालहक्क आणि नैतिक मूल्यांची जपणूक करणे हा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top